

पिंपरी, ता. २८ ः सह्याद्री पर्वतरांगांमधील अवघड घाट, नैसर्गिक अडचणी आणि झोपेवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान सक्षमपणे पेलत पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटू अमित लोंढे यांनी पहिल्याच प्रयत्नात दहावी ‘द डेक्कन क्लिफ हँगर -२०२३’ ही अल्ट्रा सायकलिंग स्पर्धा २८ तास २७ मिनिटे आणि ४४ सेकंदांत यशस्वीरित्या पूर्ण केली. या यशाबरोबरच, ते ‘रेस ॲक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेसाठीही पात्र ठरले.
‘द डेक्कन क्लिफ हँगर’ ही अल्ट्रा सायकलिंग स्पर्धा पुणे ते गोवा दरम्यान भरविण्यात आली. त्यामध्ये, अमित लोंढे यांनी १८ ते ४९ वयोगटांत वरील कामगिरी नोंदविली. पिंपरी-चिंचवडमधून सर्वात कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करण्याचा मानही मिळविला.
या स्पर्धेदरम्यान सायकलपटूंना कात्रज, खंबाटकी, पसरणी, महाबळेश्वर, मेढा, तवंडी, आंबोली असे विविध घाट सर करत तसेच ऊन, वारा, पाऊस, थंडी व आद्रता अशा विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. याशिवाय, झोपेवर नियंत्रण ठेवत शारीरिक व मानसिक समतोल सांभाळत ही स्पर्धा पूर्ण करावी लागते. ही सर्व आव्हाने स्वीकारत अमित यांनी हे यश मिळविले.
‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ या ४, ८०० किमी स्पर्धेत पात्र होण्यासाठी सायकलपटूंना ‘द डेक्कन क्लिफ हँगर’ ही ६४३ किमीची स्पर्धा विनाथांबा ३२ तासांत पूर्ण करणे आवश्यक असते. अमित यांनी निर्धारित वेळे अगोदर स्पर्धा पूर्ण करत ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ या स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी पिंपरी-चिंचवड मधून पराग जोशी, मंगेश कोल्हे, नीलेश घोळवे, असीम दरेकर यांनी पूर्ण करत आपले स्थान ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ स्पर्धेसाठी निश्चित केले होते.
या स्पर्धे दरम्यान प्रशिक्षक श्री. राजू भापकर, मित्र वैभव ठोंबरे, पराग जाधव, सूरज मुंढे, रोहित क्षीरसागर, अक्षय बाफना, शेखर गवळी, पंकज सुराणा, डॉ.संदीप शर्मा व सूचित मडीवाल यांनी संपूर्ण स्पर्धे दरम्यान अमित यांच्यासाठी ‘रेस क्रू’ म्हणून वेळोवेळी आवश्यक त्याबाबींची पूर्तता करत व स्पर्धेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत काम पहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.