संक्रांतीची बाजारपेठ हलव्याच्या दागिन्यांनी भरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्रांतीची बाजारपेठ हलव्याच्या दागिन्यांनी भरली
संक्रांतीची बाजारपेठ हलव्याच्या दागिन्यांनी भरली

संक्रांतीची बाजारपेठ हलव्याच्या दागिन्यांनी भरली

sakal_logo
By

दीक्षा शिंदे
पिंपरी, ता.१० ः अवघ्या पाच दिवसांवर मकर सक्रांत सण आला आहे. त्यासाठी हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यात हार, नेकलेस, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकुट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. याशिवाय आपल्या मागणीनुसार दागिने तयार करून दिले जात आहेत. खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.

नववर्षातील पहिला सण मकर संक्रांत असते. यंदा १५ जानेवारी हा सण आला आहे. यानिमित्त नवविवाहिता आणि बाळ यांना हलव्याचे दागिने भेट दिले जातात. संक्रांती दिवशी ते घालण्याची जुनी प्रथा आहे. दागिन्यांच्या किमती दोनशे ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. कलाकुसरची आवड असणाऱ्या महिला घरगुती व्यवसाय स्वरूपात ते तयार करतात. आठ ते दहा दिवस अगोदर ऑर्डर घेतली जाते आणि मागणीनुसार ते करून दिले जातात.

विक्रेत्या वनिता भोसेकर म्हणाल्या, ‘‘नक्षीकामानुसार दरवर्षी मी हलव्याच्या दागिन्यांचे पाच ते सहा हजार सेट बनवते. प्रत्येक सेटची किंमत वेगळी आहे. मंगळसूत्र १०० ते ३०० रुपये, नेकलेस २०० ते ८०० रुपये आहे, मांगटिका ५० ते १००, कानातले ५० ते ३०० आणि नथ १०० ते २०० रुपयांपर्यंत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईन तयार केले जाते. साधारण दिवाळीनंतर बनवायला सुरवात होते. रथसप्तमीपर्यंत मागणी असते. बोरन्हाण व लहान मुलींसाठी मागणी जास्त आहे. तीन हजारहून अधिक दागिन्‍यांची विक्री झाली आहे. तसेच नववधू आणि वरासाठी १५०-२०० सेटची विक्री होत आहे. लहान मुलांसाठी, महिलांप्रमाणे पुरुषांसाठीही हलव्याचा हार, कृत्रिम फुलांचे पुष्पगुच्छ, नारळ, अंगठ्या, घड्याळ व मोबाइल बनविला जातो.

असे बनतात दागिने
- कोळशाच्या शेगडीवर पसरट खोलगट तवा ठेवून त्यात तीळ, मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, साबुदाणा, डाळी, खसखस आदी टाकले जाते. नंतर एकेक दाण्यावर साखरेचा पाक ओतून कापडाने तो हलविला जातो. गरम आचेमुळे हलवा काटेरी फुलतो. काही दाण्यांवर रंगीत पाक टाकून रंगीबेरंगी हलवा बनवतात.
- विविध आकारातला हलवा तयार झाल्यावर जाडसर पुठ्ठ्यावर सोनेरी बेगड म्हणजेच चमकदार कागद चिकटवला जातो. मुकुट, बाजूबंद, कंबरपट्टा असे आकार कापून त्यावर हलवा दाण्यांनी सुंदर डिझाइन तयार केले जाते. परंतु हार, बिंदी, गजरा तयार करताना मुरमुऱ्यांचा लांब हलवा किंवा मोठा शेंगदाणा दोऱ्याच्या गाठीत अडकवला जातो. आकर्षक करण्यासाठी चंदेरी-सोनेरी स्प्रिंगप्रमाणे झिग दोऱ्यात ओवतात. अलीकडे कृत्रिम रंगीत फुलेदेखील हारासाठी वापरतात.

कोट
‘‘ घराघरात संक्रांत हलव्याच्या दागिन्यांसह साजरा होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत नातेवाईक व आप्तेष्टांसाठी महिला स्वत: दागिने तयार करायच्या. आता अनेक महिलांनी हलवा आभूषणे बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन व्यवसायात रूपांतर केले आहे. मी गेली दहा वर्षे कलात्मक दागिने बनवण्याचा व्यवसाय करत आहेत.’’
-वनिता भोसेकर, हलवा दागिन्यांचे विक्रेते, चिंचवड