जायंट किलर- शंकर मांडेकर
जायंट किलर- शंकर मांडेकर
- नीलेश शेंडे
भोर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी ऐन रंगात आली होती. त्यावेळी महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारसभेसाठी झालेल्या एका सभेत कॉंग्रेसचे भोर तालुक्यातील एक नेते आपल्या भाषणात म्हणाले, ‘कोण मांडेकर? काळा की गोरा तोही कोणी पाहिला नाही....’ त्यांच्या या वाक्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. पण, याच शंकर मांडेकर यांनी भोर विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या व महाविकास आघाडीची सत्ता आल्यास थेट विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या कॉंग्रेसच्या संग्राम थोपटे यांना त्रिफळाचित केले. त्यामुळे ‘कोण मांडेकर?’ या प्रश्नाला ‘राज्यातील एक जायंट किलर’ असे उत्तर मिळाले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यामुळे भोर विधानसभा मतदारसंघाची स्वतंत्र ओळख आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी कायम राजकीय वैर असलेल्या थोपटे कुटुंबाकडे भोर विधानसभेच्या सत्तेची दोरी अपवाद वगळता गेल्या ४५ वर्षांपासून एकहाती आहे. सुरुवातीला अनंतराव थोपटे यांनी या मतदारसंघावर आपली मांड बसवली. भोर व वेल्हे (राजगड) या डोंगरी तालुक्यात त्यांनी कॉंग्रेसचा ‘पंजा’ कायमच उंचावत ठेवला. चोहोबाजूंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असतानाही त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली नाही. १५ वर्षांपूर्वी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत भोर मतदारसंघात वेल्ह्याच्या जोडीने मुळशी तालुक्याचा समावेश झाला. तेव्हापासून गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत अनंतराव थोपटे यांचे सुपुत्र संग्राम थोपटे यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. मात्र, यावेळेच्या निवडणुकीत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शंकर मांडेकर यांनी थोपटे यांच्या चिरेबंदी वाड्याला सुरुंग लावला.
या मतदारसंघात यावेळी कोणत्याही परिस्थितीत बदल घडवायचाच, असा चंग थोपटे विरोधकांनी नेहमीप्रमाणे बांधला होता. मात्र, नेहमीप्रमाणे विरोधकांमध्ये एकमत झाले नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व भाजप या दोनही पक्षांचे प्रत्येकी एक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे विरोधकांतील बेकीचे ग्रहण थोपटे यांच्या पथ्यावर पुन्हा पडणार, असा कयास बांधला गेला. त्यात ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची ताकदही थोपटे यांच्या पाठीशी होती. त्यामुळे थोपटे यांच्या विजयाची औपचारिकताच राहिले, असा अंदाज वर्तविला गेला.
दरम्यान, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या मांडेकर यांनी पक्षातील फुटीनंतर ठाकरे यांची साथ दिली. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भोर कॉंग्रेसकडे गेला. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवायचीच, याचा चंग मांडेकर यांनी बांधला होता. कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष लढण्याचे आवाहन केले. मात्र, विजयासाठी पक्षाची साथ गरजेची आहे. हे ओळखून ते पुन्हा स्वगृही राष्ट्र्वादीत परतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐनवेळी आपल्या या जुन्या शिलेदाराला उमेदवारीही जाहीर केली. मात्र, महायुतीत बंडखोरी झाली. तरीही मांडेकर हे आपल्या विजयावर ठाम होते.
मांडेकर यांच्या पत्नी सारिका या पंचायत समिती सदस्या व सभापती होत्या. तसेच, स्वतः शंकर मांडेकर हे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांनी या काळात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी भरभरून मदत केली. जनतेसाठी २४ तास उपलब्ध असलेला नेता, अशी त्यांची ओळख झाली. विशेषतः वारकरी, तरुण मंडळे, गणेश मंडळे आणि क्रिकेट खेळाडूंना त्यांनी कधी नकार दिला नाही. त्यांनीच त्यांची निवडणूक हातात घेतली. महिलांसाठी घेतलेला मेळावा विक्रमी ठरला व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले. त्यांनी, ‘शंकर मांडेकर जिंकला तर प्रत्येकजण आमदार होणार’ हे मतदारांच्या मनात बिंबवले.
जनतेचा प्रतिसाद मिळत गेला. तरीही लढाई सोपी नव्हती. मुळशी तालुक्यातून ८५ हजार, वेल्ह्यातून १५ हजार व भोरमधून ३५ हजार, असे मतांचे गणित मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांनी मांडले. या बेरजेतून विजय निश्चित असल्याची कार्यकर्त्यांचीही भावना झाली. अवघ्या काही दिवसांत मतदारसंघ पिंजून काढला. विविध जाती- धर्मांच्या नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला. मुळशीकरांनी भरभरून मते दिली. भोर व वेल्ह्यातील थोपटे विरोधकांनीही ताकद दाखवली. त्यामुळे थोपटे यांना या तालुक्यांतून अपेक्षित असणारी मते मिळाली नाहीत. त्यामुळे मुळशीचे मताधिक्य कमी करणे अशक्य झाले. निवडणूक चुरशीची होण्याऐवजी एकतर्फीच झाली आणि मांडेकर २० हजारांपेक्षा जास्तीच्या मताधिक्याने विजयी झाले. अखेर थोपटे यांचा गड ढासळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.