लोणावळ्यात भाजपकडून प्रशासन धारेवर

लोणावळ्यात भाजपकडून प्रशासन धारेवर

Published on

लोणावळा, ता. २८ : येथील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत लोणावळा शहर भाजपने प्रशासनाला धारेवर धरले.
शहरात भेडसावणारी वाहतूक कोंडी, भांगरवाडी ते नांगरगाव रखडलेला उड्डाणपूल, खंडाळा तलाव सुशोभीकरण प्रकल्प व बंद झालेली बोटिंग आदी प्रलंबित विकासकामांसंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियुक्त केलेली उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची भेट घेत प्रश्नांचा भडिमार केला.
माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, भाजपचे माजी गटनेते देविदास कडू, बाळासाहेब जाधव, जयप्रकाश परदेशी, प्रफुल्ल काकडे आदींसह समिती अध्यक्ष व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश डॉ. एस. राधाकृष्णन, सदस्य जगदीश जोशी, व्ही. डब्ल्यू. देशपांडे, तनू तिवारी, दिनेश राणावत, मुख्याधिकारी अशोक साबळे उपस्थित होते.
पर्यटनवृद्धीच्यादृष्टीने महत्त्वाचा खंडाळा तलाव सुशोभीकरण प्रकल्प रखडला आहे, तो पूर्णत्वास न्यावा. येथील बोटिंग, स्वच्छतागृह बंद आहेत. उच्चस्तरीय समितीने शहरातील पायाभूत सुविधा व विकासात लक्ष घालण्याची मागणी शहराच्या विकासात लक्ष घालावे अशी मागणी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी समितीकडे केली.
भांगरवाडी नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून, रखडलेल्या कामाच्यासंदर्भात
माजी लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत प्रशासन या प्रश्नासंदर्भात झोपले आहे काय? असा संतप्त सवाल माजी गटनेते देविदास कडू यांनी उपस्थित केला.
पुलाचे काम लांबत चालले असताना पुलाच्या खांबालगतच एक इमारत उभी राहत आहे. इमारतीमुळे पुलाच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे, अशी भीती भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड यांनी व्यक्त केली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्देश समितीने नगरपरिषदेस दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.