‘आयटीआय’च्या नव्या ट्रेडला मुहूर्त कधी?

‘आयटीआय’च्या नव्या ट्रेडला मुहूर्त कधी?

Published on

पिंपरी, ता. ३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) सध्या पारंपरिक ट्रेड सुरू आहेत. मात्र विद्यार्थ्यांना टेक्नोसॅव्ही होण्‍यासाठी नवीन १६ ट्रेड सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवण्यात आला आहे, तो पुढे न सरकल्याने जागेअभावी ट्रेड सुरू करण्यास उशीर होत आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्याधारित अभ्यासक्रम निवडून स्वयंरोजगार करता यावा, यासाठी शासन आणि महापालिकेतर्फे शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना परवानगी देऊन सुसज्ज इमारती उभारण्यात आल्या. त्याद्वारे मूलभूत सोयीसुविधा दिल्या. परंतु काही ठिकाणी साधन व यंत्रसामग्री यांची पूर्तता केली नाही. सुरुवातीला सुरू असलेले ट्रेडच पुढे चालू ठेवले. ट्रेडचा फेरआढावा घेऊन व सर्वेक्षण करून स्थानिकांची गरज व मागणीनुसार नव्याने अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षांत अद्याप सुरू झालेले नाहीत.

वर्षानुवर्षे जुनेच ट्रेड :
तरुणांना कौशल्य विकास आणि उद्योजकतेचे धडे देणाऱ्या आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सध्या वर्षानुवर्षे विविध आयटीआयमध्ये वेल्डर, टर्नर, हेल्पर, इलेक्ट्रीशियन, फिटर, प्लंबर, कॉम्प्युटर ऑपरेटर असे पारंपरिक ट्रेड सुरू आहेत. उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तरुण पिढीसाठी उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘टेक्‍नॉलॉजी बेस’ ट्रेडची मागणी होत आहे. महापालिका आयटीआयमध्ये विविध उद्योगांच्या गरजा आणि मागणीनुसार नवीन सोळा ट्रेड सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

विद्यार्थ्यांची गैरसोय :
सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. शहरात शासकीय व खासगी दोन्ही मिळून सुमारे दोन हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांना आवश्यकतेपेक्षा अधिक हजारो विद्यार्थी प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना पसंती मिळत असताना दहा ते पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेडमध्ये वाढ करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अधिकचे पर्याय उपलब्ध नसल्याने आहे, तेच पर्याय नाइलाजास्तव स्वीकारावे लागत आहेत.

नवीन ट्रेडबाबत उदासिनता :
इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले इन्फ्रास्ट्रक्चर नवीन ट्रेड चालू केले नसल्याने कुचकामी ठरत आहेत. शासनाने एका बाजूला विद्यार्थ्यांना उच्च अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परवानगी देऊन औद्योगिक शिक्षणाकडे ओढा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे; तर दुसऱ्या बाजूला सुयोग्य प्रसिद्धी व नवनवीन ट्रेड सुरू करण्यात उदासीनता दाखवत समाजात संभ्रमावस्था निर्माण केली आहे.

प्रस्तावित १६ नवीन ट्रेड :
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ड्रोन टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, वूड वर्किंग टेक्निशियन, स्टेनो, इव्हेंट मॅनेजमेंट असिस्टंट, डिजिटल फोटोग्राफी, सोलर टेक्निशियन, आयओटी टेक्निशियन, इंटिरियर डेकोरेशन, फूडटूल अँड डायमेकिंग, ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग टेक्निशियन, सर्व्हेअर, लॉजिस्टिक असिस्टंट, हेल्प सॅनिटरिंग इन्स्पेक्टर व फायबर टेक्निशियन असे १६ नवीन ट्रेड औद्योगिक आस्थापनेच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे ठेवला आहे. यासाठी शहरातील अनेक नामांकित कंपन्यांनी आयटीआयशी टायअप केले आहे.

‘‘नवीन ट्रेड टेक्नॉलॉजी संबंधित विज्ञान आणि टेक्निकचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सध्या नवीन आयटीआय अद्ययावत करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध झाल्यावर विस्तारीकरण करण्यात येईल. ’’
- शशिकांत पाटील, प्राचार्य, मोरवाडी आयटीआय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.