पुरंदर, भोरमध्येही शरद पवार यांच्याकडे इच्छुक

पुरंदर, भोरमध्येही शरद पवार यांच्याकडे इच्छुक

Published on

पुणे, ता. ९ : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुरब्बी व प्रस्थापित नेत्यांपेक्षा नवख्या चेहऱ्यांसह, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील ३७ जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. याबरोबरच मित्रपक्षाकडे जाण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघातूनही काही इच्छुकांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीमध्ये पुरंदर व भोर हे दोन्ही मतदारसंघ पक्षाकडे नाहीत. असे असतानाही या मतदारसंघातूनही काहींनी इच्छुकांनी मुलाखतींसाठी हजेरी लावली.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग कार्यालयात पुणे शहर व जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, फौजिया खान, प्रकाश म्हस्के यांच्यासह पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
खेड-आळंदी मतदारसंघासाठी अतुल देशमुख व सुधीर मुंगसे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मुंगसे यांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक, डोक्‍यावर मुंगसे यांच्या नावाची टोपी परिधान करत जोरदार घोषणाबाजी केली. तर, देशमुख यांच्या पाठीमागील मोठ्या लवाजम्यानेही घोषणाबाजी करत परिसर निनादून सोडला. त्यांच्यासह ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, हिरामण सातकर, रामदास ठाकूर, अनिल राक्षे, लक्ष्मण टोपे यांनी मुलाखती दिल्या.
जुन्नरसाठी तुषार थोरात, अंकुश आमले, मोहिते सुदाम ढमाले, शरद लेंडे, शंकर घोडे, अनंतराव चौगुले, अनिल तांबे यांनी मुलाखत दिली. तसेच, पवार यांच्याशी कौटुंबिक संबंध असणारे विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली.
आंबेगावसाठी देवदत्त निकम, शेखर पाचुंदकर, रमेश येवले यांनी, तर शिरूरसाठी ॲड.अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, बाळासाहेब नरके यांनी मुलाखती दिली. दौंड विधानसभेसाठी दिग्विजय जेधे, डॉ. भारत खळदकर, डॉ. वंदना मोहिते, नामदेव ताकवणे, अप्पासाहेब पवार यांनी, तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे नाराजी व्यक्त केलेले अप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने यांच्यासह सागर मिसाळ, अशोक घोगरे, ॲड. तेजसिंह बाबासाहेब पाटील, अमोल भिसे यांनी इंदापूरसाठी मुलाखत दिली. मावळमधून दत्तात्रेय पडवळ यांनी मुलाखत दिली.


पुरंदर, भोरच्या उमेदवारांनीही दिली मुलाखत
महाविकास आघाडीमध्ये पुरंदर व भोर हे दोन्ही मतदारसंघ पक्षाकडे नाहीत. असे असतानाही या मतदारसंघातूनही काहींनी इच्छुकांनी मुलाखतींसाठी हजेरी लावली. त्यामध्ये पुरंदरमधून संभाजी झेंडे, भोरमधून मानसिंग धुमाळ, सविता दगडे, महादेव कोंढरे यांचा संबंधित इच्छुकांमध्ये समावेश होता.

बारामतीच्या उमेदवाराचे नाव गुपितच
जिल्ह्यातील पक्षाच्या वाट्याला असलेल्या सर्व मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती झाल्या, मात्र बारामती विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली नाही. त्यासंबंधी बारामतीच्या एका शिष्टमंडळाने सुप्रिया सुळे यांची भेट घेतली, त्यांनी बारामतीमधुन ३ ते ४ नावे सुचविल्याचे सुळे यांनी सांगितले.

‘शेरकर कुटुंबाचे कौटुंबिक संबंध’
सत्यशील शेरकर यांच्या भेटीबाबत खासदार सुळे यांनीच खुलासा केला. त्या म्हणाल्या, ‘‘सत्यशील शेरकर कुटुंब नेहमीच पवार साहेबांबरोबर असते. बेनके व कोल्हे यांच्या निवडणुकीत शेरकर कुटुंबाने प्रचंड कष्ट घेतले होते.’’

जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतींसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये नवोदितांची संख्या मोठी होती. इच्छुक उमेदवार उच्चशिक्षित, तरुण
व अभ्यासू होते. पक्षाच्या वाट्याला नसलेल्या मतदारसंघातूनही काही जणांनी मुलाखती दिल्या आहेत. एकूण ३७ जणांनी मुलाखत दिली आहे.
- जगन्नाथ शेवाळे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com