उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचा अपमान

उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसैनिकांचा अपमान

राजगुरुनगर, ता. ६ : ‘‘उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी खोटे बोलून भाजपबरोबरची नैसर्गिक युती तोडली आणि शिवसेनेचा व शिवसैनिकांचा अपमान केला म्हणून ‘खोट्याच्या कपाळी गोटा’ ही म्हण आपल्याला खरी करून दाखवायची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यासाठी आणि दीड वर्षातील लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे,’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानाचा प्रारंभ राजगुरुनगर येथे शनिवारी (ता. ६) येथून झाला. त्यावेळी पुणे- नाशिक महामार्गावरील नवीन खेड घाटाच्या पायथ्याशी पानमळा (सांडभोरवाडी) येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेच्या प्रवक्त्या मीना कांबळी, शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हा प्रमुख अशोक भुजबळ, नितीन गोरे, राजेश जवळेकर, रवींद्र करंजखेले, विजयसिंह शिंदे, अरुण गिरे, महेश शेवकरी, ज्योती अरगडे, नयना झनकर आदी उपस्थित होते. योगिता पाचारणे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान पोखरकर यांनी आभार मानले.

‘‘खेड पंचायत समिती इमारत, संभाजी महाराज स्मारकाचा ४०० कोटींचा आराखडा, बिबट सफारीला ८० कोटींची मंजुरी, पुणे- नाशिक रेल्वेचा पंधरा वर्षे पाठपुरावा, पुणे- नाशिक महामार्ग रुंदीकरण व बाह्यवळणे, तळेगाव- शिक्रापूर रस्ता मंजुरी, अशी अनेक कामे मार्गी लावली. माझ्या पाठपुराव्यामुळे पाणी पुरवठा योजनांसाठी चाकणला १७० कोटी, शिरूरला ७० कोटी व मंचरला ३० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले,’’ असे आढळराव पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले....
- मला पदाचा मोह नव्हता, पण शिवसेना कार्यकर्त्यांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी आणि शिवसेना वाचविण्यासाठी दीड वर्षांपूर्वी भूमिका घेतली.
- लोकांच्या भल्यासाठी सत्ता सोडण्याचे काम आम्ही केले. बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी मंत्रिपदावर लाथ मारून माझ्याबरोबर सात- आठ मंत्री आले.
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची जनतेसाठी अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण आम्हाला असल्याने आम्ही धाडसाने निर्णय घेतला.
- ‘सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू,’ असे म्हणत होते. पण, वेळ आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारून मुख्यमंत्री झाले.
- आम्ही शेताबांधावर लोकांपर्यंत जाऊन लोकनिर्णय घेत आहोत‌. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे लोक आम्ही नाही.

महाराष्ट्रातून मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या ४५ जागांपेक्षा जास्त जागा निवडून देण्याचा संकल्प करा. विरोधकांकडे मुद्दे नाहीत. त्यांना दुसरे काम नाही‌. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे त्यांच्याविषयी खूप मुद्दे आहेत. बोललो तर पळता भुई थोडी होईल‌‌. कोरोनात मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकवावे? आम्ही बोललो तर तोंड दाखवायला जागा सापडणार नाही.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही’
‘‘शिरूर मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे २०१९ मध्ये पराभव होऊनही थांबलो नाही. पद नसतानाही जनतेला आधार देण्यासाठी आणि शिरूरला नवचैतन्य आणण्यासाठी; प्रपंच, व्यवसाय आणि तब्येतीची पर्वा न करता वणवण फिरत आहे‌. शिरूरच्या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य राहील. खासदारकीसाठी आक्रोश करणार नाही,’’ असा टोला आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नाव न घेता लगावला.
RAJ24B02835

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com