Rajsthan CM in Pune flight
Rajsthan CM in Pune flightesakal

Rajsthan CM in Pune: राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानाला लँडर धडकले

‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींच्या विमानाबाबत हा प्रकार घडल्यामुळे विमानतळावरील ‘ग्राऊंडींग’च्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुणे ः पुणे विमानतळावर शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या विशेष विमानाला इंडिगो कंपनीच्या लँडरची (शिडी) धडक बसली. पावसाच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र विमानाचे मोठे नुकसान झाले. परिणामी छत्रपती संभाजीनगरहून दुसरे विशेष विमान मागविण्यात आले. त्या विमानातून शर्मा राजस्थानला परतले.

शर्मा यांचे विमान दुपारी चारच्या सुमारास दाखल झाले. ते टर्मिनलच्या बाहेर पडले. ते सायंकाळीच परतणार असल्याने विमान ‘पार्किंग बे’वरच थांबले होते. दुपारी पावसाला सुरवात झाली आणि सोसाट्याचा वाराही सुटला. त्यावेळी डाव्या बाजूला ठेवण्यात आलेले लँडर विमानाला धडकले. धडक इतकी मोठी बसली की लँडरचा काही भाग विमानाच्या आत घुसला. रात्रीपर्यंत विमानाची दुरुस्ती झालेली नव्हती. ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींच्या विमानाबाबत हा प्रकार घडल्यामुळे विमानतळावरील ‘ग्राऊंडींग’च्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टर्मिनलपर्यंत पाणी

जुन्या टर्मिनलच्या ‘निर्गमन’ प्रवेशद्वाराजवळ साचलेले पाणी काढण्याचे काम विमानतळ प्रशासनाकडून सुरु होते. त्यात १० ते १५ मिनिटांचा वेळ लागला. तोपर्यंत प्रवाशांना बाहेरच थांबावे लागले. रस्त्यावरही पाणी साचल्याने प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले होते.

तेरा विमानांना उशीर; प्रवाशांचीही ‘कोंडी’

पावसामुळे विमान प्रवाशांनाही फटका बसला. पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या सात व लँडिंग करणाऱ्या सहा अशा एकूण १३ विमानांना सरासरी एक ते दोन तास उशीर झाला. पाटण्याहून पुण्याला येणारे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. टर्मिनलच्या निर्गमन प्रवेशद्वाराजवळ पाणी साचल्यामुळे प्रवाशांना थोडा वेळ आतच थांबून राहावे लागले. त्यामुळे ‘सिक्युरिटी होल्ड एरिया’त प्रवाशांची बरीच गर्दी झाली होती. जयपूर, दिल्ली, पाटणा, बंगळूर, गोवा आदी ठिकाणी जाणाऱ्या विमानांची उड्डाणे विस्कळित झाली.

सामनासाठी प्रतिक्षा

भुवनेश्वरहून दाखल झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशांना सामानासाठी बेल्टपाशी सुमारे ५० मिनिटे प्रतिक्षा करावी लागली. पावसामुळे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सामान विमानातून काढण्यास नकार दिला. त्यामुळे इतर विमानांच्या प्रवाशांनाही वाट बघणे भाग पडले. बेल्टवर आलेले सामान घेऊन टर्मिनलच्या बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची १० ते १५ मिनिटे वाया गेली. त्यामुळे अनेक प्रवासी संतापले होते.

ही अत्यंत गंभीर घटना आहे. विशेषतः ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्तींच्या विमानाच्या बाबतीत हे घडणे फारच गंभीर आहे. शुक्रवारी शहरात पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. ‘ग्राउंड स्टाफ’च्या कामातील हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com