पुण्यातील ‘पोर्शे’ अपघाताची शिरूर तालुक्यात पुनरावृत्ती 
शिरूर तालुक्यात पुनरावृत्ती

पुण्यातील ‘पोर्शे’ अपघाताची शिरूर तालुक्यात पुनरावृत्ती शिरूर तालुक्यात पुनरावृत्ती

रांजणगाव सांडस/आंधळगाव, ता. १ : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे मोटार अपघाताची पुनरावृत्ती शिरूर तालुक्यातील आरणगाव येथे शुक्रवारी (ता.३१) झाली. येथील पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने पीक-अप मोटारीने दुचाकीवरील दोन तरुणांना उडविले. ही मुलगी वडिलांच्या मदतीने मोटार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होती.

अपघातात दोघांपैकी अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०, रा. वडगाव बांडे ता.दौंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर महेंद्र रावसाहेब बांडे (रा. वडगाव बांडे, ता.दौंड) हा गंभीर जखमी झाला. अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांपैकी एक जण पीक-अपच्या मागच्या चाकाखाली आला. संबंधित मुलीने त्याला अक्षरशः २० ते ३० फूट फरफटत नेले. अपघातानंतर ग्रामस्थ आणि नातेवाइकांनी दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र अरुण याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलीचे वडील पोलिस पाटील संतोष निवृत्ती लेंडे (वय ३८) यांनी स्वतःहून शिक्रापूर पोलिस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून शिरूर न्यायालयासमोर हजर केले व न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (ता.३) पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अपघाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) संशयित आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेत, पोलिसांनी तिला बाल न्याय मंडळापुढे हजर केले. मंडळाने तिला येत्या १३ जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचा आदेश दिला. त्यानंतर त्या मुलीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, संशयित आरोपी असलेल्या पोलिस पाटलांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार मृत युवकाचा भाऊ सतीश विठ्ठल मेमाणे याने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

२५५१, 23477

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com