कोल्हेंच्या विजयात खेडचा सिंहांचा वाटा

कोल्हेंच्या विजयात खेडचा सिंहांचा वाटा

राजेंद्र सांडभोर : सकाळ वृत्तसेवा
राजगुरुनगर, ता. ५ : तीन लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामागे उभ्या राहणाऱ्या खेड तालुक्याने यावेळी त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सर्वाधिक मताधिक्य देत त्यांच्या विजयात सिंहांचा वाटा उचलला आहे.

आढळरावांच्या २००४ सालच्या पहिल्या विजयात ३२ हजारांच्या मताधिक्यासह खेड तालुक्याचा सिंहाचा वाटा होता. त्यापुढच्या दोन्ही निवडणुकांत हे मताधिक्य वाढते राहिले. गेल्यावेळी, २०१९ च्या निवडणुकीत मात्र ७५०० मतांचे मताधिक्य तालुक्याने डॉ. कोल्हेंना दिले. तालुका आढळरावांपासून बाजूला जात असल्याचा तो संदेश होता. त्यानंतर त्यांनी सावरणे आवश्यक होते, पण ते झाले नाही. त्यातच शिवसेनेत फूट पडली. आढळराव पाटील मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत गेले. शिवसेना कार्यकर्त्यांचा मानस न जाणता, ठराविक समर्थकांना घेऊन ते बाहेर पडले. पण सामान्य शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबतच राहिला. त्यावेळी त्याचे महत्त्व फारसे लक्षात आले नाही. परिणामी निवडणुकीत गावपातळीवर प्रत्यक्षात काम करणारा कार्यकर्ता त्यांच्याबरोबर राहिला नाही. उलट त्या दुखावलेल्या कार्यकर्त्याने त्वेषाने डॉ. कोल्हेंचे काम केले. आढळरावांबरोबर शिंदे गटात गेलेल्या नेत्यांचा तालुक्यात परिणामकारक प्रभाव पडला नाही.
खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना फायदा झाला. भाजपचे दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांपैकी अतुल देशमुख हे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात सामील झाले व त्यांनी महाआघाडीचे उमेदवार कोल्हे यांचा प्रचार केला. तर, जिल्हा परिषद सदस्य व उत्तर पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आढळराव पाटील यांचा जोरदार प्रचार केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही जिल्हा परिषद सदस्यांनी आढळराव पाटील यांचा प्रचार केला. या विधानसभा मतदरासंघातून गेल्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांना ७५०० मतांचे मताधिक्य होते. या निवडणुकीत ते वाढले आणि तब्बल ५५ हजारांवर पोहचले. त्यामुळे मित्र पक्षांची मते अपेक्षेएवढी आढळराव पाटील यांच्याकडे वळलेली दिसून येत नाहीत.
आदिवासी, दलित, मुस्लिम व इतर मागास प्रवर्गाची मते महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मिळाल्याची चर्चा आहे. ही मते निर्णायक ठरली. कांदा व दुधाचे पडलेले भाव, ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती, महायुतीच्या राजकारणाचा राग आणि इतर मागास प्रवर्ग, मुस्लिम व आदिवासी समाजाच्या पाठिंब्यामुळे कोल्हे यांना खेडमध्ये मजबूत मताधिक्य मिळाले. आढळरावांचे पक्षांतर, महायुतीतील पक्षांची कृत्रिम तडजोड, भाजप सरकारच्या विरोधातील रोष आणि गावपातळीवर कट्टर कार्यकर्त्याचा अभाव या बाबींचा आढळरावांना फटका बसला.

तिन्ही घरचा पाहुणा उपाशी
निवडणुकीच्या तोंडावर नाईलाजाने आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावे लागले. मात्र शिंदे गटात त्यांच्याबरोबर आलेले बहुतांश लोक तेथेच थांबले. त्यांचीही आढळरावांशी असलेली बांधिलकी सैल झाली. दुसरीकडे अनेकदा संघर्ष झाल्यानंतर अचानक त्यांच्याकडे आलेल्या नेत्याशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नैसर्गिक बंध जुळला नाही. तसेच भाजप शिवसेना युती असतानाही आढळरावांचा भाजप कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नव्हता. परिणामी कोणत्याच पक्षाचा कार्यकर्ता जोमाने त्यांच्यासाठी काम करताना दिसला नाही आणि ‘तिन्ही घरचा पाहुणा उपाशी’ असे म्हणायची पाळी त्यांच्या संदर्भात आली.

विधानसभेला राष्ट्रवादी चालणार का?
आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा परिणाम होत नाही, असा आजपर्यंतचा खेडचा अनुभव आहे. कारण, या मतदारसंघातून लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान, असा गेल्या तीन निवडणुकांचा (सन २०१९ वगळता) अनुभव आहे. यावेळी शिवसेनेचा उमेदवार नव्हता, पण राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार होता.

मतदारसंघातील समस्या
खेड- आळंदी मतदारसंघात पुणे- नाशिक महामार्गावरील, तळेगाव- शिक्रापूर राज्य मार्गावरील आणि नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या आहे. तसेच, कांदा या नगदी पिकाचा पडलेला बाजारभाव हा प्रश्न होता. दुधाचे कमी झालेले भाव हाही मुद्दा परिणामकारक ठरला. चाकण औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्याबद्दल असंतोष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com