जिल्हा परिषद शोधणार शाळांमधील कमतरता

जिल्हा परिषद शोधणार शाळांमधील कमतरता
Published on

पुणे, ता. १० : जिल्हा परिषदेतील शाळांमधील गुणवत्ता वाढ आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्येक शाळेतील कमतरता शोधल्या जाणार आहेत. कमतरतांचा अभ्यास करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात भौतिक सुविधांवर अधिक भर दिला जाणार आहे. प्रत्येक शाळेला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू किंवा सुविधा पुरविण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी वर्षभर प्रशासन काम करणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही वेळोवेळी बैठकींमध्ये सूचना केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्येही शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ३०३ शाळा ‘मॉडेल शाळा’ करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पण केवळ या मॉडेल शाळा करण्याबरोबरच इतर शाळांसाठीही सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या तीन हजार ५४६ शाळा आहेत. या शाळांमध्ये काय कमतरता आहेत किंवा काय नावीन्य आहे, याचीही माहिती घेतली जाणार आहे. नावीन्य असलेल्या शाळांची नोंद घेऊन त्या प्रकाराचा उपक्रम इतर ठिकाणीही राबविण्याबाबत विचार केला जाणार आहे. कमतरता शोधून त्याचा अभ्यास करण्यासाठी समग्र शिक्षणाचे अभियंते त्याचबरोबर बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता आणि स्थानिक शिक्षकाचा सहभाग असणार आहे.

दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील तीनशे शाळांची मॉडेल शाळेसाठी निवड
सर्वच शाळांमध्ये भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी कमतरतांचा अभ्यास
अभियंत्यांकडून सध्या शाळांचा अभ्यास सुरू
भौतिक सुविधांसाठी सीएसआरची मदत घेतली जाणार
गुणवत्तावाढीसाठी जिल्ह्यातील शिक्षकांची ट्रेनर म्हणून निवड


प्रशिक्षक म्हणून ४५ शिक्षकांची निवड
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता वाढण्यासाठी प्रशासनाकडून एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये काही माजी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. ही समिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणामध्ये बदल तसेच गुणवत्तावाढीच्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. त्याशिवाय शिक्षकांसाठी कार्यशाळाही होणार आहेत. जिल्हा परिषदेच्याच काही तंत्रस्नेही आणि प्रयोगशील शिक्षकांची प्रशिक्षक म्हणून मदत घेतली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील ४५ शिक्षकांची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.


जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये भौतिक सुविधांनी युक्त असण्याची गरज आहे. शाळेत भौतिक सुविधा असतील तर शाळेची गुणवत्ताही वाढते. त्यामुळे सर्वच शाळांमधील कमतरतांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यानंतर या कमतरता पूर्ण करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com