दिवाळीपूर्वी कशी मिळणार पिकांची भरपाई?
पुणे, ता. ९ : जिल्ह्यासह राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीचा अद्याप अंतिम अहवाल तयार झालेला नाही. साधारण दहा हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरकारी मदत जाहीर झाली असताना, जिल्ह्याचा अहवालच शासनदरबारी पोचला नाही. परिणामी शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी मिळण्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासूनच पाऊस जास्त झाल्याने चिंतेचा ठरला. मे महिन्यात दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे खरिपासाठी हंगाम पूर्व मशागत करण्यासाठी सुद्धा पावसाने शेतकऱ्यांना उसंत दिली नव्हती. शेतकऱ्यांनी वाफसा मिळेल तसा पेरण्या पूर्ण केल्या. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत ९० टक्के म्हणजेच दोन लाख दहा हजार ३३३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा पेरणी कमी होण्याला सुरुवातीच्या काळात झालेला अधिकचा पाऊस कारणीभूत असल्याचे शेतकरी सांगतात. पेरणी होऊन पिके जोमात वाढली मात्र पुन्हा पावसाच्या हाहाकाराने सगळे पिके उद्ध्वस्त झाली. अनेक शेतकऱ्यांच्या हाती काहीच पीक राहिले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर मध्यापर्यंत जिल्ह्यात २७३ हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला खेड, आंबेगाव त्याचबरोबर दौंड, पुरंदर, बारामती भागात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचा आकडा हा दहा हजार हेक्टरच्या वर जाण्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
बाधित पिके
सोयाबिन, मका, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस
इंदापुरात सर्वाधिक नुकसान
सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने सर्वाधिक नुकसान हे इंदापूर तालुक्यात झाल्याचा अंदाज आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील मका पीक सर्वाधिक बाधित झाले आहे. याशिवाय दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सप्टेंबर अखेरीच्या पावसाने खेड, आंबेगाव, जुन्नर भागात अधिक नुकसान झाले.
अद्याप पंचनामे सुरूच...
अतिवृष्टी झालेल्या भागात प्रशासन अजूनही पंचनामे करण्याचे काम करत आहे. पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप किती पंचनामे राहिले याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही.
ऑगस्टमध्ये पहिल्यांदा सणसरमधील ओढ्याला पूर आला. शेतातील माती, उसातील ठिबक सिंचन आणि ठिबक सिंचनचे पाइप वाहून गेले. त्याचा पंचनामा झाला. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने पुन्हा पूर आला. पण दुसऱ्यांदा पंचनामा झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीचे फक्त दहा हजार रुपये शासनाकडून मिळाले आहेत. एवढ्या कमी पैशांनी काय आमचे नुकसान भरून मिळणार आहे?
- विश्वास निंबाळकर, सणसर (इंदापूर)
नुकसानीचा अंतिम अहवाल करण्याचे काम सुरू आहे. साधारण दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे, यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. सप्टेंबरमध्ये महिन्यात दोन टप्प्यात मोठे पाऊस झाला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिक नुकसान झाले.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.