धडकी भरविणाऱ्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडणाऱ्या नागेश्वरी

धडकी भरविणाऱ्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडणाऱ्या नागेश्वरी

Published on

सर्पमैत्रिणींच्या धाडसी कर्तृत्वाचे कौतुक

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या साप पकडण्याच्या क्षेत्रात आता महिला मोठ्या धाडसाने कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांचे संरक्षण करणाऱ्या जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात सर्पमैत्रिणींना, सावित्रीच्या लेकींच्या कर्तृत्वाचा महिला दिनानिमित्त घेतलेला आढावा...

- संतोष खुटवड, पुणे



आदिवासी शेतकऱ्यांची
सर्पमैत्रिण नागेश्वरी
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील नागेश्वरी केदार या दिसताच क्षणी धडकी भरविणाऱ्या नाग, सापांना लिलया पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्याचे विधायक कार्य करतात. त्या नागेश्वरी सह्याद्री वन्यजीव संगोपन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील १५ ते २० वर्षांपासून कार्यरत आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, नर्सचे कर्तव्य बजावत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे १५०० बिनविषारी, विषारी सापांना जीवदान दिले आहे. तसेच, सर्पदंशापासून अनेकांना वाचविले आहे.
नागेश्वरी केदार यांनी जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात घरात किंवा परिसरात आढळून येणाऱ्या नागांपासून आदिवासी बांधव, शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. साप दिसताच जाणवणाऱ्या भीतीतून अनेकांची त्यांनी सुटका आहे.
अनेकवेळा नागरिक भीतीपोटी नागास मारण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तो जखमी होतो. त्यावेळी नागेश्वरी यांनी सापावर प्रथमोपचार करून त्यांना निसर्गाच्या साधान्यात सोडून देतात.
पिंपळदरी (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक आश्रमशाळेत पाचवीत असताना त्यांनी प्रथम गवत्या जातीचा साप पडकला. त्यावेळी तत्कालीन शिक्षकांनी शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापांविषयी रंजक माहिती दिली. तेव्हापासून त्यांना विविध सांपाविषयी भीती न वाटता आवड निर्माण झाली. दरम्यान, दहावीनंतर सर्पमित्र धिरज शेकोकरे यांनी नागेश्वरी यांना साप पकडण्याचे प्रशिक्षण व तंत्र शिकविले. यानंतर वन्यजीवांविषयी दिवसेंदिवस आपुलकी निर्माण झाल्याचे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले. केवळ सापांनाच नाही तर वन्यप्राणी, पक्ष्यांनाही वाचविले आहे.

विविध पुरस्कारांनी गौरव
भक्ष्याच्या शोधात आलेल्या सापांमुळे मानवाचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यांच्यापासून वाचण्यासाठी नागेश्वरी यांनी विविध शाळा, महाविद्यालये, नवरात्र व गणेशोत्सवात जनजागृती केली आहे. सर्पदंश झाल्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबतही त्या प्रबोधन करतात. राज्यभर होणाऱ्या सर्पसंमेलनात त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्पमित्रांसाठी शासनाने ठोस योजना करून राजाश्रय द्यावा. सर्पमित्रांना सर्पदंश झालाच तर वनविभाग, शासनाने आर्थिक सहकार्य करावे. जुन्नरसारख्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला झाला मदत मिळते. मात्र, सर्पमित्रांसाबाबत शासनाची कोणतीच योजना नाही. याबाबत शासन, लोकप्रनिधींनी विचार करावा.
- नागेश्वरी केदार, सर्पमैत्रिण, नारायणगाव (ता. जुन्नर)
.....
पुंरदरची ‘सर्पजीवनदायिनी’
नारायणपूर (ता. पुरंदर) येथील सुजाता रामचंद्र बोरकर यांनी ग्रामीण भागात राहून हजारो सापांना जीवदान दिले आहे. महाराष्ट्रातील पहिल्या सर्पमैत्रिण म्हणून त्या ओळखल्या जातात. तब्बल २९ वर्षांपासून सक्रिय असल्याने त्यांना सर्पजीवनदायिनी म्हणून ओळखले जाते.
सुजाता यांनी जिल्ह्यासह राज्यभर फिरून शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक कार्यक्रमांत सापांच्या जीवनाविषयी जनजागृती करण्याचे मौलिक कार्य केले आहेत. त्यांनी सर्वप्रथम सन १९९७ मध्ये साप पकडण्याचे धैर्य दाखवले. माळेगाव (ता. भोर) येथे त्यांचे साधे कुडाचे घर होते. घराशेजारी झाडेझुडपे असल्याने तेथे वारंवार साप निघत. यामुळे त्यांचे आईवडील नेहमीच भीतीच्या छायेखाली
असत. त्यावेळी सापांना पकडण्यासाठी नसरापूर येथून सर्पमित्र गोपाळ डी. ननावरे यायचे. त्यांनी सुजाता यांना साप पकडण्याचे कौशल्य शिकविले व त्यांची सापांविषयी भीती दूर केली. महिला असल्याने साप पकड्यासाठी घरातून, तसेच समाजातून विरोध होता. मात्र, त्याला झुगारून सापांशी मैत्री केली. हळूहळू जगभरातील सापांविषयीचा अभ्यास केला. विविध पुस्तके वाचून सापाच्या जीवनशैलीविषयी माहिती करून घेतली, असे सुजाता यांनी सांगितले. पुरंदर, भोर, हडपसर परिसरात त्यांनी अनेक सांपाना पकडून निसर्गात सोडले आहे.
जी. डी. ननावरे, दिलावर खान, आयुब खान, कैलास दारोले, नाना भुतकर, सुभाष घुले, राजेश ठोंबरे, शरद गुंड तसेच दिलीप कामत आदी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केल्याचे बोरकर आवर्जून सांगतात. दरम्यान, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

मेलेल्या सापाच्या पोटात ३२ पिल्ले
साप दिसल्यावर भीतीपोटी त्यास मारण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. एकदा सापाला मारून ग्रामस्थांनी त्यांना बोलविले होते. त्या पोचण्याआधीच त्याला मारण्यात आले. त्या सापास घरी आणून सापाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या पोटातून ३२ पिल्ले जिवंत निघाली, अशी एक आठवण सुजाता बोरकर यांनी सांगितली.

बोरकर यांचा यासाठी पुढाकार
• सर्पदंश झाल्यावर करावयाच्या प्रथमोपचाविषयी प्रबोधन
• शाळा महाविद्यालयात सापांना वाचविण्यासाठी जनजागृती
• जखमी पशुपक्ष्यांवर उपचार करण्यासाठी पुढाकार
• साप पकडण्याचे तंत्र अधिकाधिक तरुणांना शिकविले
• नागरिकांमधील नागांविषयीच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे

पुरस्कार मिळाले तरी त्याचा काय उपयोग. सर्पमित्रासाठी शासनाचे कोणतेच संरक्षण मिळत नाही. सर्पदंश झाल्यावर दवाखान्याचा खर्च त्यालाच करावा लागतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात सर्पमित्रांचे रक्षण करण्यासाठी, योजनांसाठीचा प्रस्ताव ठेवला हवा.
- सुजाता बोरकर, सर्पमैत्रिण, नारायणपूर (ता. पुरंदर)

पूजा बांगर हिच्यामुळे
साप निसर्गाच्या कुशीत
भोसरी, मोशी येथे कार्यरत असणाऱ्या पूजा बांगर सामाजिक जाणीवेतून साप पकडण्याचे काम मागील सात वर्षांपासून करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत नाग, मण्यार, फुरसे, घोणस असे विविध प्रकारच्या १५०० पेक्षा अधिक सापांना निसर्गात मुक्त केले आहे. भोसरी, मोशी, शिरूर, शिक्रापूर, करंदी, केंदूर, गणेगाव, वाघोली, लोणीकंद, सणसवाडी, रांजणगाव, हिवरे आदी गावांमधून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळे त्यांना पुरस्काराने सन्मानितही केले आहे. सापांबाबत शाळा, तसेच शिबिरे तसेच सोशल मीडियावरून त्या मार्गदर्शन, जनजागृती करतात. सर्पमित्र अमर गोडांबे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळते.

सापांनी घेतला २०० वेळा चावा
कौलारू घराच्या छतावर चढून, विहिरीत उतरूनही भरपूर साप पकडले. घरातील अडगळीत असलेल्या सापाच्या संकटांपासून नागरिकांना वाचविले आहे. साप पकडताना आतापर्यंत बिनविषारी सापांनी २०० वेळा चावा घेतल्याचे पूजा बांगर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com