नाशिक महामार्गावर मराठ्यांचे वादळ
पुणे, ता. २८ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बुधवारी (ता. २७) मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील यांचे समाज बांधवांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले. त्यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली. पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलकांच्या वाहनांच्या सुमारे सहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी उशिरापर्यंत थांबून स्वागत केले. यावेळी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
जरांगे पाटील यांचे गुरुवारी (ता. २८) पहाटे साडेचार वाजता जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकात आगमन झाले. परिसरातील मराठा समाज बांधवांच्या वतीने जवळपास ३० ते ४० जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करून जंगी स्वागत केले. त्यानंतर येथील चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून दर्शन घेऊन त्यांनी जुन्नरकडे प्रस्थान केले.
आळेफाटा येथून किल्ले शिवनेरी येथे जात असताना सकाळी सहा वाजता जरांगे पाटील यांचे ओतूर येथे आगमन झाले. येथे परिसरातील गावांमधील तरुणांनी उस्फूर्तपणे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. त्यांनतर बनकर फाटा येथेही डिंगोरे व उदापूर आणि परिसरात सहा जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर घोषणा देत होते.
जरांगे पाटील यांचे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथे आगमन झाले. सुमारे सात तास उशीर होऊन देखील त्यांच्या स्वागतासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. फुलांची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले.
कळंब येथे सायंकाळी सव्वापाच वाजता जरांगे पाटील यांचे आगमन झाले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. बाह्यवळणावर जेसीबीमधून फुलांच्या पाकळ्याची उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत उत्साहात स्वागत केले. आंबेगाव तालुक्यातील कळंब, महाळुंगे पडवळ, चास, साकोरे, लौकी, चांडोली बुद्रुक, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी आदी गावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. येथे पोवाड्याचा कार्यक्रम ठेवला होता.
मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी रात्री पावणेसात वाजता जरांगे पाटील यांचे स्वागत जेसीबी यंत्रावरून पुष्पवृष्टी करून जल्लोषात केले. यावेळी ‘आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, आम्ही मावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे.’ ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. एकलहरे, मंचर, अवसरी फाटा, भोरवाडी या तब्बल सहा किलोमीटर अंतरात दुतर्फा नागरिकांची गर्दी होती. युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे बाह्यवळणावर मराठा समाजातील नागरिक सकाळपासूनच चाकण (ता. खेड) येथे पुणे- नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात आंदोलक व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सकाळपासून मोठी गर्दी केली होती. येथे आंदोलकांचे स्वागत करण्यात येत होते.
आंदोलकांची ठिकठिकाणी सोय
१. जुन्नर तालुक्यातील मोर्चाच्या मार्गावरील सर्व मंगल कार्यालये, संस्थांची मैदाने, सभागृहे, जुन्नर शहरातील सर्व समाजमंदिरांमध्ये निवास व पार्किंगची व्यवस्था
२. ओतूर, उदापूर, डिंगोरे व परिसरातील मराठा बांधवांकडून महामार्गाच्या बाजूला बुधवारी रात्रभर गटागटाने उभे राहून येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना थांबवून जेवणाची व राहण्याची विनंती.
३. ओतूर, उदापूर, डिंगोरे व परिसरातील समाज बांधवांकडून बुधवारी दुपारपासूनच चपाती, भाकरी, चटणी, मिरची, भेळ, पाणी बाटल्या सोय. तयार ठेवले होते.
४. नारायणगावात आंदोलकांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटेच पुडे, नाष्टा, चटणी भाकरीचे पॅकिंग देण्यात आले. कळंब येथील बाह्यवळणावर दूध, चहा, पाणी आणि नाश्त्याची मोफत व्यवस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.