पुरंदरमध्ये शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळेचा फार्स !
खळद, ता. ३ : शिवरी (ता.पुरंदर) येथील महात्मा ज्योतिराव फुले माध्यमिक विद्यालयातील शरदचंद्र पवार सभागृहात पंचायत समिती पुरंदर शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हा अवघ्या तीन तासांत गुंडाळत प्रशिक्षणाचा नुसता फार्स झाल्याचे समोर आले आहे. तर यासाठी आवश्यक असणाऱ्या गावोगावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी तर याकडे पूर्णपणे पाठ फिरवली.
शिवरी येथे येथे बुधवारी (दि. ३) मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या आदेशाची माहिती एक दिवस अगोदर दिली. तर स.१० ते दु. ४ या वेळेत कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचा उल्लेख पत्रामध्ये होता. मात्र, या कार्यशाळेदरम्यान तंबाखूमुक्त कार्यशाळा व नवसाक्षरता कार्यक्रम प्रशिक्षण या आणखी कार्यशाळा घेतल्याचे समजते. यामुळे निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ कार्यशाळा चालेल अशी अपेक्षा असतानाच दु.१ वाजेपर्यंतच ही प्रशिक्षणे पार पडले. कार्यशाळेला डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. प्रभाकर क्षीरसागर,निपुण पुणे मॉडेल स्कूलच्या जिल्हा परिषद समन्वयिका श्रेया बॅनर्जी,मुख्यमंत्री फेलोशिप जिल्हा परिषदचे चेतन भालके यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेची संपूर्ण जबाबदारी असणारे पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीसाठी पुणे येथे गेल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेला शिक्षण अधिकारी गोविंद लाखे,राजेंद्र कुंजीर,केंद्रप्रमुख जितेंद्र कुंजीर,सुरेखा कामथे,मंगल कामठे,चिंतामण अद्वैत,प्रवीण इंदलकर,दीपश्री वाणी,विषयतज्ञ भरत जगदाळे, दीपक पाटील, प्रतिमा दळवी, प्रज्वला अंबुरे,अश्विनी हुंदे आदि उपस्थित होते.
कार्यशाळा सोडून बाहेरच वावर?
पुरंदर तालुक्यातील एकूण २१८ शाळांतील २१८ मुख्याध्यापक आणि २१८ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असे ४३६ जणांसाठी ही कार्यशाळा होती. मात्र या कार्यशाळेला एकूण फक्त ६ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते. अनेक मुख्याध्यापकही अनुपस्थित असल्याचे समजते तर उपस्थितांचाही कार्यशाळा सोडून बाहेरच वावर अधिक पाहावयास मिळाला तर काहीजण सह्या करून परत गेल्याचे समजते.
आमची जी माहिती होती ती दोन तासांत आम्ही दिली इतर दिवसभराच्या कार्यशाळेबाबत आम्हाला माहिती नसून संबंधित शिक्षण विभागाच्या प्रतिनिधीशी आपण संपर्क साधावा.
-डॉ. प्रभाकर क्षीरसागर, ज्येष्ठ अधिव्याखाते, डाएट
शिवरीत प्रशिक्षणास पालकांचा विरोध...
शिवरी विद्यालयात अद्ययावत सभागृह असल्याने येथे शाळेच्या वेळातच कायमस्वरूपी शिक्षण विभागाच्या वतीने अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याला येथील पालकांचा तीव्र विरोध असून यातून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक करीत आहेत.
शिक्षण विभागाने आदेश केल्याने येथे कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून द्यावे लागत आहे; मात्र याला पालकांचा होणारा विरोध पाहता यापुढे असे कार्यक्रम येथे घेऊ नये असे आपण शिक्षण विभागाला आज तोंडी कळविले आहे तर लवकरच पत्र व्यवहार करणार आहे.
-रमेश महाडीक, मुख्याध्यापक, महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय, शिवरी
शिवरी (ता. पुरंदर) : येथे कार्यशाळेदरम्यान शिक्षकांच्या वाहनांनी भरलेला शाळा परिसर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.