बिबट प्रवण क्षेत्रात पिकांना द्या दिवसा पाणी
पुणे, ता. ८ : तेजेवाडी (ता. जुन्नर) येथील १२ एकर गायरानावर उभारलेल्या चार मेगावॉट क्षमतेच्या सौर प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील हिवरे बुद्रुकसह पंचक्रोशीतील गावांतील शेतीपंपांना आता दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी यापुढे रात्री शेतीत जाण्याची गरज भासणार नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ हाती घेतली आहे. या योजनेतून राज्यात १६ हजार मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प होत आहे. त्यातून तयार झालेली वीज शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे. या योजनेतूनच जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत ५ किलोमीटर परिघातील तेजेवाडी येथे सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात तयार झालेली वीज हिवरे बुद्रुक उपकेंद्राला जोडून त्याअंतर्गत येणाऱ्या १० गावांना दिवसा विजेचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या हस्ते प्रकल्प नुकताच कार्यान्वित करण्यात आला.
तेजेवाडी हा मंचर विभागातील तिसरा सौर प्रकल्प आहे. यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील पेठ व जुन्नर तालुक्यातील नेतवड येथे अनुक्रमे ४ व ८ मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण करून तेथील स्थानिक शेतकऱ्यांना महावितरणने कायमस्वरूपी दिवसा वीज उपलब्ध करून दिली आहे. या भागात बिबट्यासह अनेक जंगली श्वापदे आहेत. पूर्वी रात्री-अपरात्री मिळणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता सौर वाहिनी योजनेतील प्रकल्प पूर्ण झाल्याने या भागात शेतीला दिवसा वीज मिळणार आहे.
या गावांना होणार फायदा
तेजेवाडी, ओझर, हिवरे बु., हिवरे खु., शिरोली खु., शिरोली बु., कुरण, ढोळवाडी, भोरवाडी