उमेदवारी जाहीर करण्याबाबत 
सर्वच पक्षांची सावध भूमिका

उमेदवारी जाहीर करण्याबाबत सर्वच पक्षांची सावध भूमिका

Published on

उमेदवारी जाहीर करण्याबाबत
सर्वच पक्षांची सावध भूमिका

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

पिंपरी, ता. २९ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (ता. ३०) शेवटचा दिवस आहे. तरीही कोणत्याही पक्षाने सोमवारी (ता. २९) सायंकाळी सातपर्यंत उमेदवार याद्या जाहीर केल्या नव्हत्या. भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले ‘इनकमिंग’, महायुती अथवा महाविकास आघाडी व संभाव्य नवीन समिकरणांमुळे बंडखोरी टाळण्यासाठी त्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते. मात्र, त्यांच्यासह अन्य पक्ष नेतृत्वाला स्थानिक आघाड्या व प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार? याचा अंदाज येत नसल्यानेही उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे. असे असले तरी ऐनवेळी धावपळ नको म्हणून काहींनी पक्षांचे नाव वापरून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातच जाहीर केले होते. त्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दुजोरा दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादीने तयार करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह एकत्र लढणार असल्याचे रविवारी (ता. २८) तळवडेत झालेल्या प्रचार सभेत जाहीर केले. मात्र, कोण किती जागा लढविणार? यासह जागा वाटपांबाबतही सोमवारी (ता. २९) रात्री आठ वाजेपर्यंत जाहीर केले नव्हते.
भाजपचीही हीच स्थिती होती. भाजपने १२८ पैकी १४ जागा शिवसेनेला देऊन काही जागांवरील उमेदवार बदलण्याबाबत सुचविले होते. मात्र, त्यास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे मित्र पक्ष आरपीआयला (आठवले) तीन जागा देऊन १२५ जागांवर लढण्याचे भाजपने ठरविले आहे. मात्र, त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी सावध भूमिका घेत उमेदवार यादी जाहीर करण्यास विलंब केला आहे. काहींना प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असणार? याचा अंदाज नसल्याने त्यांनी जागा वाटप व उमेदवार यादी प्रलंबित ठेवली आहे.

असेही काही निर्णय आणि गणिते
- भाजप, शिवसेना व आरपीआय (आठवले) युती म्हणून जागा लढविणार असल्याची चर्चा होती. २०१७ च्या निवडणुकीत जिंकलेल्या दोन जागांवर शिवसेना ठाम आहे. त्या देण्यास भाजप तयार नाही. परिणामी भाजप व शिवसेनेचे जागा वाटपाचे गणित बिघडले. त्यांची युती होणे मुश्कील झाले. आरपीआयला (आठवले) मात्र तीन जागा देण्यास भाजप तयार आहे. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र तर भाजप व आरपीआय (आठवले) युती म्हणून लढण्याची शक्यता आहे.
- दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने महाविकास आघाडीतही फूट पडल्याचे चित्र आहे. त्यांच्यासोबत लढायची की नाही, याबाबत कॉंग्रेसची भूमिका अद्याप ठरलेली नाही. शिवाय, मुंबईप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्येही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र लढण्याचे कोणतेही संकेत सांयकाळी चारपर्यंत नव्हते.
- दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार असल्याने महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी नवीनच आघाडी करण्याचे नियोजन केलेले दिसते. मनसे व राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी चारही पक्षांनी ठरवले आहे. मात्र, त्यांनीही जागा वाटप व संभाव्य यादी सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर केलेली नव्हती.
- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सोमवारी मौलवींच्या कार्यक्रमानिमित्त पिंपरीत आले होते. मात्र, निवडणुकीसंदर्भात काहीही ते बोलले नाहीत. निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार शहर संघटनेला दिले आहेत. त्यानुसार वंचितने सुमारे ८० जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचे नियोजन केले असल्याचे एका स्थानिक पदाधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com