लोकसेवा, हेलिओस, इफेंन्ट जिसस, बिल्लाबोंग उपांत्य फेरीत
पुणे, ता.२४ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.२४) उपांत्यपूर्व फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. फुलगावमधील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, वडगावचे हेलिओस स्कूल, वाकड येथील इफेंन्ट जिसस स्कूल आणि हडपसरच्या बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ‘लोकसेवा’ च्या वापा वालीम याने दमदार चार, नाखेन कोन्याक याने दोन तर ‘इफेंन्ट जिसस’च्या स्टीफन कुमार याने दोन गोलांचा तडाखा देत सामना एकतर्फी केला.
कात्रजच्या भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सोमवारी १४ वर्षांखालील मुलांचे पाच सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये इन्फेंट जिसस आणि कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना खेळविण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इन्फेंट जिससच्या खेळाडूंकडून आक्रमक खेळाची धार कायम ठेवत मैदानावर वर्चस्व प्रस्थापित केले. १५ व्या मिनिटाला चैतन्य पांगुल याने पहिला गोल केला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात स्टिफन कुमार याने सलग दोन करत इन्फेंट जिससने मिलेनियमवर ३-० असा एकतर्फी विजय मिळविला.
यानंतर कोंढव्याची पी.जी.के.एम स्कूल आणि हडपसरच्या बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा अटीतटीचा दुसरा सामना रंगला. दोन्ही संघांकडून आक्रमण आणि बचाव यांचा सुरेख खेळ बघायला मिळाला. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये बिल्लाबोंगने पी.जी.के.एम.वर ४-३ अशी मात देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
गौतमचा निर्णायक खेळ
वडगावमधील हेलिओस स्कूल आणि धायरीच्या डी.एस.के स्कूलमध्ये झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हेलिओसने विजय प्राप्त केला. सामन्याच्या सुरुवातीला डी.एस.के.च्या संघाने अचूक पासिंग, वेगवान हल्ल्याच्या जोरावर आरीत पंडित याने एक गोल करुन संघाचे खाते उघडले. पण, अतिरिक्त एक मिनिटात ‘हेलिओस’च्या गौतम चव्हाण याने अचूक गोल करत संपूर्ण सामन्याचे पारडे फिरवत सामना बरोबरीला आणला. पेनल्टी शूटआऊटमध्ये ‘हेलिओस’ने डी.एस.के.चा ४-२ असा पराभव केला. दरम्यान, या अगोदर बंड गार्डनच्या जे.न.पेटिट टेक्निकल स्कूल आणि वडगावच्या हेलिओस स्कूलमध्ये उप उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. त्यामध्ये हेलिओसच्या वेदस्व काकडे याने निर्णायक गोल करत संघाला १-० असा विजय मिळवून दिला.
‘लोकसेवा’कडून गोलांचा धडाका
लोकसेवा इंग्लिश मीडिअम स्कूल आणि आंबेगाच्या सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात गोलांचा अक्षरशः पाऊस पडला. ‘लोकसेवा’ संघाने सात धडाकेबाज गोल करत प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला. सामन्याची सुरुवात होताच ‘लोकसेवा’च्या खेळाडूंमध्ये आक्रमक खेळाची झलक दिसली आणि पहिल्याच दहा मिनिटांत वापा वालिम याने पहिला गोल नोंदवत वर्चस्व प्रस्थापित केले. संपूर्ण सामन्यात ‘लोकसेवा’च्या वापा वालिम ४, नाखेन कोन्याक २ आणि दिलात्सो नागाडंग याने एक गोलची भर घातली आणि सामना एकतर्फी बनवला. अखेरीस ‘लोकसेवा’ने सिंहगड स्प्रिंग डेलवर ७-० च्या भक्कम फरकाने विजय मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

