सर्वसामान्यांचा लोकनेता, जुन्नरचे सक्षम नेतृत्व

सर्वसामान्यांचा लोकनेता, जुन्नरचे सक्षम नेतृत्व

Published on

जुन्नर तालुक्याचे भावी आमदार, तालुक्याच्या नेतृत्वासाठी उत्तम आणि सक्षम पर्याय म्हणून म्हणून आज माऊली खंडागळे यांच्याकडे पाहिले जात आहे. निष्कलंक व्यक्तिमत्त्व, नवीन चेहरा, एकनिष्ठ, प्रामाणिक म्हणून आमदारकीसाठी माऊलींच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. स्वतःला नेता नव्हे तर एक सच्चा कार्यकर्ता समजणाऱ्या माऊलींविषयी प्रचंड आदर जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे. आज माऊलींचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनपट उलगडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.
........................
मांजरवाडीसारख्या एका छोट्या खेडेगावात माऊली खंडागळे यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावाला घेऊन माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी ते प्रभावित होऊन त्यांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड आत्मीयता निर्माण झाली. माऊलींचे भांडुपमध्ये १९८० ते १९८४ या काळात आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. याच काळात वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी त्यांना मोठे आकर्षण निर्माण झाले आणि त्यातूनच ते शिवसेनेच्या विचारधारेकडे ओढले गेले.

उपशाखाप्रमुख पदापासून यशस्वी राजकीय घोडदौड
नामदार शाबीर भाई शेख यांच्या माध्यमातून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्याचे काम सुरू झाले होते आणि तरुण कार्यकर्ते शिवसेनेच्या शाखा स्थापन करण्यासाठी जिवाचं रान करत होते. माऊली हे १९८५ मध्ये गावाला येऊन पुढील शिक्षण घेऊ लागले. बारावीला असताना त्यांनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन गावात बैठक घेऊन शिवसेनेची शाखा मांजरवाडीत स्थापन करण्याचे ठरले. त्यावेळी पूर्वेकडची १४ गावे मतदानासाठी आंबेगाव तालुक्यात होती. स्वर्गीय अविनाश रहाणे हे त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख म्हणून सक्रिय होते. मंचरच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मांजरवाडीत आणून त्यांच्या हस्ते माऊलींनी शिवसेनेची शाखा स्थापन केली. शाखा प्रमुख म्हणून सूर्यकांत थोरात यांची तर माऊली खंडागळे यांना या शाखेचे उपशाखाप्रमुख पद देण्यात आले आणि तेथूनच माऊलींच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाची यशस्वी घोडदौड सुरू झाली.

माऊलींमुळे वाड्यावस्त्यांवर वीज
शाखा स्थापनेनंतर माऊलींचा गावातील विविध कार्यक्रमांमध्ये व गाव बैठकीत सक्रिय सहभाग हळू हळू चांगलाच वाढू लागला. मंचरला कॉलेजला असताना अविनाश रहाणे यांच्यासोबत काम करताना माऊलींच्या कामाची व्याप्ती वाढत गेली. याच काळात माऊली हे कॉलेजला शेवटच्या वर्षात असताना मांजरवाडी गावात काही वस्त्यांमध्ये वीज नव्हती यावेळी एमएसईबीमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नागटिळक काम पाहत होते. आमच्या विभागात वीज का नाही? असा जाब विचारत माऊली खंडागळे त्यांच्यासमोर बसले आणि तेथूनच त्यांच्या सामाजिक कामाला खरी सुरुवात झाली. त्यांच्या परिसरात वीज आणण्यासाठी सर्वांना एकत्र आणून त्यांनी विशेष प्रयत्न केले.

विवाह सोहळा, हरिनाम सप्ताह, यात्रांमध्ये सहभाग
गावातील एखादे मंडळ असेल, मळ्यात गणपती बसवणे असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करणे असेल या सगळ्या माध्यमातून माऊलींची सामाजिक कामाला सुरुवात झाली. पदवीनंतर १९९०-९१ पासून गावामध्ये आदरणीय बाबाजीशेठ नेहरकर यांच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, मुक्ताई देवीची यात्रा यामध्ये माऊली उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागले. अशाच छोट्या मोठ्या कार्यक्रमातील सहभागातून हळूहळू त्यांच्या कामाचा व्याप वाढत गेला. गावात वीज नाही, शेजारी वीज नाही, कोणाचा अपघात झाला तर एसटी बस येत नसेल, अशा विविध सामाजिक प्रश्नांमध्ये माऊली लक्ष घालून ते प्रश्न सोडवू लागले. या दरम्यान सर्व सामान्य लोकांचा त्यांच्याशी विविध प्रश्नांसाठी संपर्क होऊ लागला.

जलवाहिनीद्वारे सर्वांपर्यंत पोचवले पिण्याचे पाणी
मांजरवाडी गावामध्ये १९९५ मध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होती. त्यावेळी माऊली खंडागळे यांना सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९९५ १९५ ते २००० पर्यंत सरपंच म्हणून माऊलींनी काम
केले आणि याच काळात त्यांच्या कामाला चार चाँद लावण्याचे काम तत्कालीन कामगार मंत्री नामदार साबीरभाई शेख यांनी केले. त्यावेळी मांजरवाडी आणि परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती होती. मांजरवाडी गावात प्यायला पाणी नव्हते. त्यावेळी नारायणगावची पाणी योजना सुरू होती. साबीर भाईंना भेटून माऊलींनी त्यांच्याकडे मांजरवाडीसाठी पाणी योजनेची मागणी केली. साबीर भाईच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत मांजरवाडीत ८३ लाखांची पाणी योजना मंजूर झाली. गावठाण वस्तीसह १३ किलोमीटर परिसरात जलवाहिनीद्वारे पिण्याचे पाणी माऊलींनी सर्वांपर्यंत पोचवले.

सरपंच म्हणून माऊली आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे काम करण्याची पद्धत गावकऱ्यांना भावली. साबीरभाईंच्या माध्यमातून गावात स्ट्रीट लाइट आणली. गावात व्यापारी गाळे बांधले. गावात समाज मंदिर बांधण्यात आले. गावात सातत्याने होत असलेल्या अशा छोट्या मोठ्या कामांसोबतच त्यांचे मित्र देखील मोठ्या प्रमाणात वाढले. आजूबाजूच्या गावांमधील सरपंच विविध गोष्टींसाठी माऊली खंडागळे यांचे मार्गदर्शन घेऊ लागले आणि त्यांचे कामाची व्याप्ती वाढतच राहिली.

आंदोलने जुन्नरमधील जनतेला भावली
माऊली हे १९९५ मध्ये सरपंच असताना महाराष्ट्रात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने शेतकऱ्यांना विहिरीवरून कृषी पंपासाठी मीटर सक्ती केली होती. त्यावेळी या मीटर सक्तीच्या विरुद्ध बाबाजीशेठ नेहारकर व माऊली खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील सात आठ गावातून दीड ते दोन हजार शेतकऱ्यांचा भव्य असा मोर्चा वीज वितरण कंपनीवर नेण्यात आला होता. या मोर्चात अनेक शेतकऱ्यांनी डोक्यावर मीटर घेऊन मीटर सक्तीचा निषेध नोंदवला होता. एकही रुपया देखील वीज बिल न भरण्याचे आवाहन या मोर्चात शेतकऱ्यांना केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नव्हती. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख म्हणून माऊली खंडागळे काम करत असताना देखील त्यांनी सत्ताधारी सरकारच्या विरोध शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा काढला होता. त्यांचा हा गुण वाखणण्यासारखा आहे. या मोर्चाची दखल सरकारला घ्यावी लागली होती. अशा अनेक गोष्टी किंवा अनेक अडचणीच्या काळात म्हणजे प्रसंगी स्वतःच्या शिवसेना पक्षाच्या सरकारच्या विरुद्ध देखील माऊली खंडागळे यांनी आंदोलने केली आणि हीच आंदोलने जुन्नर तालुक्यातील जनतेला भावली आहेत.

लोकाग्रहस्ताव लढविली पंचायत समितीची निवडणूक
स्वर्गीय अविनाश रहाणे यांनी माऊलींना १४ गावांचे उपतालुका प्रमुख पद दिले. मांजरवाडी, खोडद, हिवरेतर्फे नारायणगाव, येडगाव, वैशाखखेडे, वडगाव, कांदळी, शिरोली, सुलतानपूर, साळवाडी, निमगाव सावा, औरंगपूर, पारगाव, कावळ पिंपरी या गावांत काम करत असताना माऊलींचा जनसंपर्क प्रचंड वाढला. या गावात गेल्यानंतर नागरिक विविध समस्या माऊलींसमोर मांडू लागले, जुन्नर पंचायत समितीची २००७ ला निवडणूक लागली. ही निवडणूक लढविण्याचे तर माऊलींच्या ध्यानी मनी देखील नव्हते. सोडत झाली आणि पंचायत समितीची ही जागा कांदळी गणात खुल्या वर्गासाठी आली. या दरम्यान अनेक नागरिकांनी आणि मित्रांनी माऊलींना स्वतःहून संपर्क साधून, ‘माऊली तुम्ही ही पंचायत समिती लढवा.’ असा आग्रह धरला. माऊलींनी आतापर्यंत केलेल्या कार्याची परीक्षा घेण्याचा हा काळ होता असे म्हटले तरी चालेल. ‘मला पंचायत समिती लढायची नाही.’ अशी भूमिका माऊलींनी घेतली. पण ही बातमी जेव्हा मांजरवाडी गावात आली तेव्हा मात्र पंचायत समिती लढविण्याचा आग्रह खूपच वाढला. माऊलींच्या परस्पर पंचायत समिती गणातील सर्व गावांमधून माऊलींचा प्रचार देखील सुरू झाला आणि अखेर सर्वांच्या आग्रहापुढे माऊलींनी पंचायत समिती लढविण्याची तयारी दाखवली. मांजरवाडी गावात झालेल्या गावबैठकीत माऊलींना पाठिंबा देऊन माऊलींचे काम करण्याचे ठरले. कुठल्याही प्रकारची प्रभावी अशी राजकीय यंत्रणा नाही. कुठल्याही मोठ्या निवडणुकीचा अनुभव नाही. त्यातच ही १४ गावे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाणारी, अशा प्रतिकूल परिस्थितीत माऊलींवर या १४ गावांनी प्रेम दाखवत त्यांना चांगल्या मतांनी निवडून दिले.

पंचायत समितीला फार मोठा निधी नसल्याने तरीही जेवढं शक्य झालं तेवढ्या मोठ्या प्रमाणात माऊलींनी लोकांचे प्रश्न पोटतिडकीने सोडविण्याचा प्रयत्न केला. २००७ ते २०१२ हा पंचायत समितीचा कार्यकाळ संपला आणि २०१२ ची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागली. जुन्नर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या आठ जिल्हा परिषद गटांपैकी सगळ्या जागा राखीव झाल्या आणि फक्त बोरी कांडली जिल्हा परिषद गट हा एकच गट खुल्या वर्गासाठी आला आणि त्याच वेळेला माऊलींचे तिकीट निश्चित झाले. सर्वत्र ही बातमी पोचली आणि पक्षाने देखील माऊलींवर मोठा विश्वास ठेवून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला. यावेळी सुद्धा या १४ गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे प्रस्त असतानाही भरघोस मतांनी माऊलींचा या निवडणुकीत विजय झाला.

बोरी- कांदळी गटात विकास कामाचा डोंगर
जिल्हा परिषदेमध्ये २०१२ ते २०१७ या कालावधीत काम करताना बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये विकासकामे करण्याचा माऊलींनी प्रयत्न केला. रस्ते, दिवाबत्ती, आरोग्याचे प्रश्न, काही शालेय इमारती, आरोग्य केंद्र, पाणी अशा जिल्हा परिषदेच्या किंवा वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आणि त्याचंच फलित म्हणून २०१६ ला माऊलींना जुन्नर तालुक्याचे शिवसेना तालुकाप्रमुख पद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देऊन त्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर माऊलींना सर्व तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचा नगराध्यक्ष करण्यामध्ये माऊली खंडागळे आणि इतर सगळ्यांनीच सिंहाचा वाटा उचलला. जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून माऊली खंडागळे यांनी बोरी-कांदळी जिल्हा परिषद गटात विकास कामाचा डोंगर उभा केला आणि बोरी-कांदळी जिल्हा परिषद गट हा जुन्नर तालुक्यात विकासाचे रोल मॉडेल म्हणून निर्माण केला. २०१७ ला जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या गटांचे विभाजन झाल्यानंतर माऊलींना कोणत्याही गटातून उभे राहता आले नाही. परंतु तरीही माऊलींनी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांत जाऊन पक्षाचा प्रचार केला त्याही वेळेला शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात माऊलींना बऱ्यापैकी यश मिळाले. हे काम निश्चितच अवघड होते पण ते आव्हान माऊली आणि
पक्ष संघटनेतील सर्व सहकारी स्वीकारत गेले आणि त्यात यश मिळत गेले, त्याचप्रमाणे जुन्नर पंचायत समिती देखील शिवसेनेच्या ताब्यात आली.

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण...
माऊलींच्या व इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात गावोगावी पक्ष संघटन वाढत गेले. या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य असूनही माऊली लोकांच्या अडचणी सोडवण्याचे काम सातत्याने करत राहिले. त्या अडचणीत सोडवत असताना प्रत्येक वेळी पक्षाची भूमिका मांडत लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतमाल बाजारभाव, दुधाचा दर, रस्त्यांच्या बाबत काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांसाठी प्रशासनाविरुद्ध आंदोलने करून प्रशासनाला जाब विचारण्याचे काम माऊली खंडागळे यांनी केले. याकाळात माऊलींनी केलेल्या काही आंदोलनांमध्ये माऊलींवर गुन्हे देखील दाखल झाले. त्यापैकी काही केसेस निल झाल्या तर काही अजूनही सुरू आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या पद्धतीने त्यांनी आजही त्यांचे काम सुरू ठेवले आहे.

निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे काम
शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहीर हे एक उत्तम प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माऊली आजही प्रयत्न करत आहेत. यापूर्वकाळात १९९० पासून येणारी प्रत्येक लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती किंवा साखर कारखान्याची निवडणूक असेल या सगळ्याच निवडणुकांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे काम पक्षाच्या वतीने माऊली खंडागळे यांनी अत्यंत प्रखरपणे केले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत आग्रही...
बाजार समितीची निवडणूक २०२३ रोजी लागली. तेव्हा असे वाटत होते की, तालुक्यामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना कोणी आव्हान देणार नाही. परंतु माऊलींनी राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना व सर्व पक्षिय राजकीय नेत्यांना या सर्वांना एकत्र घेऊन माऊलींनी बाजार समितीला एक पॅनेल तयार केले आणि त्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक लढवली. सगळ्यांना असे वाटत होतं की ही एकतर्फी निवडणूक होईल. परंतु माऊलींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रस्थापितांच्या विरुद्ध बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पाच जागा मिळविल्या. बाजार समितीमध्ये पक्षाची व शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचे काम माऊली करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माऊली आणि त्यांचे सहकारी सतत आग्रही आहेत.

मराठा आरक्षणासाठी उभारले आंदोलन
जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका असल्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्यांची जाणीव माऊली खंडागळे यांना आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या बाजारभावाची समस्या, विजेची समस्या असो किंवा कोणत्याही समस्या असोत त्या सोडवण्यासाठी माऊली खंडागळे हे शिवसेना पक्ष म्हणून सातत्याने काम करत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान माऊलींनी जुन्नर तालुक्यात आंदोलन उभारले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जुन्नर तालुक्याचे दौऱ्यावर असताना माऊली खंडागळे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आळेफाटा येथे कोणाची भीड वाढ न ठेवता मराठा आरक्षणासाठी अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. ही घटना महाराष्ट्रातील एकमेव घटना ठरली गेली.

जनतेच्या प्रेमामुळेच आजपर्यंतचा प्रवास यशस्वी...
माऊली खंडागळे यांना या सामाजिक कार्यात शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे, विभागीय संपर्कनेते खासदार संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर तसेच तालुक्यातील शिवसेना संघटनेच्या सर्व पदाधिकारी युवासेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांचा व सर्व शिवसैनिकांचे या सर्वांचे मोलाचे पाठबळ व सहकार्य मिळत आहे. जुन्नर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांचे आणि जनतेचे माऊलींवर प्रेम आहे. जनतेच्या प्रेमामुळेच खरंतर माऊलींचा आजपर्यंतचा हा प्रवास यशस्वी पार पडला आहे. या पुढच्या काळात देखील लोकांसाठी काम करायचे हीच खरे तर माऊलींची मनोकामना आहे. म्हणूनच अशा अष्टपैलू व निष्ठावंत व्यक्तिमत्त्वाला जन्मदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

संकलन : श्री.संतोष गांढूळ, मा.अध्यक्ष, श्री जगदंबा पतसंस्था, मांजरवाडी
श्री. संतोष मोरे, उपसरपंच, ग्रामपंचायत मांजरवाडी, (ता. जुन्नर)
17041

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com