एसटीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा बंद होणार !

एसटीच्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा बंद होणार !

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २५ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीनही मध्यवर्ती कार्यशाळा बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यादिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यात मध्यवर्ती कार्यशाळेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत (ता. २६) पाच विभागांचे पसंतीक्रम देण्याचे आदेश महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी काढले आहेत.

एसटी महामंडळाच्या दापोडीसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर-हिंगणा येथे मध्यवर्थी कार्यशाळा आहेत. येथे नवीन बस बांधणीचे काम, टायर रिमोल्डिंग (दापोडी येथे राज्यातील एकमेव) बस पेंटिंग, इंजिन रिकंडिशनिंगसह इतर अनेक कामे केली जातात. एसटीच्या स्थापनेपासूनच बस बांधणीआणि इंजिन रिकंडिशनिंगची (इंजिन दुरुस्ती) कामे मध्यवर्ती कार्यशाळेत केली जातात. मात्र, प्रशासनाने नवीन बस खरेदी करतानाच बांधणीचे कामही संबंधित कंपनीकडून करुन घेण्याचा निर्णय घेतल्याने नवीन चॅसिसवर बस बांधणीचे काम मध्यवर्ती कार्यशाळेत होत नाही. पण, जुन्या चॅसिसवर नवीन बस बांधणीचे काम सुरू आहे. तीनही मध्यवर्ती कार्यशाळेत दिवसाला सरासरी सहा बसेसची बांधणी होते.
दरम्यान, दापोडीसह तीनही कार्यशाळेत साधरणतः सुमारे १,१०० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची बदली इतरत्र करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना पसंतीक्रम देण्यास सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची बदली केल्यावर येथील बस बांधणीसह इतर सर्वच कामकाज ठप्प होणार आहे. मध्यवर्ती कार्यशाळांच्या जागेवर विकासकांचा डोळा असून त्यांना फायदेशीर होईल, असे निर्णय प्रशासन घेत असल्याचा आरोप काही कामगार संघटनांनी केला आहे.

एसटी मध्यवर्ती कार्यशाळेची स्थापनाच बस बांधणीसाठी झालेली आहे. या कार्यशाळेत केवळ एसटीच नव्हे, तर बाहेरच्याही अनेक बसेसची बांधणी झाली आहे. येथील कर्मचारी कुशल आहेत. कार्यशाळा बंद करणे किंवा कामगारांच्या बदल्यांना संघटनेचा तीव्र विरोध आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

विभागीय कार्यशाळा - कर्मचारी संख्या
पुणे-दापोडी - ३७०
छत्रपती संभाजीनगर -चिखलठाणा - ५१०
नागपूर-हिंगणा - २००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com