खेड एमआयडीसीत ठेकेदाराचे काळे धंदे तेजीत

खेड एमआयडीसीत ठेकेदाराचे काळे धंदे तेजीत

Published on

महेंद्र शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कडूस, ता. २७ : म्हाळुंगे पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी महावितरणचे रोहित्र काढून परस्पर खासगी रोहित्र बसविण्याबाबत एका खासगी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला होता. अजूनही काहीजणांचे खात्यातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काळे धंदे सुरूच आहेत. महावितरणच्या नादुरुस्त रोहित्राच्या जागी कोणतीही परवानगी न घेता अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन परस्पर दुसरे खासगी रोहित्र बसवले जात आहे. यासाठी चोरी झालेल्या रोहित्रांचा वापर होत असल्याची चर्चा कंत्राटदार वर्तुळात आहे. हा धंदा खेड तालुक्याच्या एमआयडीसी भागात तेजीत आहे.

रोहित्राच्या वाढत्या चोऱ्यांमागे खात्यातील काही बडे मासे, कर्मचारी व खासगी कंत्राटदारांमध्ये संगनमत असल्याची चर्चा ‘महावितरण’च्या वर्तुळात आहे. या ठेकेदारांचा वावर महावितरण कार्यालय व अधिकाऱ्यांच्या आसपास पाहायला मिळतो. यात सहभागी असलेले ठेकेदार महावितरणने बसविलेल्या रोहित्राच्या जागी कोणतीही परवानगी न घेता परस्पर दुसरे खासगी रोहित्र बसवत आहेत. यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम घेऊन आपल्याकडील जुने किंवा दुरुस्त केलेले रोहित्र पुरवीत आहेत. हा धंदा एमआयडीसी भागात तेजीत आहे. अशाच एका घटनेबाबत १० सप्टेंबर २०२३ रोजी पूजा इंजिनिअरिंग आणि कंत्राटदार रविटेक इंजिनिअर या दोन कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महावितरणने बसविलेले मूळ २०० केव्हीए क्षमतेचे रोहित्र रविटेक इंजिनिअर्स या कंत्राटदारामार्फत परस्पर बदलले, तसेच नवीन खासगी रोहित्र बसविले होते. नवीन बसविलेले रोहित्र सुद्धा सदोष होते. त्याची कोणतीही पूर्वचाचणी न करता बदलल्याने चाकण एमआयडीसीमधील निघोजे येथील रेणुका फिडरची सर्व वीजवाहिनी बंद झाली होती. त्यामुळे सुमारे ३५० कंपन्यांचा वीजपुरवठा तब्बल ३२ मिनिटे बंद झाला. यात महावितरणचे २२ लाख ३० हजार २७२ रुपयांचे नुकसान झाले होते. हा प्रकार लक्षात येताच चाकण उपविभागाचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे यांच्या आदेशानुसार सहायक अभियंता संजय बरगली बेडदुर्गे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात फिर्याद दिली होती.

वाकी येथील एका हॉटेलच्या काही लाखांच्या वीज बिलाच्या बाबतीत अशीच ‘सेटलमेंट’ झाल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. या हॉटेलचा मीटर जळालेला दर्शवून खात्याची दिशाभूल करीत महावितरणला लाखो रुपयांना चुना लावला व बदल्यात मोठी बक्षिसी मिळवली, असे अनेक कारनामे तालुक्यात सुरू आहेत. एका खासगी कंत्राटदाराने औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोन लगतच्या ग्रामीण भागातील गावात इंडस्ट्रिअल शेड वजा गोदाम उभारले आहे. या गोडावूनमध्ये जुन्या रोहित्रांचा साठा आहे. हा साठा या कंत्राटदारांकडे कसा आला, याची सखोल व गुप्त चौकशी होण्याची गरज आहे. दरम्यान, रोहित्रांच्या चोऱ्यांप्रकरणी महावितरण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

वीज बिलाची भीती दाखवून फसवणूक
चाकण परिसरात सप्टेंबर २०२३ मध्ये महावितरणच्या नावाखाली बनावट कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे परस्पर वीज मीटर बदलले होते. याबाबत तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या टोळीने लाखो रुपयांच्या वीज बिलाची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक केली होती. हे कारनामे करणारी मंडळी महावितरणच्या संपर्कातील असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. विभागातील काही बड्या मंडळींकडून यांना पाठबळ मिळत आहे.

दृष्टिक्षेपात
- काही खासगी ठेकेदारांकडे महावितरणच्या जुन्या रोहित्रांचा साठा
- रोहित्रावरील माहिती दर्शविणारी लोखंडी पट्टी काढली जाते,
- रोहित्राला रंगरंगोटी करून महावितरणची ओळख पुसली जाते व ते पुन्हा वापरले जाते.
- जुन्या रोहित्रांचा साठा या ठेकेदारांकडे आला कोठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com