जिल्ह्यातील शिक्षकांची आता मोबाइलद्वारे हजेरी
पुणे, ता. ९ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, त्यात आता बदल करून मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीवर अधिक बारकाईने लक्ष राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत पुढील काही दिवसांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. यापूर्वी शिक्षकांची हजेरी ‘बायोमेट्रिक हजेरी प्रणाली’च्या माध्यमातून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला होता. मात्र, ही प्रणाली खर्चिक ठरत असल्याने त्याऐवजी जिओफेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइलद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या प्रणालीमुळे शिक्षकांना शाळेत वेळेवर उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच हजेरी नियमित होईल आणि अनुपस्थितीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय सकारात्मक ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. परंतु, त्यांच्यासमवेत प्रशासनानी बैठक घेऊन शंकाचे दूर केले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शिक्षकांबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कर्मचाऱ्यांचीही ऑनलाइन हजेरी करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील काही शाळांना अचानक भेटीमध्ये शाळेत केवळ विद्यार्थी उपस्थित असून शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले होते. शिक्षक वेळेत न आल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर शिक्षकांची वाट पाहत बसावे लागत होते, असा प्रकार शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतः पाहिला होता. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात ही प्रणाली राबवण्यासाठी सुमारे कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने, त्याऐवजी जिओफेन्सिंग प्रणालीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.
अशी होणार मोबाइलवरून हजेरी...
शिक्षकांना देण्यात येणारे मोबाइल ॲप एक आभासी सीमा निश्चित केली जाते. ही सीमा निश्चितीसाठी जीपीएसचा वापर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती या आभासी हद्दीत प्रवेश करते किंवा त्यातून बाहेर पडते, तेव्हा त्यांची नोंद राहते. शिक्षकांच्या बाबतीत, शाळेचा परिसर एक विशिष्ट भौगोलिक हद्द म्हणून निश्चित जाणार आहे. शिक्षक या हद्दीत आल्यानंतरच अॅपमध्ये हजेरी लावू शकतील.
जिल्ह्यातील एकूण शाळा - ३ हजार ५४६
जिल्ह्यातील एकूण शिक्षक - १० हजार ८३०
दृष्टिक्षेपात
- हजेरीचा एकत्रित डॅशबोर्ड जिल्हा परिषदेत असणार
- सर्व शिक्षकांची उपस्थिती दररोज मिळणार, परिणामी प्रशासकीय कामे सोपी होण्यास मदत
- हजेरीमध्ये बदल करता येणार नसल्याने पारदर्शकता येणार
- शिक्षकांची उपस्थिती अचूकपणे नोंदवली जाणार, कारण ती प्रत्यक्ष लोकेशनवर आधारित असणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळेमध्ये शिक्षकांची हजेरी जिओफेन्सिंगच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. बायोमेट्रिकचा पर्याय खर्चिक ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शिक्षकांची उपस्थिती एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.