पशुवैद्यकीय दवाखान्यांचे रुपडे पालटणार
पुणे, ता. २५ : ‘‘जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पशुपालकांच्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखान्यांची दर्जा चांगला असण्याची गरज आहे. जिल्ह्यात १६ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या नवीन ‘मॉडेल पशुवैद्यकीय दवाखाने’ बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय मंजुरी झाली आहे. यामुळे आधुनिक सुविधा, तत्काळ उपचार आणि प्रयोगशाळांसह इतर सुविधा दवाखान्यात पशुपालकांना उपलब्ध होतील. त्याचबरोबर सध्याच्या २८ दवाखान्यांची दुरुस्तीही हाती घेण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
‘सकाळ’मध्ये ‘समस्यांच्या गर्तेतील पशुवैद्यकीय दवाखाने’ ही वृत्तमालिका मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची सद्यःस्थिती समोर आणली, याची प्रशासनाने दखल घेत तत्काळ दवाखान्यांच्या इमारती तसेच भौतिक सुविधांमध्ये दर्जात्मक सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
नवीन पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आधुनिक एक्स-रे मशिन, रक्ताच्या तपासणीसाठी आवश्यक उपकरणे, उपचार साहित्य अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे दवाखाने ‘मॉडेल पशुवैद्यकीय दवाखाने’ म्हणून विकसित केले जातील. पशुपालकांना वैज्ञानिक पद्धतीने सेवा देणे आणि उपचार प्रक्रियेला गती देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
येथे बांधणार नव्याने दवाखाने
नव्याने बांधण्यात येणाऱ्या दवाखान्यांमध्ये आंबेगाव तालुक्यातील वळती, खेडमधील डेहणे, इंदापूर तालुक्यातील बावडा, लाकडी, पिंपरी बुद्रुक, निमगाव केतकी आणि सणसर, तसेच बारामती तालुक्यातील मुर्टी, खांडज आणि सोनगाव यासह इतर गावांचा समावेश असणार आहे.
रांजणगाव, केडगाव, वेल्हा आणि पुरंदर येथील विद्यमान पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये एक्स-रे मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जखमी पशुधनाचे निदान प्रक्रियेला अधिक अचूकता आणि वेग येणार आहे. पशुधनाला उपचार सेवा गावपातळीवर अधिक प्रभावी आणि सुकर होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. दरम्यान, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडे असलेले जिल्ह्यातील ९५ दवाखाने नवीन आकृतीबंधानुसार जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व दवाखान्यांवर जिल्हा परिषदेचे नियंत्रण आले आहे.
दहा कोटींचा निधी
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) कडून इमारतींच्या बांधकामासह इतर बाबींसाठी दहा कोटी ९४ लाख रुपये दोन टप्प्यात देण्यात आले आहेत. यामुळे दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच निधीचा योग्य विनियोग करून नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती या आवश्यक उपकरणे आणि भौतिक सुविधांनी युक्त असतील असे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेचे दवाखाने - २२८
राज्याचे दवाखाने - ९५
नवीन आकृतीबंधानुसार झेडपीचे एकूण दवाखाने - ३२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

