माझा प्रभाग माझी जबाबदारी दीपक भोंडवे
विकासकामांतून समाजकार्याला गती
भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सचिव दीपक भोंडवे हे रावेत परिसरात राहणाऱ्या विविध समुदायांच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे सर्वमान्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा वाढावा यासाठी त्यांनी अनेक वर्षे विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांद्वारे लोकांना एका मंचावर आणले. त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि सर्वांप्रती आदरभाव यामुळे उत्तर भारतीय असोत किंवा मराठी बांधव सर्व समुदायांमध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे रावेत परिसरात सामाजिक एकात्मता अधिक बळकट झाली.
-----------
दीपक भोंडवे यांना सामाजिक भान हे कुटुंबातील वारकरी परंपरेतूनच लाभले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सेवा करण्याची पवित्र परंपरा त्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या जपली जात आहे. हरिपाठ सप्ताह, कीर्तन सोहळे यांसारख्या धार्मिक उपक्रमांमधून समाजात श्रद्धा, नैतिकता आणि एकोपा रुजवत राहण्याचे कार्य त्यांच्या परिवाराने सातत्याने केले आहे. कोणतीही ठोस राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांचे वडील मधुकर नथू भोंडवे यांनी कासारसाई-दारुंब्रे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. रावेत-किवळे परिसरातील विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन म्हणूनही त्यांनी लोकांच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला. त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची प्रेरणा घेत दीपक भोंडवे समाजकार्यात उतरले. राजकीय पाठबळ नसतानाही भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव म्हणून विविध घटकांच्या प्रश्नांसाठी ते झटत राहिले. शहरीकरणानंतर रावेत परिसरात मराठी आणि परप्रांतीय नागरिकांची वाढती उपस्थिती लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक संवादांद्वारे या सर्वांना एकत्र आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे रावेतमध्ये आज जी सद्भावना आणि एकात्मतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामागे भोंडवे यांचे अखंड सामाजिक योगदान ठळकपणे जाणवते.
स्वतंत्र टपाल कार्यालय
रावेत-किवळे परिसरातील नागरिकांसाठी स्वतंत्र टपाल कार्यालय नसणे ही अनेक वर्षांची समस्या होती. परप्रांतीय असोत किंवा स्थानिक मराठी कुटुंबे सर्वांनाच पत्रव्यवहारातील अडचणी, सरकारी योजना मिळवण्यात होणारा उशीर आणि सततच्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. प्रशासनापर्यंत आवाज पोहोचत नव्हता आणि लोकांची ही मूलभूत गरज अपुरी राहत होती. ही वेदना ओळखून दीपक भोंडवे यांनी या भागासाठी स्वतंत्र टपाल कार्यालय मिळावे यासाठी धडपड सुरू केली. पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयात सातत्याने पाठपुरावा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच सरकारकडून मंजुरी मिळवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांनी निष्ठेने केले. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा निर्धार अखेरीस सफल झाला. आज रावेत-किवळे परिसरात स्वतंत्र टपाल कार्यालय सुरू झाले आहे. स्थानिक नागरिकांना मिळालेल्या या सुविधेमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील मोठा प्रश्न सुटला आहे. लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दीपक भोंडवे यांना संघर्षाचे समाधान जाणवते आणि हे यश त्यांच्या लोकसंग्रही, चिकाटीच्या कार्याचा जिवंत पुरावा ठरत आहे.
समाजकार्याला आमदारांची साथ
रावेत-किवळे हा चिंचवड विधानसभा क्षेत्रातील वेगाने वाढणारा आणि जनसंख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर. येथील बदलत्या गरजा, नागरिकांच्या अडचणी आणि विकासाची तातडीची आवश्यकता ओळखून दीपक भोंडवे यांनी आपली जबाबदारी अधिक संवेदनशीलतेने पार पाडली. समाजातील प्रत्येक घटकासाठी काय आवश्यक आहे ?, कोणती कामे केली गेली पाहिजेत ? आणि कोणत्या सुविधा तातडीने उभ्या राहणे गरजेच्या आहेत ? याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्याप्रमाणे विकास कामांची सुस्पष्ट यादीच आमदार शंकर जगताप यांच्यासमोर ठेवली. या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी आणि त्यातून होणारी कायमस्वरूपी सोय लक्षात घेऊन भोंडवे यांनी आमदार निधीतून मदत मागितली. समाजहिताच्या या मागणीला त्वरित प्रतिसाद देत आमदार शंकर जगताप यांनी निधी देण्यास अजिबात वेळ लावला नाही. नागरिकांसाठी स्वतंत्र दवाखाना उभा राहून आरोग्यसेवा सुरू केली. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू झाले आणि त्यांना आपलेपणाचा नवा आधार मिळाला. खेळांच्या स्पर्धा घेण्यास योग्य असे सुसज्ज क्रीडांगण तयार झाले. चंद्रभागा कॉर्नर येथील उद्यानाचे सौंदर्य आणि सुविधा वाढल्या. रावेतच्या ग्रामदैवत देवस्थानाच्या नूतनीकरणासाठीही आवश्यक निधी मिळाल्याने ग्रामभक्तीचा दीप अधिक उजळला. लोकांच्या गरजा ओळखून भोंडवे यांचा पुढाकार आणि त्याला साथ देणारे आमदार जगताप यांचे नेतृत्व या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून रावेत-किवळे परिसरातील विकासाला नवे पंख लाभले आहेत.
महिला बहुउद्देशीय भवन
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सुरक्षित आणि सक्षम मंच मिळावा, या भावनेतून दीपक भोंडवे यांनी रावेत-किवळे परिसरात तब्बल सात हजार चौरस फुटांच्या विशाल जागेवर महिला बहुउद्देशीय भवनाची निर्मिती केली. या स्वप्नवत उपक्रमासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचा खर्च झाला. त्यातील २ कोटींचा महत्त्वपूर्ण निधी आमदार शंकर जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून दिला. या भवनाचे दरवाजे उघडताच अनेक महिलांच्या आयुष्यात नवे क्षितिज खुले होऊ लागले. कौशल्यविकास प्रशिक्षण, स्वावलंबनासाठी आवश्यक मार्गदर्शन, विविध उपक्रमांची सोय, या सर्वांद्वारे महिलांना स्वतःची ओळख घडवण्याची संधी मिळाली आहे. घर, संसार आणि जबाबदाऱ्यांच्या पलीकडे स्वतःसाठी उभे राहण्याचा आत्मविश्वास या भवनाने त्यांच्यात निर्माण केला.
विद्यार्थी, युवकांसाठी पुढाकार
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी दीपक भोंडवे यांनी उभारलेले उपक्रम म्हणजे या परिसराच्या सामाजिक विकासाची नवी वाटचाल ठरली. केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केले. त्यामध्ये ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कला-सामर्थ्याचे सुंदर प्रदर्शन केले. देशभक्तीची भावना जागवण्यासाठी त्यांनी एकता दौड अंतर्गत भव्य तिरंगा रॅली काढली. तरुणांच्या आरोग्यदायी खेळ संस्कृतीसाठी चंद्रभागा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सलग चार वर्षे दत्तकृपा चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले. शालेय मुलांसाठी चित्रकला, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये तब्बल २२०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. बेरोजगार युवकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या भव्य नोकरी महोत्सवात १५०० उमेदवार सहभागी झाले आणि त्यातील ८०० जणांना रोजगार मिळाला. दीपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनच्यावतीने चंद्रभागा कॉर्नर येथे क्रीडा प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात.
जनसेवेचा नवा आदर्श
स्वतःच्या हातून घडत असलेल्या सामाजिक कार्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी राजकीय बळ मिळावे, याकरिता दीपक भोंडवे यांनी प्रभाग क्रमांक १६ (रावेत-किवळे-विकासनगर-मामुर्डी-गुरुद्वारा) मधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची आहे. रावेत-किवळे परिसरातील अनेक नागरिकांना शिधापत्रिका नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळविताना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत होता. ही व्यथा समजून दीपक भोंडवे यांनी आपल्या भागातच शिधापत्रिका व नवीन राशन कार्ड मेळावा आयोजित केला. या उपक्रमातून ६५० हून अधिक नागरिकांना तत्काळ रेशन कार्ड मिळाले. रावेत, किवळे, मामुर्डी व विकासनगरातील ६५० नागरिकांना मोफत फास्ट टॅगचे वितरण करण्यात आले. शासन आपल्या दारी मोहिमेचा भाग म्हणून महसूल शिबिरे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागात आरोग्य शिबिरे घेऊन भोंडवे यांनी जनसंपर्क आणि जनसेवेचा नवा आदर्श निर्माण केला.
विविध उपक्रम आणि कार्यक्रम
स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदन आणि वृक्षारोपण, अभियंता दिनानिमित्त नामवंत अभियंत्यांचा सन्मान, शिवजयंती, शिक्षक दिन. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम, पथदिवे बसविणे, मोफत कोविड लसीकरण शिबिर, सवलतीत वॉटर प्युरिफायर वाटप,
दिवाळीनिमित्त घरोघरी पणत्या वाटप, माई बालभवन अंध संस्थेला आर्थिक मदत, बालगोपाळांसाठी बालजत्रा व खाऊगल्ली
उत्तर भारतीयांसाठी छटपूजा यासारखे विविध कार्यक्रम दीपक भोंडवे यांच्याकडून आयोजित करण्यात आले. याशिवाय पूरग्रस्तांना मदत, नवीन मतदार नोंदणी अभियान भरविण्यात आले. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था, रावेत सेवा रस्त्यांची दुरुस्ती, नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्थापना, महिलांसाठी रासदांडियाचे महोत्सव, धम्मभूमी वर्धापन दिनानिमित्त मोफत अन्नदान दिनदर्शिका वाटप, माजी सैनिक सन्मान सोहळा नवीन आधार कार्ड मेळावा, महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम
मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रश्नसंच, साफसफाई कामगारांचा सन्मान यासारख्या कार्यक्रमांद्वारे दीपक भोंडवे यांनी पुढाकार घेतला आहे.
आदर्श प्रभागाचे स्वप्न
स्वच्छ, सुरक्षित, सुसंस्कृत, आधुनिक सुविधा असलेला आणि सर्वांना समान संधी देणारा आदर्श प्रभाग दीपक भोंडवे यांना निर्माण करायचा आहे. दर्जेदार रस्ते, सुधारित सांडपाणी आणि पाणी वितरण व्यवस्था करणे, सर्व उपनगरे, वसाहती आणि सोसायटींमध्ये अत्याधुनिक पथदिव्यांची व्यवस्था करणे, सार्वजनिक जागांचे सुशोभिकरण, उद्याने, क्रीडांगणे आणि सामुदायिक केंद्रांची उभारणी करणे, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस पथकांची वाढ, सर्व प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही नेटवर्क, महिलांसाठी सुरक्षित व मैत्रीपूर्ण वातावरण निर्मितीसाठी उपाययोजना, कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी, पावसाळी पाणी संधारण, वृक्षारोपण आणि हिरवळ निर्माण करणे, आरोग्य शिबिरे आणि रोगनियंत्रण कार्यक्रम राबविणे, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे, स्टार्टअप, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शनासाठी साहाय्य, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन आणि नवीन रोजगार संधीची निर्मिती, महिलांसाठी उद्योजकता योजना व स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मनोरंजन सुविधा व सुरक्षित पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा व सहाय्यता केंद्रे, नागरिकांशी थेट संवाद, तक्रार निवारण प्रणाली आणि खुली कामकाज पद्धती, चंद्रभागा कॉर्नर येथे गार्डन तयार करणे, चंद्रभागा कॉर्नर येथील शासकीय दवाखाना लवकर सुरू करणे आदी कामांना दीपक भोंडवे यांनी प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.
विविध कामांत योगदान
माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे रावेत-किवळे भागासाठी स्वतंत्र वीज फीडर मंजूर करण्यात आला असून पुढील काही दिवसांत तो कार्यान्वीत करण्यात येणार आहे. रावेत-किवळे परिसरातील आरक्षित जागा विकसित करणे, शासनाने निश्चित केलेल्या आराखड्यानुसार सर्व आरक्षित जागा संरक्षित ठेवणे, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण रोखून नवीन सुविधांची सातत्यपूर्वक देखरेख करणे, नागरिकांच्या सहकार्याने जागांची स्वच्छता व देखभाल करणे, रावेत-किवळे परिसरासाठी स्टेडियम बांधकामास मंजुरी मिळून त्याचे उद्घाटन करणे, आरक्षित जागेवरील उद्याने, हिरवळीची मैदाने विकसित करणे, सामुदायिक सभागृहे व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉल बांधणे, क्रीडांगणे, जिम व ओपन-ओपन फिटनेस झोन तयार करणे, वरिष्ठ नागरिकांसाठी व्यायाम सुविधा, फिरण्यासाठी ट्रॅक, बैठकीची व्यवस्था करणे,
सांडपाणी व जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन केंद्र व स्वच्छ परिसर आदी उपक्रम आणि कार्यक्रमांत दीपक भोंडवे हे योगदान देत आहेत. स्थानिक नागरिकांशी चर्चा करून विकास आराखडा तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

