कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता 

किंवा

व्यावसायिकबरोबरच कौशल्यधारित शिक्षण हवे

कौशल्याधारित शिक्षणाची आवश्यकता किंवा व्यावसायिकबरोबरच कौशल्यधारित शिक्षण हवे

Published on

तळेगाव दाभाडे हे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. राष्ट्रीय शिक्षणाची पाळेमुळे रुजल्याने शिक्षण व्यवस्थेबद्दलची कमालीची आस्था तळेगाव आजही जपताना दिसत आहे. नव्या व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेचे केंद्र बनत आहे. एवढेच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील एक दुसरे ‘एज्युकेशनल हब’ म्हणून तळेगावची ओळख तयार होताना आज दिसत आहे. परंतु, बदलत्या काळानुसार अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूप बदलले पाहिजे. अनुभवात्मक, कौशल्याधारित आणि विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणारे शिक्षण हवे.
- युवराज बाळासाहेब काकडे
-----------------
एक उद्योगनगरी म्हणून तळेगाव दाभाडे हे जगाच्या नकाशावर अत्यंत वेगाने ठळक होणारे नाव आहे. पारंपरिक कृषी क्षेत्र आणि
पर्यटन हा येथील लोकजीवनाच्या अर्थार्जनाचा अविभाज्य भाग आहे. परंतु आता नवीन उद्योग विश्वाचे स्वागत करत तळेगाव दाभाडे आणि एकूणच मावळ तालुका आता कात टाकत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा मध्यवर्ती दुवा ही तळेगावची विशेष ओळख सांगता येते. या दोन्ही महानगरांतील अनेक नागरिकांची ‘सेकंड होम’ म्हणून तळेगावला पसंती मिळत आहे. त्यामुळे आता स्थलांतरितांचे गाव म्हणूनही तळेगाव ओळखले जाते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित होताना दिसते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये शिक्षणाची भर पडली आहे म्हणूनच कौशल्यपूर्ण आणि व्यावसायिक शिक्षणाकडे पालकांचा कल वाढलेला दिसतो.

शिक्षण व्यवस्थेत झपाट्याने बदल
आजच्या काळात व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ठळकपणे जाणवत आहे. शिक्षण व्यवस्थेतील बदलही झपाट्याने पुढे येत आहेत. जागतिकीकरणाच्या बदलत्या संदर्भानुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहे. पारंपरिक शिक्षण व्यवस्था आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधार देऊ शकत असली तरीही ती तंत्रज्ञान आणि उद्योगावर आधारित बाजारपेठेच्या मागण्या पूर्ण करण्यास तितकी सक्षम नाही. आज व्यावसायिक शिक्षण हे कौशल्याधारित शैक्षणिक व सामाजिक प्रगतीचे द्योतक ठरत आहे. व्यावसायिक शिक्षणामुळे आजचा विद्यार्थी स्वतः विचार करण्यास प्रवृत्त झाला आहे. स्वतःच्या संधी स्वतः तयार करून इतरांना रोजगार मिळवून देण्यास तो सक्षम ठरत आहे. यातच व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व दडले आहे. आज मावळ तालुका व विशेषतः तळेगाव दाभाडे यांचा व्यावसायिक शिक्षणाच्या अनुषंगाने विचार करताना काही बाबी निश्चितच नजरेआड करून चालणार नाही. उद्योग व्यवसायासोबतच तळेगाव नव्या व्यावसायिक शिक्षण व्यवस्थेचे केंद्र बनत आहे, हे अभिमानाने नमूद करण्यास आनंद होत आहे.

अभियांत्रिकी क्षेत्राची वाटचाल
तळेगावालगत पिंपरी चिंचवड उपनगरामध्ये तसेच बाजूच्या मुंबई महानगरामध्ये व्यावसायिक शिक्षण देणारे अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन शास्त्र (एमबीए) अशा अनेक नामांकित महाविद्यालयांचे पर्याय पालकांसाठी उपलब्ध आहेत. परंतु आता मावळ तालुक्यात व विशेषतः तळेगाव दाभाडे येथे अशी व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणारी अनेक नामांकित महाविद्यालये सुरू झाली आहेत. या सर्वांमध्ये विशेषत्वाने नमूद करण्यासारखे व नुकतेच सुरू झालेले यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आचार्य अत्रे व प्राचार्य म. मा. आळतेकर या मान्यवरांनी स्थापन केलेल्या व मावळ तालुक्याचे भूषण ठरलेल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा शैक्षणिक पसारा दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, या जाणिवेतून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रामदास काकडे यांच्या व्हिजनमधून यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची दिमाखदार सात मजली इमारत पूर्णत्वाकडे जाताना मावळवासीयांना आनंद होत आहे. संस्थेने या आधीच बी. फार्मसी, डी. फार्मसी आणि नुकत्याच सुरू झालेल्या एम. फार्मसीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण व्यवस्था उपलब्धता करून दिली आहे. तसेच बीबीए/बीसीए या व्यावसायिक अभ्यासक्रमात एक ‘ब्रँड’ ठरलेल्या इंद्रायणी महाविद्यालयातून या प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी करिअरला नवा आकार दिला आहे.

युवकांना करिअरच्या संधी
आज तळेगावात उपलब्ध असलेल्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमुळे स्थानिक युवकांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. तळेगावातील वाढते शहरीकरण आणि नागरीकरण यामुळे अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांची संकुले तळेगाव दाभाडे व आसपास उभी राहताना दिसत आहेत. लोकमान्य टिळकांनी आणि अण्णासाहेब विजापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवली. त्या नूतन महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून तळेगाव येथे पहिले पदविका व पदवी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. वराळे व आंबी येथे डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे मोठे शैक्षणिक संकुल आहे. एमबीए, अभियांत्रिकी, कृषी असे अनेक अभ्यासक्रम चालविले जातात. मुंबई-पुणे महामार्गालगत साते गावाजवळ पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा मोठा शैक्षणिक कॅम्पस नव्याने विकसित झालेला आहे. तिथेही विधी, अभियांत्रिकी, एमबीए असे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. लोणावळ्यानजीक नांगरगाव एमआयडीसी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आटीआय) च्या माध्यमातून मावळ तालुक्यातील गरीब होतकरू युवकांना अभियांत्रिकी, फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, ड्राफ्ट्समन तसेच गैरअभियांत्रिकी क्षेत्रात कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रॅमिंग असिस्टंट (सीओपीए), फूड आणि बेवरेज सेवा सहाय्यक अशा अनेक प्रकारच्या तांत्रिक व बिगर तांत्रिक शिक्षणाची उपलब्धता झाल्याने रोजगाराच्या अनेक प्रकारच्या संधी निर्माण झाल्या आहेत. लोणावळ्यानजीक कुसगाव येथे सिंहगड इन्स्टिट्यूटचा मोठा कॅम्पस असून तिथेही अभियांत्रिकी आणि पदविका अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. तळेगाव नजीकच्या सोमाटणे गावाजवळ इंदिरा शिक्षण संस्थेचेही व्यावसायिक अभ्यासक्रम देणारे मराठी शैक्षणिक संकुल आहे.

पालकांनी सजग राहावे
आज यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), कॉम्प्युटर सायन्स (सीएस) अशा अनेक नव्या विद्या शाखा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असताना अनेक आव्हानांचीही जाणीव झाली आहे. देशभरातील अनेक विद्यार्थी आज इंजिनिअरिंग शिक्षणाला प्राधान्य देतात. करियरसाठी इंजिनिअरिंगच्या माध्यमातून पुढे जाणारे अनेक विद्यार्थी आहेत म्हणूनच बदलत्या काळानुसार अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूप बदलले पाहिजे आणि ते अनुभवात्मक शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणारे हवे असे वाटते. एआयसीटीई अंतर्गत येणारे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन, विद्यापीठ अनुदान आयोग, अमेरिकास्थित अँबेट आदी नामांकित संस्थांचे देशातल्या अभियांत्रिकी शिक्षण व्यवस्थेवर लक्ष असूनही ६० टक्के अभियांत्रिकी युवक आज बेरोजगार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण हे व्यावसायिक शिक्षणाबरोबरच कौशल्यधारित शिक्षण बनले, तर विद्यार्थ्यांना त्याचा जास्त फायदा होईल. स्वयंरोजगारातून सर्वसमावेशक विकासाकडे समाजाला घेऊन जाणारे व्यावसायिक शिक्षण अत्यंत गरजेचे असून पालकांनी विद्यार्थ्यांनी त्याबाबतीत सजग असावे असे मला वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com