फुटबॉल स्पर्धेमध्ये आज विजेता संघ ठरणार
पुणे, ता.१ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या १६ वर्षांखालील गटाचा मंगळवारी (ता.२) अंतिम सामना रंगणार आहे. जे.एन.पेटिट टेक्निकल विरुद्ध हडपसरमधील विबग्योर स्कूल, सिंहगड रस्ता येथील विद्या प्रतिष्ठान पब्लिक स्कूल विरुद्ध शिवणेतील वॉलनट, कोंढव्याची मांसूभाई कोठारी नॅशनल विरुद्ध कॅम्प येथील सेंट व्हिन्सेंट्स, फुलगावचे नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल विरुद्ध चिंचवडचे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल या संघांत उपांत्यपूर्व सामने रंगणार आहेत.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सोमवारी (ता.१) एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने सलग तीन आणि फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलने सलग दोन सामन्यांत दणदणीत विजय मिळविले. पहिल्या सामन्यात वाकडच्या यूरो स्कूलने येरवडा येथील विबग्योर स्कूलवर २-० असा विजय मिळविला. यात यूरोच्या आरव खानोलकर याने १९ व्या तर आदित अरोरा याने २५ मिनिटाला प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली. मात्र, दुसऱ्या सामन्यात यूरो स्कूलच्या संघाला चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनलकडून २-० असा पराभव पत्कारावा लागला. सामन्याच्या सुरुवातीच्या दुसऱ्या मिनिटाला ‘एल्प्रो’च्या शिवांश शुक्ला याने पहिला गोल केला. दुसऱ्या सत्रात एल्प्रोच्या संघाला पेनल्टीची संधी मिळाली. त्यात सोहम सनादी याने एक गोलची नोंद केली. तत्पूर्वी ‘एल्प्रो’च्या संघाने वडगाव शेरीच्या सेंट अर्नोल्ड्स स्कूलवर २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. त्यामध्ये सेंट अर्नोल्ड्सच्या आयुष लंबुगोल याने १३ मिनिटाला एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. परंतु दुसऱ्या सत्रात एल्प्रोच्या संघाकडून आक्रमक खेळ करत शिवांश शुक्ला व रुद्र पचदे यांनी एकेक गोलची नोंद केली.
तिसऱ्या सामन्यात ‘एल्प्रो इंटरनॅशनल’च्या संघाने ईशान वारपेच्या एकमेव गोलाच्या जोरावर पाषाणच्या लोकसेवा स्कूलचा १-० असा पराभव केला. दरम्यान ‘लोकसेवा’ने कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलवर २-० असा दमदार विजय मिळविला. त्यात सोडेम ब्रू याने दोन गोल केले.
यायम पोहिम याचे दोन गोल
फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलने वानवडीच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलचा ३-१ असा सहज पराभव केला. यायम पोहिम याने तिसऱ्या व १३ व्या मिनिटाला एकेक गोल करत संघाला भक्कम आघाडी दिली. याखेरीज विजयी संघाच्या इमदादुल्ला पटवेकर याने १७ व्या मिनिटाला एक गोल केला. पराभूत संघाच्या ऋग्वेद क्षीरसागर याने एक गोल नोंदविला. दुसऱ्या सामन्यात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी’ संघाने भिलारेवाडीच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा ३-० असा दारुण पराभव केला. विजयी संघाकडून लीपा वालिम, अनिरुद्ध पंजा, इतकत दुर्गा यांनी प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली. तत्पूर्वी आर्यन्स वर्ल्डच्या संघाने चाकणच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलचा ४ -० असा पराभव केला. आर्यन्स वर्ल्डच्या अर्णव बडुरे याने २, पृथ्वी चव्हाण आणि वरद बागवे याने एकेक गोलची नोंद केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

