खासगी बसमध्ये सीसीटीव्ही बसवा

खासगी बसमध्ये सीसीटीव्ही बसवा

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २ ः हिंजवडीतील दुर्घटनेनंतर खासगी बसमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरत आहे. शहरातील आयटी पार्क आणि औद्योगिक क्षेत्रात जाणारे लाखो कर्मचारी तसेच कामगार खासगी बसचा वापर करतात. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तसेच एकूणच प्रवासी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी आणण्या-नेण्यासाठी खासगी बसची व्यवस्था केली आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात एक हजार ३२७ मॅक्सी कॅब आणि १५ हजार ४८७ बसची नोंद आहे. मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलरमधूनही कर्मचारी नेले जातात. अशा बहुतांश खासगी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे बसमध्ये कामगार, प्रवाशांशी गैरवर्तन केल्याचे प्रकारही उघड झाले आहेत. काही प्रकरणांमध्ये चालकच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कर्मचारी, कामगार संघटना आणि प्रवाशांकडून ही मागणी होत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या चालकाने मद्यपान केल्याचेही उघड झाले आहे.
--------
नियंत्रण कक्ष हवेत
लाइव्ह ट्रॅकिंग करण्यासाठी बसमध्ये ‘व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (व्हीएलटीडी) आहेत, मात्र बहुतांश बसमध्ये सीसीटीव्ही नाहीत. खासगी बसच्या मालकांकडे ५० पासून ५०० पर्यंत गाड्या आहेत. इतक्या जास्त बस असलेल्या बस मालकांनी सीसीटीव्ही सीसीटीव्ही बसवून नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारावेत. तेथून बसमधील हालचालींवर लक्ष ठेवल्यास अनुचित प्रकार रोखण्यास मदत होईल, अशी मागणीही होत आहे.
------
परिवहन विभाग नियम करणार का ?
प्रवाशांची सुरक्षितता डोळ्यांसमोर ठेवून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांमध्ये ‘व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस (व्हीएलटीडी) आणि ‘पॅनिक बटण’ बसविण्याची सक्ती केली आहे. याशिवाय राष्ट्रीय परवाना असलेली मालवाहतूक आणि धोकादायक/रासायनिक मालाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्येही ‘व्हीएलटीडी’ बसविण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल २०१८ पासून सुरू झाली होती. मात्र पुरेशी यंत्रणा नसल्याने सक्ती कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून वाहतूकदारांनी विरोध केला होता. त्यामुळे काही दिवसांतच या सक्तीतून जुन्या वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात वगळण्यात आले होते. परिवहन विभागाने एक जानेवारी २०१९ नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन नोंदणी होणाऱ्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना ‘पॅनिक बटण'', ‘व्हीटीएस'' बसविणे बंधनकारक केले. मात्र वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसविणे ऐच्छिक असल्यामुळे अनेक वाहनमालक त्याकडे दुर्लक्ष करतात. खासगी बसच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय किंवा परिवहन विभाग सीसीटीव्ही ऐच्छिक नव्हे तर सक्तीचे करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-------
प्रमुख प्रकरणे
- पाच मार्च रोजी पुण्यात एक अभिनेत्रीशी खासगी बसमध्ये प्रवाशाने अश्लील वर्तन केले
- १९ मार्च रोजी हिंजवडी येथे कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मिनीबसच्या चालकाने सीटखाली रसायन ठेवून स्फोट घडवून आणल्याचे उघडकीस
----------
पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस मालकांची बैठक घेऊन सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करणार आहे.
- संदेश चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com