पुणे कॅम्प येथील सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल अजिंक्य

पुणे कॅम्प येथील सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल अजिंक्य

Published on

पुणे, ता.२ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेमध्ये १६ वर्षांखालील मुलांच्या गटात मंगळवारी (ता.२) पुणे कॅम्प येथील सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल संघाने बंडगार्डनच्या जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूलचा १-० असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कात्रज येथील भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर ही स्पर्धा पार पडली. ‘सेंट व्हिन्सेंट्स’ आणि ‘जे.एन.पेटिट’ यांच्यातील अंतिम सामना अटीतटीचा झाला. ‘सेंट व्हिन्सेंट्स’च्या नील जगदाळे याने २२ मिनिटाला विजयी गोलची नोंद केली. जे.एन.पेटिटचा संघ उपविजेता ठरला. चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलने सिंहगड रोडच्या विद्या प्रतिष्ठान पब्लिक स्कूलवर २ - ० असा विजय मिळवत तिसऱ्या क्रमांक मिळविला. त्यात अर्ष सिंग आणि शिवांश शुक्ला यांनी प्रत्येकी एक गोल केला.
तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात ‘जे.एन.पेटिट’ने हडपसरमधील विबग्योर स्कूलचा २-० असा पराभव केला. त्यात दक्ष पिल्ले याने दोन गोलची नोंद केली. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात ‘एल्प्रो इंटरनॅशनल’ संघाने फुलगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलवर १-० असा विजयी मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. विजयी संघातील रिशिल गुप्ता याने एक गोल केला. उपांत्यपूर्व फेरीच्या तिसऱ्या सामन्यात विद्या प्रतिष्ठान पब्लिक स्कूलने शिवणेतील वॉलनट स्कूलचा
पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील शेवटच्या सामन्यात सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलने कोंढव्याच्या मांसूभाई कोठारी नॅशनल स्कूलवर ३-० असा एकतर्फी विजय प्राप्त केला. त्यामध्ये इथेन लाबो, परम भार्गव, प्रणव मोटवानी यांनी प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली. स्पर्धेत करण अंगीरवाल, नवीन हिरेकेरुर, सूरज मसीलान, प्रतीक आवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.


उपांत्य फेरीचे सामने एकतर्फी
उपांत्य फेरीच्या सामन्यात ‘सेंट व्हिन्सेंट्स’ आणि ‘जे.एन.पेटिट’च्या संघांनी एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. पहिल्या उपांत्य फेरीत ‘सेंट व्हिन्सेंट्स’ संघाने विद्या प्रतिष्ठान पब्लिकचा २ -० असा पराभव केला. परम भार्गव याने ७ व्‍या आणि २३ व्या मिनिटाला एकेक गोलची नोंद करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ‘जे.एन.पेटिट’ने एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल संघाचा ४-० असा दारुण पराभव केला. त्यात ‘जे.एन.पेटिट’च्या दक्ष पिल्ले याने गोलची हॅटट्रिक नोंदविली. तर नील वाघ याने एका गोलची नोंद केली.

अंतिम सामन्यात चुरस
सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूल आणि जे.एन.पेटिट टेक्निकल हायस्कूल यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात प्रचंड चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोलचे प्रयत्न केले. काही अप्रतिम फटके, तर काही थरारक बचाव पाहायला मिळाले. पहिल्या सत्रापर्यंत गोलशून्य राखत दोन्ही संघांनी दमदार खेळ केला. मात्र, दुसरे सत्र सुरू होताच सेंट व्हिन्सेंट्सच्या नील जगदाळे याने २२ व्या मिनिटाला अचूक प्रहार करत पहिला गोल नोंदवला आणि सामना आपल्या बाजूला वळविला. सामन्यातील शेवटच्या मिनिटांपर्यंत जे.एन.पेटिटच्या संघाकडून गोलसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, सेंट व्हिन्सेंटस संघाच्या बचावफळीने गोल करण्याची संधी मिळू दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com