भिलारेवाडीतील आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा संघ अजिंक्य

भिलारेवाडीतील आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा संघ अजिंक्य

Published on

पुणे, ता. ७ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेच्या १६ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात भिलारेवाडी येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूल यांनी यवतच्या ऑलिंपस स्कूलवर २२ धावांनी मात करत अजिंक्यपद पटकाविले. २२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केलेल्या तीस धावांसाठी शौर्य कोंडे सामनावीर ठरला. बाजीराव रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय (नूमवि) तृतीय स्थानी राहिले.
सासवड-बोपोडी रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. ट्रिनिटी स्कूलच्या प्राचार्या रूपाली ढमढेरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून ऑलिंपस स्कूलने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ‘आर्यन्स वर्ल्‍ड’च्या नील अपुणे, शौर्य कोंडेने सावध सुरुवात केली. लाभेश भंडारी आणि मुकेश सिंगरे यांनी प्रभावी गोलंदाजी करत धावगतीला नियंत्रणात ठेवले. पाच षटकांच्या अखेरीस धावफलकावर २ बाद ४२ धावा असता शौर्यने फटकेबाजीचा निर्णय घेत चौकारांचा वर्षाव सुरू केला. परंतु शिवम दिवेकरने आठव्या षटकांत शौर्य आणि श्रावण शेट्टी यांना सलग दोन चेंडूंवर बाद करत ‘आर्यन्स वर्ल्ड’ला धक्का दिला. मात्र, प्रिन्स खांडेकरने अखेरच्या फलंदाजांबरोबर खेळी करत ऑलिंपससमोर दहा षटकांत १०२ धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना ऑलिंपसच्या कार्तिक हरपाळे आणि आदित्य सोनावणे यांनी देखील जोखीम न घेता सुरुवात केली. मात्र, आर्यन्स वर्ल्डच्या गोलंदाजांनी दोघांना तंबूत परत पाठविले आणि ऑलिंपसची गाडी रुळावरून घसरली. त्यानंतर, ऑलिंपसचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. पुढच्या आठ फलंदाजांपैकी चार फलंदाज शून्यावर बाद झाले. ऋतुराज मुरकुटे याने एकाच षटकांत चार गडी बाद करत ‘आर्यन्स वर्ल्ड’च्या पारड्यात विजय टाकला.
तत्पूर्वी, स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑलिंपस स्कूलने उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता इंटरनॅशनल स्कूलचा सात विकेटने, तर आर्यन्स वर्ल्ड स्कूलने नूमविचा पाच विकेटने पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत नूमविने डॉ. अस्मिता इंटरनॅशनल स्कूलचा २४ धावांनी पराभव केला आणि ब्राँझपदक जिंकले.

संक्षिप्त धावफलक
अंतिम सामना ः आर्यन्स वर्ल्ड : १० षटकांत ६ बाद १०१ (शौर्य कोंडे ३०, प्रिन्स खांडेकर २३, शिवम दिवेकर ३-२३, आदित्य सोनावणे १-१७) वि.वि. ऑलिंपस ः १० षटकांत ९ बाद ७९ (आदित्य सोनावणे २८, कार्तिक हरपाळे २५, ऋतुराज मुरकुटे ४-६, हर्षित निंबाळकर २-१६).
तिसऱ्या क्रमांकाचा सामना ः नूमवि : १० षटकांत ७ बाद ८९ (विराज नांगरे नाबाद २०, वीरेन नयनित २१, देवांश मेमाणे ३-१०, प्रसाद आंबळे १-१९) वि. वि. डॉ. अस्मिता इंटरनॅशनल : १० षटकांत ५ बाद ६५ (ऋषभ गायकवाड १३, आदर्श चोरघडे १-९, अर्पित कोकाटे १-९, तनिष्क नालंगे १-११, वीरेन नयनित १-१३).
उपांत्य सामना ः डॉ. अस्मिता इंटरनॅशनल : १० षटकांत ३ बाद १०९ (नील नागावकर नाबाद ६३, ऋषभ गायकवाड २८, लाभेश भंडारी १-२१, कार्तिक हरपाळे १-२३) पराभूत विरुद्ध ऑलिंपस : ९.२ षटकांत ३ बाद १११ (शिवम दिवेकर नाबाद ५०, आदित्य सोनवणे १९, प्रसाद आंबळे २-२४, ओम वाईकर १-३२). नूमवि : १० षटकांत ८ बाद ८५ (आदर्श चोरघडे २०, विराज नांगरे २०, नील देशमुख २-१२, रिशांत निंबोळकर २-१५) पराभूत विरुद्ध आर्यन्स वर्ल्ड ः ८.४ षटकांत ५ बाद ८६ (प्रिन्स खांडेकर नाबाद ३३, नील आपुणे १५, तनिष्क नालंगे ४-७, विराज नांगरे १-२१).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com