शहरात काँग्रेस पक्षातर्फे १०२ इच्छुकांच्या मुलाखती
पिंपरी, ता. २४ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाने शहरातील संघटन मजबूत करण्यावर भर देत उमेदवार निवड प्रक्रियेला नुकतीच सुरुवात केली. पिंपरी येथे शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. निवडणुकीत पक्षाशी निष्ठावंत राहिलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, तर बंडखोरी करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसल्याचा ठाम इशारा यावेळी कॉंग्रेस प्रभाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी सहप्रभारी बी. एन. संदीप, प्रभारी आदित्य पाटील व डॉ. मनोज उपाध्याय आदी उपस्थित होते. आगामी महापालिका बैठकीदरम्यान पहिल्या टप्प्यात १०२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मुलाखती दुपारपर्यंत चालल्या. उमेदवारांची पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि संबंधित प्रभागातील कामगिरी या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.

