स्वयंपाक चुलीवर; हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर
पिंपरी, ता.१३ : युद्ध परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळी अडचणीत आली आहे. याचा सर्वाधिक फटका शहरातील उद्योगांसह खाद्यपदार्थ
व्यवसायालाही बसला आहे. शहरात व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरवठा पूर्ण बंद आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाच ‘गॅस’वर आल्याची स्थिती आहे. अशा स्थितीतही व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी अनेक हॉटेलमालकांनी चूल आणि कोळशावरील शेगड्यांचा वापर सुरू केला आहे.
अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्यावसायिक वापराच्या ‘एलपीजी सिलिंडर’ पुरवठ्यावर निर्बंध आणले. त्यामुळे काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने शहरातील अनेक मोठ्या हॉटेल व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यावर तोडगा म्हणून नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करणे पसंत केले आहे. काही व्यावसायिकांनी हॉटेलमध्ये सिमेंटची चूल तयार केली आहे. काही ठिकाणी लोखंडी चुलीवर स्वयंपाक करण्यात येत आहे. यातून ग्राहक टिकवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी धडपड सुरू केली आहे.
पहिल्यांदाच चुलीवर जेवण
व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांनी हार न मानता त्यातूनही शक्कल लढवली आहे. गॅस नसल्यावर हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा चुलीचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. अनेक हाॅटेलमध्ये अन्न शिजवण्यासाठी पहिल्यांदाच चूल पेटली आहे.
वापराला मर्यादा, अनेक पदार्थ गायब
चूल आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या वापराला मर्यादा असल्याने हॉटेलच्या मेन्यू कार्डवरील अनेक पदार्थ सध्या गायब झाले आहेत. चुलीवर सर्व पदार्थ तयार करणे शक्य नसल्याने मोजकीच ऑर्डर स्वीकारत आहोत. गॅस मिळणार की नाही, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत सूचना नसल्याने व्यावसायिकांमध्ये संभ्रम असून चिंता वाढल्याचे एका खानावळीचे व्यवस्थापक सचिन साळवे यांनी सांगितले.
लाकडे जळली, तर वाढेल प्रदूषण
लहानमोठ्या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ शिजवण्यास सिलिंडरऐवजी लाकडे जाळण्यात आल्यास प्रदूषणवाढीचा धोका आहे. या ज्वलनातून निर्माण होणारा कार्बन मोनोऑक्साइड हानिकारक आहे. कार्बन डायऑक्साइड हरितगृह वायू असून, हवामान बदलाला कारणीभूत ठरतो. धुरातील सूक्ष्म कण हवेत पसरतात. श्वासाद्वारे ते शरीरात जाऊन दमा, श्वसनाचे आजार वाढवतात. तसेच नायट्रोजन ऑक्साइड वायू धूर तयार होण्यास आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करण्यास कारणीभूत ठरतो.
सिलिंडर उपलब्ध नसल्याने आम्ही चूल तयार केली आहे. त्या चुलीवर दहा ते ५० किलोपर्यंतचे अन्न शिजविण्यास मदत होणार आहे. काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापरही वाढला आहे.
- अस्लम शेख, हॉटेल व्यवस्थापक, पिंपरी
गॅस सिलिंडरचे वितरण बंद आहे. त्यामुळे आम्ही चुलीचा आधार घेतला आहे. २० किलो लाकडाची दररोज गरज भासते. थाळ्यांचे कमी केल्या आहेत.
- बालाजी कांबळे, हॉटेल व्यावसायिक, थेरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

