आजची बचत म्हणजे सेवानिवृत्तीनंतरची सुरक्षितता
पिंपरी, ता. २७ : ‘‘आजच्या युगात जीवनमान, शिक्षण, करिअर, आरोग्य, सुविधा, प्रवास, नवउद्योजकता, तंत्रज्ञान आणि एकूणच जीवनशैलीत झपाट्याने बदल होत आहेत. अशावेळी बहुतांश लोक स्वतःच्या प्रगतीबाबत अधिक सजग झाले असले; तरी आर्थिक साक्षरता, विशेषतः सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाकडे अजूनही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही, हे वास्तव आहे. अनेकजण आपल्या कार्यक्षम वयात चांगली कमाई, सामाजिक प्रतिष्ठा, नाव आणि यश मिळवतात. मात्र, योग्य वेळी आर्थिक नियोजन न झाल्याने वृद्धापकाळात त्यांनाच आर्थिक असुरक्षितता, इतरांवर अवलंबित्व, मानसिक तणाव आणि अपुऱ्या बचतीला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती अज्ञान किंवा अपयशामुळे निर्माण होत नाही, तर वेळेवर आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजन न केल्यामुळे होते. त्यामुहे नागरिकांनी सेवानिवृत्ती नियोजनांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे,’’ असे आवाहन पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाचे ‘पीएफआरडीए’ मुख्य महाव्यवस्थापक सुमित कुमार यांनी केले.
‘सकाळ मनी’तर्फे चिंचवडच्या हॉटेल लेमन ट्री येथे गुरुवारी (ता.२२) आयोजित चर्चासत्रात पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण प्रस्तुत ‘पेन्शन ने प्रगती’ या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन करताना सुमितकुमार बोलत होते. यावेळी ‘पीएफआरडीए’चे उपमहाव्यवस्थापक देवेश मित्तल, एनपीएम असोसिएट्स प्रा. लि. चे संचालक सीए आशुतोष दाबके आदी उपस्थित होते.
सुमित कुमार म्हणाले, ‘‘आजची मानसिकता बऱ्याचदा ‘आता जे कमावतो ते पुरे’ अशी असते; पण बदलत्या जीवनशैलीत योग्य विचारसरणी ‘आजची कमाई म्हणजे उद्याच्या जगण्यासाठी आर्थिक पाया’ अशी असावी. कारण, आपल्या कार्यक्षम वयातील प्रत्येक दिवस, प्रत्येक महिन्यातील कमाईचा काही भाग भविष्यासाठी राखून ठेवणे ही स्वतःकडून स्वतःलाच दिलेली सुरक्षिततेची हमी आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ पैसे जमवणे किंवा खर्चाचे ताळेबंद ठेवणे नव्हे. तर, आर्थिक साक्षरता म्हणजे उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक, जोखीम, परतावा, संरक्षण, सेवानिवृत्ती, करसवलत, संपत्ती निर्माण आणि भविष्यातील नियोजन या सर्व घटकांचे वैज्ञानिक, विवेकी व शिस्तबद्ध ज्ञान आणि त्याचा योग्य वापर. मिळणारा पैसा किती हा मुद्दा महत्त्वाचा नाही, तर उपलब्ध पैशांचे किती योग्य नियोजन होते आणि त्यातून भविष्यकाळात किती आर्थिक स्थैर्य निर्माण होते, हा मुद्दा निर्णायक आहे.’’
सेवानिवृत्ती म्हणजे नव्या अध्यायाची सुरुवात
सुमित कुमार म्हणाले, ‘‘समाजात सेवानिवृत्तीबाबत पारंपरिक समजूत अशी होती, की नोकरी संपली म्हणजे कमाई संपली. त्या काळात संयुक्त कुटुंब, कमी खर्च, अवलंबित्वाची सोय आणि कमी आयुर्मान असल्यामुळे फारशी अडचण भासत नसे. मात्र, आजची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. संयुक्त कुटुंबांऐवजी स्वतंत्र कुटुंब पद्धती, आयुर्मानात वाढ, औषधोपचार, आरोग्य खर्च आणि सेवा व्यवस्थेचा वाढता खर्च, जीवनशैलीतील बदल, सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि सक्रिय वृद्धत्वाची आकांक्षा. आजचे ज्येष्ठ नागरिक सक्रिय, स्वाभिमानी, ज्ञानसंपन्न, वर्तमान काळाशी सुसंगत, प्रवासप्रेमी आणि सामाजिकदृष्ट्या जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांना वयस्क अवस्थेतही नियमित, विश्वासार्ह आणि सन्मानजनक उत्पन्न आवश्यक असते. ‘एनपीएस’मधील गुंतवणूक सुरू ठेवण्याचे कमाल वय ७५ वरून ८५ वर्षे करण्यात आले आहे. गैर-सरकारी कर्मचाऱ्यांना ६० वर्षांनंतर ८० टक्के निधी एकरकमी काढता येतो, तर २० टक्के ‘अॅन्युइटी’ आवश्यक आहे. एकूण निधी ८ लाखांपर्यंत असल्यास १०० टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे.
राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन योजना सर्वांसाठी समान संधी : मित्तल
सेवानिवृत्ती वेतन योजनांचे ‘पीपीटी’द्वारे सादरीकरण करताना पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक देवेश मित्तल म्हणाले, ‘‘राष्ट्रीय सेवा निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) ही शासन मान्यताप्राप्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेद्वारे नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने निवृत्तीसाठी निधी उभारता येतो. नियमित गुंतवणुकीमुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता प्राप्त होते. ही योजना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित नसून खासगी व स्वयंरोजगार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध आहे. सेवानिवृत्तीनंतर आत्मनिर्भर व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ‘एनपीएस’ प्रभावी पर्याय आहे. मित्तल यांनी सादरिकरणाद्वारे पुढील प्रमाणे योजनेतील गुंतवणुकीचे नियोजन स्पष्ट करुन सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, या योजनेत अतिशय कमी रकमेमधूनही गुंतवणूक सुरू करता येते. ज्यामुळे प्रत्येक सामान्य व्यक्ती आर्थिकसाक्षर होण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो,’’ असे मित्तल म्हणाले.
----टेबल
ही योजना पुढील वयोगटांसाठी उपलब्ध
वयोगट आणि योजना प्रकार
० ते १८ वर्षे : वात्सल्य सेवानिवृत्ती बचत योजना
१८ ते ७५ वर्षे : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
---------पॉईंटर
योजनेची मूलभूत रचना
राष्ट्रीय निवृत्ती योजनेतील प्रमुख घटक
- दीर्घकालीन बचत
- चक्रवाढ परतावा
- विविध साधनांमध्ये गुंतवणूक
- निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न
- करसवलतीचे लाभ
- शासनाची देखरेख व संरक्षण
चौकट
लवकर सुरुवात, मोठा लाभ
चक्रवाढ व्याढ म्हणजे वाढलेल्या रकमेवर पुन्हा वाढ होणे. त्यामुळे वय जितके कमी, बचत कालावधी तितका मोठा आणि परिणामी परतावा तितका अधिक. उदाहरणार्थ- दर महिन्याला लहान रक्कम नियमित बचत केली तरी २५-३० वर्षांनी ती मोठ्या निधीत परिवर्तित होते. यातून पुढील काळातील आरोग्य खर्च, प्रवास, घरकाम सहाय्य सेवा, दैनंदिन गरजा आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची क्षमता वाढते.
जोखीम कमी, परतावा स्थिर
राष्ट्रीय सेवानिवृत्त योजनेमध्ये जमा रक्कम विविध प्रमाणात पुढील साधनांमध्ये गुंतवली जाते. शेअर बाजार संबंधित साधने, उद्योगाधारित मुदतरोख साधने, शासनरोख साधने, इतर सुरक्षित साधने. या पद्धतीमुळे जोखीम एकाच ठिकाणी न राहता विभागली जाते, परिणामी परतावा संतुलित आणि दीर्घकालीन लाभ सुरक्षित राहतो.
करसवलतीतून बचतीची प्रेरणा
देशातील कर नियमांनुसार या योजनेत जमा होणाऱ्या रकमेस विभिन्न कलमानुसार सक्तीविरहित करसवलत मिळू शकते. यामुळे नागरिकांना बचत संस्कार आणि शिस्तबद्ध वित्त धोरण आत्मसात करण्यास मदत होते.
२०५० नंतरची आव्हाने
संशोधनानुसार, पुढील तीन दशकांमध्ये भारतात वयोवृद्ध लोकसंख्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यासोबत आरोग्यसेवा खर्च वाढ, औषधोपचारांची सततची गरज, सहाय्यक सेवा व निवासाच्या सुविधा, सामाजिक व मानसिक आधार व्यवस्था, या सर्व बाबी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर जीवन भयमुक्त, स्वाभिमानपूर्ण व सन्मानजनक होऊ शकते. आर्थिक नियोजनकार व बँकिंग तज्ज्ञ पुरुषोत्तम बेडेकर यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे ‘‘विमा हा जोखीम संरक्षण आहे, संपत्ती निर्मितीचे साधन नाही.’’ त्यामुळे गुंतवणूक करताना खालील शैक्षणिक सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असेही उपमहाव्यवस्थापक देवेश मित्तल यावेळी म्हणाले.
पॉईंटर
विमा म्हणजे सुरक्षितता
विमा हा जोखीम संरक्षणाचा मार्ग आहे, संपत्ती निर्मितीचा नाही. त्यामुळे विमा + बचत + गुंतवणूक यांचे स्वतंत्र उद्दिष्ट आणि योग्य नियोजन अनिवार्य आहे.
बचत → संरक्षण → गुंतवणूक → स्थैर्य → आर्थिक स्वातंत्र्य
ही क्रमवारी सर्वांत योग्य आहे.
विद्यार्थ्यांसाठी व तरुणांसाठी महत्वाचे धडे
१) कमाई सुरू होताच बचत व गुंतवणुकीची सुरुवात
२) उरलेली रक्कम बचत नव्हे, बचतीनंतर खर्च हा नियम
३) कमी रकमेमधूनही नियमित बचत शक्य
४) प्रत्येकाकडे किमान एक दीर्घकालीन आर्थिक योजना असणे आवश्यक
५) पालकांसाठी ही योजना सुरू करता येते
६) घरात आर्थिक चर्चा, जागरूकता व शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करा
७) दिखावा, दिखाऊ खर्च, सामाजिक तुलना टाळा
स्वावलंबी तरुण + आर्थिकदृष्ट्या सुरक्षित पालक = सुदृढ समाज
हे लक्षात घ्या...
रोजगार, मान, पद, प्रतिष्ठा, संपत्ती, स्वप्ने व प्रगती यांचा आस्वाद आयुष्याच्या कार्यक्षम काळात सर्वजण घेतात; पण सुवर्णकाळ म्हणजे वृद्धत्व याची निर्मिती युवावस्थेतल्या नियोजनातूनच होते. राष्ट्रीय सेवानिवृत्त वेतन योजना म्हणजे विश्वास + सातत्य + संरक्षण + संतुलित परतावा + सन्मान यांचा एकत्रित, सुरक्षित आणि दूरदर्शी आर्थिक आराखडा. म्हणूनच आजच स्वतःला प्रश्न विचारा ‘‘आयुष्याच्या उत्तरार्धात निवृत्त जीवन जगायचे आहे की नव्या संधींसह सन्मानाने उभे राहायचे आहे ?’’ निर्णय तुमचा, भविष्यही तुमचेच, असे मित्तल यांनी सांगितले.
‘‘निवृत्ती म्हणजे आयुष्याची समाप्ती नसून नव्या अध्यायाची सुरुवात आहे. मात्र, हा काळ आनंदी, स्वावलंबी आणि तणावमुक्त हवा असेल, तर कार्यक्षम वयातच आर्थिक नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आज अनेकजण चांगली कमाई आणि प्रतिष्ठा मिळवतात, पण सेवानिवृत्ती वेतन नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने वृद्धापकाळात आर्थिक असुरक्षिततेला सामोरे जावे लागते. नियमित बचत, दीर्घकालीन गुंतवणूक आणि पेन्शन योजनांची योग्य निवड केल्यास भविष्यातील गरजा सहज पूर्ण करता येतात. आर्थिक साक्षरता ही सुरक्षित निवृत्तीची पहिली पायरी आहे.’’
- सीए आशुतोष दाबके, संचालक, एनपीएस असोसिएट्स प्रा. लि.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
