

पिंपरी, ता. १७ ः महापालिकेत दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीने तीन सदस्यांची नावे आयुक्तांकडे दिली आहेत. सोमवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नियुक्तीचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भाजपच्या सात सदस्यांची यादी अद्याप गुलदस्तात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. १२८ सदस्यीय सभागृहात शासनाच्या निर्णयानुसार दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. मात्र, भाजपमध्ये इच्छुकांची संख्या साडेतीनशेपेक्षा अधिक होती. परिणामी कोअर कमिटीने संबंधित यादी प्रदेश समितीकडे पाठवली. त्यातील चाळीस मधून सात नावांची यादी निश्चित झाली आहे. मात्र, ती नावे कोणती, याबाबत पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी गोपनीयता ठेवली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी ओढवू नये, यासाठी ही खबरदारी असल्याची चर्चा आहे.
ऐवनेळी नावे सादर
महापालिका सर्वसाधारण सभेत अर्थात सोमवारी (ता. २०) आयुक्तांकडेच स्वीकृतसाठीची नावे व त्यांचे अर्ज सादर केले जाऊ शकतात. त्यांची छाननी करून आयुक्त नावे जाहीर करू शकतात. किंवा सर्वसाधारण सभेपूर्वी काही तास आधी आयुक्तांकडे अर्ज दिले जाऊ शकतात. मात्र, शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (ता. १९) सार्वजनिक सुट्या असल्याने सोमवारीच नावे निश्चित होतील, असे दिसते.
कायदा काय सांगतो?
महाराष्ट्र महापालिका (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या) नियम २०१२ मधील नियम क्रमांक पाचनुसार नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य नियुक्त केले जातात. शासनाच्या २०१३ च्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत १० सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
स्वीकृतसाठी १२.८ चा कोटा
शासनाच्या निर्णयानुसार १२८ सदस्यांमध्ये १० स्वीकृत सदस्य असतील. म्हणजेच एका सदस्यासाठी १२.८ चा कोटा आहे. त्यामुळे एका अपक्षासह भाजपच्या ८५ सदस्यांमागे सात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३७ सदस्यांमागे तीन स्वीकृत सदस्य असतील. सहा सदस्यांमुळे शिवसेनेचा १२.८ कोटा पूर्ण होत नसल्याने त्यांचे स्वीकृत सदस्य नसतील.
अखेर सोमवारचा मुहूर्त
महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा सहा फेब्रुवारी रोजी झाली. मार्चच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्य नियुक्त होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपची नावे प्रदेश समितीकडून आलेली नव्हती. त्यामुळे हा विषय सोमवारच्या (ता. २०) सर्वसाधारण सभेत ठेवला आहे. त्यासाठी एक एप्रिल रोजी आयुक्तांनी गटनेत्यांची बैठक घेतली होती.
यापूर्वीची कार्यवाही
महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना गटनेत्यांना २४ फेब्रुवारीला पत्र पाठवून २६ फेब्रुवारीला बैठक बोलावली. मात्र, भाजपने मुदतवाढ मागितली होती. दोन मार्चला पुन्हा पत्र पाठवून चार मार्चला बैठक बोलावली. त्यात राष्ट्रवादीने दिलेल्या तीन सदस्यांचे अर्ज छाननीत वैध ठरली आहेत. तर, भाजपने पुन्हा मुदतवाढ मागितली होती.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.