पेरणे फाटा येथे शौर्याला वंदन

पेरणे फाटा येथे शौर्याला वंदन

Published on

कोरेगाव भीमा, ता.१ : कोरेगाव भीमा जवळ पेरणेफाटा (ता. हवेली) येथे २०८ व्या शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी हाती निळे झेंडे व मुखी ‘जय भीम’ची गर्जना करीत लाखो आंबेडकरी अनुयायांचा जनसागर उसळला. उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण विजयस्तंभ परिसर व अहिल्यानगर रस्ता गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अभिवादनासाठी अखंड रांगा लागल्या होत्या.

मान्यवरांचे अभिवादन
दिवसभर विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी विजयस्तंभास मानवंदना दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सचिन खरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, आमदार माऊली कटके, बापूसाहेब पठारे, माजी उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, किरण सोनवणे, विजयरणस्तंभ सेवा संघाचे सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, कोरेगावचे सरपंच संदीप ढेरंगे व पेरणेच्या सरपंच उषा दशरथ वाळके आदींसह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होता. आलेल्या मान्यवरांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

मध्यरात्रीपासूनच सोहळ्याला सुरुवात
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री रोषणाई, आतषबाजी व सामुदायिक बुद्धवंदनेने शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पहाटेपर्यंत धम्मदेशना, धम्मपठण सुरू होते. सकाळी प्रशासन, महार रेजिमेंट व समता सैनिक दलाकडून सलामी देऊन औपचारिक अभिवादनास सुरुवात झाली. थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांची गर्दी दिवसभर वाढतच गेली. मध्यरात्री दुचाकी रॅलीमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली; दुपारनंतर पुन्हा गर्दी प्रचंड वाढली, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती.

विजयस्तंभाला आकर्षक सजावट
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास कृत्रिम व नैसर्गिक अशा दोन लाख फुलांची सजावट करण्यात आली होती. अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

5317

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com