बाहेरील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची ''धडपड''
बाहेरील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘धडपड’
उमेदवारांकडून फोन, व्हॉट्सअॅप मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ कॉलद्वारे मतदारांशी संवाद
मंगेश पांडे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत स्थानिक प्रचारासोबतच बाहेरील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांची विशेष धडपड सुरू असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा स्थलांतरामुळे मतदारसंघाबाहेर वास्तव्यास असलेले हजारो मतदार निकालासाठी निर्णायक ठरू शकतात, याची जाणीव असल्याने सर्वच उमेदवारांनी संपर्क मोहिमेला वेग दिला आहे.
पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने नोकरीच्या निमित्ताने शहराच्या बाहेरील अनेक नागरिक शहरात वास्तव्यास आलेले आहेत. तसेच शहरातील नागरिकही नोकरीनिमित्त शहराबाहेर वास्तव्याला गेलेले आहेत. त्यांचे मतदान शहरातच आहे. त्यामुळे अशा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या उमेदवारांकडून जोरदार नियोजन सुरू आहे. प्रत्येक प्रभागनिहाय बाहेरील मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली असून, कोण कुठे वास्तव्यास आहे, कोणत्या माध्यमातून संपर्क साधता येईल, याची सविस्तर माहिती संकलित केली जात आहे. या कामासाठी विश्वासू कार्यकर्ते, बूथ प्रतिनिधी आणि युवकांची स्वतंत्र फळी सक्रिय केली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
फोनवरून मनधरणी
मोबाईल फोन हा प्रचाराचे प्रभावी माध्यम ठरत आहे. वैयक्तिक फोन, व्हॉट्सअॅप मेसेज, ऑडिओ-व्हिडिओ कॉलद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. मतदानासाठी नक्की या, ‘प्रभागाचा विकास तुमच्या हातात आहे’, अशी भावनिक साद घातली जात आहे. काही ठिकाणी दररोज ठराविक वेळेत बाहेरील मतदारांना फोन करण्याचे नियोजन केले जात आहे.
प्रत्यक्ष भेटींवर भर; बाहेरगावी दौरे
फोन संपर्क पुरेसा न मानता अनेक उमेदवार आणि त्यांच्या प्रमुख समर्थकांचे बाहेरगावी दौरे सुरू आहेत. मतदारांची घरी भेट घेतली जात आहे. सुट्टीच्या दिवशी या भेटी अधिक वाढविल्या जात आहेत.
नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींवर दिली जबाबदारी
प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे बाहेरील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नातेवाईक, मित्र, सहकारी आणि ओळखीच्या व्यक्तींचे ‘जाळे’ प्रभावीपणे वापरले जात आहे. कुटुंबीयांमार्फत संदेश पोहोचवून भावनिक साद घातली जात आहे. आपल्याच घरातील उमेदवार आहे, असा सूर लावून मतदारांना मतदानासाठी येण्याची विनंती केली जात आहे.
मतदानाच्या दिवशी उपस्थिती महत्त्वाची
बाहेरील मतदार मतदानाच्या दिवशी शहरात दाखल झाल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम निकालावर होणार आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात बाहेरील मतदारांसाठी विशेष लक्ष केंद्रित केले जात असल्याचे चित्र आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे फोन, भेटी आणि मनधरणीचा ‘वेग’ अधिकच वाढत असून बाहेरील मतदारांचा कौल कुणाच्या पारड्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

