‘गुलाल आमचाच’...कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
‘ड’ प्रभाग कार्यालय
पिंपरी, ता. १६ : महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय रहाटणी येथील मतमोजणी केंद्रावर प्रभाग क्रमांक २५, २६, २८ आणि २९ या चार प्रभागांची मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होताच ‘ड’ प्रभाग कार्यालयाबाहेर विजयी उमेदवार, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. एकमेकांना गुलाल लावत, जोरदार घोषणा देत आणि फटाके फोडत संपूर्ण परिसर आनंदोत्सवाने दुमदुमून गेला. विजयी उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू अनावर झाले. आलिंगन, अभिनंदन आणि भावनिक क्षणांनी परिसर भारावून गेला. तब्बल आठ वर्षांनी निवडणूक झाल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.
प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक २६ मध्येही भाजपने वर्चस्व राखले. प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपचे तीन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार विजयी ठरला. या प्रभागात माजी नगरसेविका शीतल काटे यांचा निसटता पराभव झाला. प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव येथे आमदार शंकर जगताप यांचा बालेकिल्ला पुन्हा एकदा कायम राहिला. या प्रभागात भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. चारही प्रभागांतील निकालांनी ‘ड’ प्रभाग कार्यालय परिसरात राजकीय उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी हा विजय जल्लोषात साजरा केला.
दहाव्या फेरीअखेरचे मताधिक्य जाहीर होताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरील रस्त्यावर जल्लोष करत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलाल भंडाऱ्याची उधळण करत परिसर दुमदुमून गेला. विजयीचा खात्री पटताच उमेदवार देखील कार्यालयाबाहेर हजर झाले. त्यांना उचलून धरत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणत्याही वादाशिवाय आणि सुनियोजित पद्धतीने ही मतमोजणी शांततेत पार पडली. मतममोजणी कार्यालयाच्या बाहेरील औंध-रावेत बीआरटी मार्गाच्या पलिकडे उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना थांबण्याची सूचना पोलिसांनी केली होती. त्यानुसार सर्व कार्यकर्ते रस्त्याच्या पलिकडेच थांबले होते. विजय निश्चित होताच जल्लोष करत उमेदवारांसह कार्यकर्ते मतमोजणी केंद्रासमोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

