ओपन जिप्सी, सनरूफ वाहने ‘सुसाट’
अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ ः महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस राहिले असल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी स्टार प्रचारक, नेत्यांसाठी खास वाहनांची सुविधा केली जात आहे. सध्या प्रचारात ओपन जिप्सी, ओपन टॅम्पो, सनरूफ असलेल्या वाहनांची मागणी वाढली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात १२८ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महापालिकेचा गड कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी भाजप तर भाजपाच्या ताब्यातून गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीसह इतर पक्ष मैदानात उतरले आहेत. यासाठी सर्वच पक्षांकडून मास्टर प्लॅन आखण्यात आला असून, त्यानुसारच प्रचाराचे प्लॅनिंग केले आहे. सर्व इच्छुकांसाठी एकाच ठिकाणी प्रमुख नेत्यांच्या सभा किंवा रोड-शो आयोजित केले जात आहेत. या स्टार प्रचारक आणि नेत्यांसाठी इच्छुकांकडूनही वातानुकूलित वाहने, सनरुफ वाहने आणि ओपन जिप्सीसह इतर वाहनांची तजबीज केली जात आहे. तसेच प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांना फ्लेक्सपासून एलईडी स्क्रीन लावण्यापर्यंतची सर्वच कामे वाहन पुरवठादारांना दिली जात आहेत. त्यामुळे वाहन पुरवठा दारांना ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसून येते.
एसी वाहनांना मागणी
महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वातावरणाबरोबरच हवामानाचा पारा चढला असून, कमाल तापमानात वाढ झाली आहे. दुपारी कडक उन्हाचे चटके लागत आहेत. उन्हात प्रचार करताना कार्यकर्त्यांसह उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारामध्ये वातानुकूलित (एसी) वाहनांना मागणी वाढली आहे. उमेदवारांसह कार्यकर्तेही वातानुकूलित वाहनांचा वापर करताना दिसून येत आहेत.
कोणत्या वाहनांना मागणी
निवडणूक प्रचारासाठी सायकलपासून फ्लोट ट्रकपर्यंत वाहनांचा वापर होतो. उमेदवारांकडून प्रचारासाठी ओपन जिप्सी, सनरुफ असलेली वाहने वापरली जात आहेत. जिप्सीला अधिक मागणी असल्याचे काही वाहन पुरवठादार सांगतात.
काय आहेत दर
प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये असलेल्या विविध सुविधांनुसार वाहनांचे दर ठरवले जातात. पेट्रोल आणि डिझेल सोडून प्रतिदिवशी ओपन जिप्सीला साधारण पाच ते आठ हजार रुपयांचे भाडे आहे. टेम्पो आणि बसचे दर किलोमीटरनुसार ठरवले जातात.
नियम काय आहे?
- निवडणूक प्रचारामध्ये वाहनांच्या वापरावर मर्यादा नाही, परंतु याकरिता निवडणूक आयोगाची आणि आरटीओची परवानगी घेणे गरजेचे असते. परवाना नसलेल्या वाहनांचा वापर करता येत नाही.
- वाहनात स्वतंत्र लाउड स्पीकर बसवणे किंवा त्यामध्ये बदल करायचा असेल तरी आरटीओची परवानगी घ्यावी लागते. संबंधित वाहनाच्या परवाना कार्डची मूळ प्रत वाहनाच्या पुढच्या स्क्रीनला चिकटवणे गरजेचे आहे व ते वाहन कोणत्या उमेदवारांसाठी वापरले जात आहे, याचा उल्लेख स्पष्टपणे करणे अनिवार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

