पिंपरी प्रदूषण भाग दोन

पिंपरी प्रदूषण भाग दोन

Published on

प्रदूषण मालिका ः भाग दोन
--
तिहेरी प्रदूषणाचा
उद्योगनगरीला विळखा

नद्यांसह ध्वनी आणि वायू प्रदूषणातही वाढ

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ ः माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. यापूर्वी स्वच्छ अभियान असो वा ई-गव्हर्नन्स यांमध्ये पहिल्या दहा शहरांत स्थान पटकावले आहे. मात्र, पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांसह हवा व ध्वनी प्रदूषण रोखण्यास अपयश आल्याचे चित्र आहे. कारण, दिवसा असो वा रात्र, सकाळी असो वा सायंकाळी प्रदूषणाचे ढग शहरावर कायम दिसतात. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास राहण्यासाठी पिंपरी चिंचवडची निवड का केली? असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येईल. यास नागरिकांसह प्रशासनही जबाबदार असेल, यात शंका नाही. कारण, तीनही प्रकारच्या प्रदूषणास सर्वच जबाबदार आहेत.

गेल्या वीस वर्षांत पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलला आहे. नदी व लोहमार्गावरील उड्डाणपुलांमुळे सर्व शहर कनेक्ट झाले आहे. १९९७ मध्ये समाविष्ट झालेल्या १८ गावांचा झपाट्याने विकास होत आहे. गगनचुंबी इमारती अर्थात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. पुढेही उर्वरित शेती क्षेत्र नष्ट होऊन कॉंक्रिटच्या इमारती उभ्या राहतील. खासगीसह महापालिका व राज्य व केंद्र सरकारतर्फे सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमुळेही ध्वनी व वायू प्रदूषणात भर पडत आहे. घरांमधील व औद्योगिक परिसरातील सांडपाणी नाल्यांद्वारे थेट नद्यांमध्ये मिसळत आहे. त्यामुळे तीनही नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. या सर्वच प्रकारचे प्रदूषणमुक्त शहर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीत महापालिका असो की प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यातर्फे सुरू असलेले प्रयत्न केवळ तोंडदेखलेपणाचा नमुना आहे.

बांधकामांचा परिणाम
- पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकाम क्षेत्र
- निवासी, व्यावसायिक व औद्योगिक वापराच्या प्रकल्पांचा समावेश
- बांधकामांची संख्या सुमारे सात लाख ८० हजारांवर
- राज्याच्या विविध भागांसह अन्य प्रांतातील नागरिकांकडून शहराला पसंती
- वाढत्या लोकसंख्येमुळे निवासी क्षेत्रात बांधकामांत वाढ
- पाया खोदावा लागत असल्याने खडक फोडताना यंत्रांचा आवाज होत असल्याने ध्वनिप्रदूषण
- खोदकाम करताना व त्याचा राडारोडा वाहतूक करताना धूळ उडत असल्याने हवा प्रदूषण
- रेडिमिक्स कॉंक्रिट प्रकल्पांच्या (आरएमसी) परिसरातही धुळीमुळे त्रास

रखडलेले प्रकल्प
- महापालिकेतर्फे निगडी ते दापोडी मुख्य जलवाहिनी टाकण्याचे पिंपरी ते निगडी विस्तारीत मेट्रो मार्गाचे कामही सुरू असल्याने खोदकाम सुरू
- मुंबई-पुणे महामार्गाच्या दोन्ही बाजूस औद्योगिकचे निवासी भूखंडात रूपांतर केल्याने मोठमोठ्या गृहप्रकल्प उभारणी करताना पाया खोदताना, तेथील राडारोडा वाहून नेताना, यंत्रांचा व वाहनांचा आवाज होऊन ध्वनिप्रदूषण होते. धुलीकण उडून हवाही दूषित
- देहू-आळंदी रस्त्यावर चिखली, मोशी, डुडुळगाव परिसरात आणि समाविष्ट गावांमध्ये विशेषतः पुनावळे, ताथवडे, किवळे, चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव धुलीकनांमुळे प्रदूषणात वाढ

रस्त्यांच्या कामांमुळे प्रदूषण
- वर्षानुवर्षे रखडलेले रस्ते (डीपी रोड) विकासावर भर दिला असून, समाविष्ट गावांत सर्वाधिक रस्ते आहेत. त्यावरील आरक्षणांवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू असून, जागा ताब्यात आलेल्या ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण सुरू
- पावसाळ्यात खड्डेमय झालेल्या जुन्या रस्त्यांचेही डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण सुरू
- देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाच्या सेवा रस्त्याचेही काम काही ठिकाणी सुरू असल्याने तेथील प्रदूषण पातळी अधिक

गेल्या वर्षीचे बांधकाम प्रकल्प
- परवानगी मिळालेले ः ३००
- पूर्णत्वाचा दाखला मिळालेले ः ६५३
- रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प ः ६४४
- सौरऊर्जा प्रकल्प ः ३००
- उंच इमारती प्रकल्प ः ११९

इमारतींची वर्षनिहाय माहिती
वर्ष / प्रकल्प / सौरऊर्जा प्रकल्प इमारती / रेनवॉटर हार्वेस्टिंग इमारती
२०२३ / १४८७ / ३२४ / ७३०
२०२४ / १३७९ / ३०० / ६९७
२०२५ / ४२० / ११८ / २१९

महापालिकेचे प्रकल्प
- आर्थिक दुर्बल घटक प्रकल्प ः १ (सेक्टर १७ व १९, चिखली घरकूल प्रकल्प)
- झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ः ६ (अजंठानगर, वेताळनगर, मिलिंदनगर, विठ्ठलनगर, सेक्टर २२, लिंकरोड पत्राशेड)
- पंतप्रधान आवास योजना ः ५ (बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, आकुर्डी, पिंपरी, डुडुळगाव
----
९७११३, ९७१०९, ९७११०, ९७१११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com