वाहन संख्येमुळे स्थिती ‘चिंताजनक’

वाहन संख्येमुळे स्थिती ‘चिंताजनक’

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ : पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोंडीची समस्या गंभीर झालीच आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणातही भर पडली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार गेल्या काही काळात शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सतत ‘खराब’ ते ‘चिंताजनक’ श्रेणीत नोंदवला जात आहे.

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत २५ लाख ४९ हजार ४८९ वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये सरासरी ७१ टक्के वाहनेही पेट्रोलवर चालणारी आहेत. यात ८८ टक्के दुचाकी आणि कारचा समावेश आहे. ही संख्या फक्त शहरातील आहे. यामध्ये दररोज अन्य शहरांतून येणाऱ्या वाहनांची तर नोंदच नाही.
अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि स्वतःचे वाहन असणे हा आता मध्यमवर्गीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग होत असल्याने दिवसेंदिवस खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, ही वाहनांची संख्या प्रदूषणबरोबरच अनेक समस्यांना निमत्रंण देत आहे. प्रत्येक नवीन कार प्रति किलोमीटर सरासरी ३.१५ किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करते. त्यामुळे पर्यावरणातील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार (दमा, ब्रॉन्कायटिस), हृदयरोग, फुप्फुसांच्या समस्या आणि कर्करोग आणि मानसिक आजारही होत आहेत.

वाहनांमधून निघणारे विषारी वायू
पेट्रोल आणि डिझेलच्या अपूर्ण ज्वलनामुळे वाहनांमधून कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, हायड्रोकार्बन्स आणि सूक्ष्म धुलिकण (पीएम २.५/पीएम १०) हे विषारी वायू बाहेर पडतात.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पारंपरिक इंजिन नसल्यामुळे आणि इंधनाचे ज्वलन होत नसल्याने, ती चालताना थेट वायू प्रदूषण करत नाहीत. यामुळे नायट्रोजन ऑक्साइड किंवा कार्बन मोनोऑक्साइड सारखे हानिकारक वायू बाहेर पडत नाहीत. इलेक्ट्रिक मोटर्स शांत असल्याने हे वाहने ध्वनी प्रदूषणही कमी करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना सरकार आणि कंपन्यांकडून प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉईंटसारख्या प्राथमिक सुविधा नसल्यामुळे आणि वाहनांच्या जास्त किंमतीमुळे ईलेक्ट्रिक वाहने खरेदीला नागरिकांचा प्रतिसाद कमी आहे.

‘पीयूसी’चा उपयोग काय?
वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूला लगाम लावण्यासाठी सर्व वाहनांना ‘पोल्युशन अंडर कंट्रोल’ चाचणी प्रमाणपत्र (पीयूसी) बंधनकारक आहे. पर्यावरणाला धोकादायक ठरेल एवढ्या प्रमाणात विषारी वायू वाहनांमधून बाहेर पडत नाही ना, हे तपासणे हा ‘पीयूसी’ चाचणीचा उद्देश आहे; मात्र ‘पीयूसी’ म्हणजे केवळ दंड वाचवण्याचे साधन झाले आहे. ते देणाऱ्या यंत्रणांकडूनही गांभीयाने तपासणी केली जात नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

आकडे बोलतात
- २०२५ मध्ये दोन लाख १८ लाख नवीन वाहनांची नोंदणी
- एका वर्षात नोंदणी होणारी आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या
- २०२५ मध्ये एक लाख ८४ हजार ८३८ दुचाकी आणि कारची नोंदणी
- दर दिवसाला सरासरी ५०६ नवीन कार व दुचाकी रस्त्यावर
------
२५ लाख ४९ हजार ४८९
शहरातील एकूण वाहने
(२१ फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत)
--------
वर्षनिहाय नव्या वाहनांची नोंद
२०२० - १,०१,४०८
२०२१ - १,०७,८११
२०२२ - १,४९,२८४
२०२३ - १,७६,९८३
२०२४ - १,९१,५२०
२०२५ - २,१८,४३३
--------
शहरातील वाहनांची एकूण संख्या
दुचाकी - १७,२४,२७६
तीनचाकी - ५९,०५२
मोटार कार - ५,३९,४८९
कॅब - ३८,४८२
बस - १७,४०२
रुग्णवाहिका - २,१८०
माल वाहतूक वाहने - १,२५,११२
मॅक्सी कॅब - १,३२७
इतर वाहने - ४२,१६९
------------
इंधननिहाय शहरातील वाहनसंख्या
पेट्रोल - १८,२५,०३१
डिझेल - ३,३३,९४३
डिझेल/हायब्रिड : २,७०७
सीएनजी - ४०,९०६
इलेक्ट्रिक (बीओव्ही) - ५३,०४९
प्युअर इलेक्ट्रिक - २१,७८०
एलएनजी - ६१६
एलपीजी - १३
इथेनॉल - ३२
पेट्रोल/सीएनजी - १,७९,३८९६
पेट्रोल/सीएनजी (ई-२०) - ५,३८९
पेट्रोल/हायब्रिड (ई-२०) - ४०५
पेट्रोल/इथेनॉल - ६७,२२४
पेट्रोल/हायब्रिड - ९,२५८
पेट्रोल/एलपीजी - ४,४८४
इतर वाहने : २,९४५
प्लग इन हायब्रिड ईव्ही : ४
सोलर - २५
स्ट्राँग हायब्रिड ईव्ही : २,२८२

माहिती स्रोत : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com