आरोग्याला धोका असेल, तर असला विकास नकोच

आरोग्याला धोका असेल, तर असला विकास नकोच

Published on

आरोग्याला धोका असेल, तर असला विकास नकोच
पुणे, पिंपरी चिंचवड शहरांतील प्रदूषणाबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

पिंपरी, ता. २४ : वायू प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत ही स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची स्थिती आहे. या गंभीर स्थितीबाबत शहरातील नागरिक आपली मते ‘सकाळ’कडे व्यक्त करत आहेत. राज्य शासन, महपालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रक महामंडळ यांच्या कामकाजावर टीका होत आहे.

पुण्यातील हवेत दर तासाला सहा टन सिमेंट मिसळत असेल, तर कोणता गुणवत्तापूर्ण विकास होत आहे आणि कोणासाठी? मानवी आरोग्य धोक्यात येत असेल तर असला विकास काय कामाचा? आता किमान पाच वर्षे तरी सर्व बांधकामे बंद ठेवली पाहिजेत. यासाठी पुणेकरांनी आवाज उठवलाच पाहिजे. आम्ही पुनावळे परिसरात राहत आहोत. घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. रस्ते कधी पूर्ण आणि स्वच्छ होतील, कधी इमारत बांधकाम बंद होईल असे झाले आहे. शासनाने प्रदूषण नियंत्रणासंदर्भात योग्य भूमिका घेऊन नागरिकांना निसर्गाने दिलेल्या स्वच्छ हवेत आनंदाने जगू द्या. इमारतीपेक्षा गार्डन आणि निसर्गरम्य पार्क उभारण्यात शासनाने पुढाकार घ्यावा. ‘सकाळ’ने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद.
- डॉ. जिभाऊ बच्छाव, सेवानिवृत्त प्राचार्य

माती, सिमेंट, आरसीसी वाहून नेणारे ट्रकचालक, ओव्हरलोड वाहतूक काळजीपूर्वक न केल्यामुळे सिमेंट, माती रस्त्यावर पडते. रस्त्याकडेची माती, राडारोडा कोणी दररोज उचलत नाहीत. त्यामुळे हवा प्रदूषित होत आहे.
- राजेंद्र घोलप,

मी पुनावळे येथील विष्णुदेवनगर येथे सप्टेंबर २०२१ पासून राहतो. सोसायटीला लागूनच पालिकेचे उद्यान आहे. मागील काही दिवसांपासून मला बागेत खूप धुळीचे वातावरण जाणवत आहे. मी आता मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. पहाटे ४ वाजल्यापासूनच बांधकामांना सुरुवात होते. त्याचा प्रचंड आवाज सुरू होतो. सर्व झाडांच्या पानांवर आणि फांद्या पांढऱ्या धुळीचा थर जमा झालेला दिसतो. पालिकेला बिल्डर/फ्लॅट खरेदीदारांकडून करापोटी पैसे मिळतात. सरकारला जीएसटी आणि नोंदणीतूनही पैसे मिळत आहेत. पण हवेच्या गुणवत्तेबद्दल काय ? आता मला माझे कुटुंब चांगले हवामानासाठी इतर ठिकाणी न्यावेसे वाटत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे.
- एक नागरिक

सर्व प्रकल्प बंद करून फक्त पावसाळ्यातच त्यांना परवानगी देण्याची गरज आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व काळजी घेऊन फक्त पाच-दहा टक्के बांधकामांनाच काम करण्याची परवानगी दिली पाहिजे. अन्यथा एक दिवस नागरिकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागेल. - एक नागरिक

प्रदूषणाचा खूप त्रास आहे. सरकार, महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे झोपले आहे. करू शकणारी कामे करत नाही अणि सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळत आहे. आपण सर्व हे सगळं ठीक करून एक उत्तम उदाहरण ठेवू शकतो. उपाय हे तात्पुरते नसावेत. पूर्ण भविष्याचा विचार केला गेला पाहिजे.
- एक वाचक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com