प्रदूषण नियंत्रणासाठी अखेर महापालिका सरसावली

प्रदूषण नियंत्रणासाठी अखेर महापालिका सरसावली

Published on

सकाळ इफेक्ट

पिंपरी, ता. २६ : पिंपरी चिंचवड शहरातील हवा अतिशय प्रदूषित झाली आहे. पवना, मुळा, इंद्रायणी या नद्या मरणासन्न अवस्थेत आहेत. ध्वनी प्रदूषणानेही अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. याबाबत ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्‍वास’ अशी वृत्तमालिका शनिवारपासून (ता.२१) सुरू केली आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम मांडला जात आहे. त्याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली आहे.

शहरातील वाढत्या प्रदूषणासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी गुरुवारी (ता.२६) अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, ‘‘महापालिकेतील विविध विभागांनी समन्वयाने काम करून प्रदूषण नियंत्रणाची गती वाढवावी. प्रदूषणाशी संबंधित नियमावलीची व्यापक जनजागृती करावी,’’ असा आदेश दिला. शहरातील बांधकाम व औद्योगिक आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांतील हवा, पाणी व ध्वनी प्रदूषणाबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. त्याअंतर्गत प्रदूषणास कारणीभूत विविध कारणांकडे आतापर्यंत लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जात आहेत. या वृत्तमालिकेची दखल घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने उपाययोजनांबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यांस महापालिका मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, आरोग्य कार्यकारी अधिकारी किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता सोहन निकम, योगेश आल्हाट, सूर्यकांत मोहिते, उपअभियंता पंकज धेंडे, प्रीती गाडे, अशोक मोरे, संजय चव्हाण यांच्यासह पर्यावरण, स्थापत्य, बांधकाम परवाना आणि आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांचे आदेश
- महापालिकेतील विविध विभागांनी समन्वयाने काम करून प्रदूषण नियंत्रणाची गती वाढवावी
- प्रदूषणाशी संबंधित नियमावलीची व्यापक जनजागृती करावी
- उपद्रव शोध पथकातील मनुष्यबळात वाढ करावी
- शहरातील प्रत्येक बांधकाम प्रकल्प, रेडिमिक्स काँक्रिट प्लॅंट आणि औद्योगिक परिसरांची पाहणी करावी.
- संबंधित परिसरात ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ मधील (ग्रॅप) नियमांचे पालन होते का, याची तपासणी करावी
- नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई करावी

‘एक्यूआय मॉनिटरिंग’ अनिवार्य
शहरातील बांधकामांच्या स्थळांवरून उडणारी धूळ आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधकाम प्रकल्प आणि ‘आरएमसी प्लॅंट’वर ‘एक्यूआय मॉनिटरिंग सिस्टीम’ अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांक निरीक्षण यंत्रणा बसविणे अनिवार्य आहे. त्यानुसार त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यामुळे त्या परिसरांतील प्रत्यक्ष हवा गुणवत्ता सतत मोजण्यास मदत होईल आणि नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करता येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत अधोरेखित केले.

जनजागृतीवर अधिक भर द्या
अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदूषण नियंत्रणाशी निगडित नियम, जबाबदाऱ्या आणि अंमलबजावणी प्रक्रियेबाबत सूचना केल्या. तसेच ‘‘शहरातील सर्व नागरी आणि व्यावसायिक आस्थापना, बांधकाम, औद्योगिक क्षेत्र तसेच दैनंदिन कामकाजाशी संबंधित प्रत्येक घटकापर्यंत प्रदूषणासंदर्भातील नियमावलीची माहिती देण्याच्या अनुषंगाने जनजागृतीवर अधिकाधिक भर द्यावा,’’ असेही सांडभोर यांनी सांगितले.

बांधकाम व औद्योगिक आस्थापनांनी ‘ग्रॅप’अंतर्गत सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करणे अत्यावश्यक आहे. धूळ नियंत्रण, उत्सर्जन व्यवस्थापन आणि स्वच्छतेसंदर्भातील कोणतीही ढिलाई स्वीकारली जाणार नाही. प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिका कठोर भूमिका घेत असून नियमभंग करणाऱ्यांवर त्वरित कारवाई केली जाईल. सर्व विभागांनी समन्वयाने व जलद गतीने कार्य करून शहराच्या हवा गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा घडवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

बांधकाम प्रकल्प आणि ‘आरएमसी प्लॅंट’वर प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजना राबवाव्यात. उपद्रव शोध पथकांनी केलेली कारवाई आणि वसूल केलेला दंड हे शहरातील शिस्तबद्धता वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुढील काळात आम्ही तपासणी अधिक मजबूत करणार असून नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित आस्थापनांकडून संपूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com