आज ठरणार जिल्हा परिषदेचा कारभारी
पुणे, ता. १८ ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बुधवारी (ता. १८) होणार आहे. त्यापूर्वीच जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असल्याने अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ अखेर कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या ७३ पैकी ५१ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असून इच्छुकांकडून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठींवर मागील काही दिवसांपासून भर दिला जात आहे. जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे निवडीची सूत्रे असल्याचे सांगितले जात आहे. तरीही अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. पक्षाच्या बैठकीत जिल्हा परिषदेसंबंधीची जबाबदारी भरणे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीलाच इंदापूर तालुक्यातील श्रीमंत ढोले यांची गटनेतेपदी निवड केली आहे. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाचा निर्णय अखेर बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार असून, इच्छुकांच्या हालचाली शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत.
अशी होणार प्रक्रिया
अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता सभेच्या कामकाजास सुरुवात होणार आहे. सभेत प्राप्त झालेली नामनिर्देशनपत्रे सर्व सदस्यांना दाखविण्यात येणार आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाईल. छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार राहिल्यास आवश्यकतेनुसार हात वर करून मतदान घेतले जाणार आहे. त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

