झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू
नसरापूर, ता. १९ : बनेश्वर (ता. भोर) येथील मंदिरात येणाऱ्या भाविकांना व वनउद्यानातील पर्यटकांना त्रास देणाऱ्या मधमाश्यांचा बंदोबस्त करण्यासाठी झाडावर चढून मधमाशांचे पोळे काढणाऱ्या आदिवासी तरुणाचा झाडावरून पडून मृत्यू झाला. विष्णू मारुती पवार (सध्या रा. वागजवाडी, ता. भोर), असे त्याचे नाव आहे.
बनेश्वर मंदिर परिसरात नागरिकांवर होत असलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यावर उपाय म्हणून ही पोळी काढण्याचे काम तीन ते चार आदिवासी तरुणांना देण्यात आले होते. मंगळवारी (ता. १७) रात्रीच्या सुमारास हे तरुण पोळे काढत असताना विष्णू पवार हा उंचावरील फांदीवरून पाय घसरून खाली पडला व गंभीर जखमी झाला. या वेळी तेथे उपस्थित असलेले त्याचे सहकारी व वनकर्मचाऱ्यांनी त्यास तातडीने नसरापूर येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तेथे उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, बनेश्वर मंदिरासमोर वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या या झाडावर मधमाश्यांची अनेक पोळे आहेत. या माशांचा येथील पर्यटक व भाविकांना त्रास होत आहे. त्यामुळे बनेश्वर देवस्थानने वनविभागाला पत्र पाठवून ही पोळे काढण्यास सांगितले होते. यावर वनविभागाने देवस्थान ट्रस्टला पुन्हा पत्र पाठवून या कामासाठी प्रशिक्षित व अनुभवी कर्मचारी वनविभागाकडे नाही. त्यामुळे मध संचलनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ शिवाजीनगर पुणे या ठिकाणी संपर्क साधण्यास सांगितले होते. या दरम्यान आदिवासी तरुणांना पोळे काढण्यासाठी कोणी बोलावले, बोलावल्यावर त्यांना झाडावर चढताना सुरक्षा का पुरवली नाही? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
आदिवासी समाजाच्या सत्यशोधक बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव गणपत काटेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले, ‘‘पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी समाज जिवावर उदार होऊन काम करतात. त्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कामासाठी बोलावणाऱ्यांची होती. मृत विष्णू याच्या मागे दोन लहान मुले आहेत. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

