वैज्ञानिक वसा जपणारे खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र

वैज्ञानिक वसा जपणारे 
खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र
Published on: 

खोडदमध्ये १९८० ते ९०च्या दशकात ‘महाकाय मीटर तरंगलांबीची रेडिओ दुर्बीण-जीएमआरटी’ या जगप्रसिद्ध खगोलीय वेधशाळेची यशस्वी उभारणी झाली. ही उभारणी केल्यानंतर जीएमआरटीचे संस्थापक आणि भारतीय रेडिओ खगोल शास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांच्या स्वप्नातील आणखी एक प्रकल्प आकार घेत होता. जीएमआरटीमुळे भारताची विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील झेप आणखी विस्तारली होती.

डॉ. गोविंद स्वरूप आणि सहकारी वैज्ञानिकांचा आतंरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला होता. तथापि ज्या गावाने रेडिओ दुर्बीण प्रणाली उभारणीसाठी एवढी जागा दिली होती, त्या खोडद गावासाठी आम्हां वैज्ञानिकांना काय करता येईल, यासंदर्भात डॉ. स्वरूप विचार करत होते. विचारांती शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांसाठी कार्य करण्याचे निश्चित झाले. खोडद ग्रामस्थ, गावातील उच्चशिक्षित युवा वर्ग, गावातील जीएमआरटीत असलेले कर्मचारी, जीएमआरटीतील शास्त्रज्ञ तसेच स्वतः डॉ. स्वरूप आणि त्यांचे सहकारी डॉ. अनंतकृष्णन अशा सर्वांच्या विचारविनिमयातून गावातील प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या प्रांगणात ‘खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र’ उभारण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर या विज्ञान केंद्रासाठी खोडद ग्रामस्थ, डॉ. स्वरुप, डॉ. अनंतकृष्णन आदी सर्वांनी भरीव योगदान दिले आणि २०११मध्ये खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र कार्यन्वित झाले.

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान, गणित, संगणक या विषय-क्षेत्रांमध्ये प्रयोग-प्रात्यक्षिके, निरीक्षण, हस्तकौशल्याच्या माध्यमातून विविध प्रारूपे (मॉडेल्स) विकसित करत पथदर्शक कार्य करण्याचा उद्देश या केंद्राने समोर ठेवलेला आहे. ग्रामीण विद्यार्थी-शिक्षकांसाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे विज्ञान केंद्र कटिबद्ध आहे. आजतागायत खोडद ग्रामीण विज्ञान केंद्राने खोडदबरोबरच सभोवतालच्या गावांमधील माध्यमिक शाळा, जुन्नर तसेच आंबेगाव, राजगुरुनगर या तालुक्यांमधील विज्ञान-गणित-मुख्याध्यापक संघांच्या सहकार्याने सुमारे ५० पेक्षाही जास्त माध्यमिक शाळांपर्यंत आणि त्यातून शेकडो शिक्षक आणि हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत आपले उपक्रम घेऊन जाण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू ठेवला आहे. यासाठी जीएमआरटीमधील प्रसार विभागाचीही मदत होत आहे.

या उपक्रमांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या दैनंदिन इतिहासाच्या नोंदी ठेवण्यापासून, वर्तमानपत्रातील विज्ञान-तंत्रज्ञानविषयक कात्रणांचे संकलन, खेळण्यांमधील विज्ञान-तंत्रज्ञान समजावून घेणे, रोजच्या चर्चा-संवाद, विज्ञान-तंत्रज्ञान कोडी सोडवणे, प्रयोग-प्रात्यक्षिके करणे, अभ्यासक्रमाशी संबंधित डॉक्युमेंट्री-ॲनिमेशनपट दाखवणे, पर्यावरण-खगोलविषयक निरीक्षण-नोंदी करणे, पर्जन्यमापन करणे असे काही उपक्रम आहेत. तर या विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वार्षिक विज्ञान प्रश्नमंजुषा, पुस्तक वाचन उपक्रम घेतले जातात. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमितपणे कार्यशाळा-शिबिरे आयोजित केली जातात. अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच विज्ञान केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे धडे देखील दिले जात आहेत.

भारतीय संविधानाला अनुसरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खगोलशास्त्र संशोधन संस्था, संस्थेतील वैज्ञानिक आणि खोडद गावातील ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन उभारलेले ‘खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र’ मानवी वाटचालीत एकविसाव्या शतकाला साजेसे कार्य करत आहे.

- सुधीर फाकटकर, मार्गदर्शक,
खोडद ग्रामीण विज्ञान केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com