उपलब्ध खतसाठ्यावर खरिपाची भिस्त

उपलब्ध खतसाठ्यावर खरिपाची भिस्त
Published on

पुणे, ता. ८ : युद्धजन्य परिस्थितीत खत पुरवठा साखळीवर ताण निर्माण होत असताना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खत उपलब्धतेचे चित्र दिलासादायक आहे. युरिया, डीएपीसह इतर खतांची एक लाख ९४ हजार ५०० टन मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ८८ हजार ३४ टन साठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध साठा आणि शासनाच्या नियोजित पुरवठ्यामुळे खरिपात मोठी अडचण येणार नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

कृषी विभागाकडून खतांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर्षी खताच्या आयातीवरच परिणाम झाल्याने खताचा तुटवडा जाणवू शकतो. हा संभाव्य धोका ओळखून कृषी विभागाने काटेकोर नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. खरिपात जवळपास दोन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होते. यामध्ये प्रामुख्याने भात, सोयाबीन, बाजरी, मका, नाचणी, भुईमूग, मूग, तूर आणि उडीद यांचा समावेश आहे. दरम्यान, युरिया, डीएपी, एनपीकेसारख्या प्रमुख खतांपैकी काहींचा कच्चा माल आयातीवर अवलंबून आहे.


खताचा शिल्लक साठा........८८,०३४ टन
मंजूर कोटा........१,९४,५०० टन
संरक्षित युरिया साठा........८,४०० टन
संरक्षित डीएपी साठा........७५० टन

खरीपातील एकूण पेरणी क्षेत्र........२,०७,२५० हेक्टर


युरियाचा बफर झोन तयार असणार
खरिपामध्ये ऐनवेळी खताचा तुटवडा निर्माण झाल्यास, संरक्षित साठा आलेल्या खतांमधून बाजूला केला जातो. यावर्षी कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या तीन संस्थांकडे वीस गोदामात नऊ हजार १५० टन खताचा साठा हा संरक्षित करण्यात येणार आहे.


मागणी केलेले खत आणि शिल्लक खते (टनांत)
खताचा प्रकार........मागणी........शिल्लक
युरिया........८९,५००........१९,१४०
डीएपी........१४,२००........५,७६९
एमओपी........४,५००........१,४६१
मिश्र खते........६७,९००........४६,१२०
एसएसपी........१८,४००........१३,४६२

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही. मागील रब्बी हंगामातील काही प्रमाणात साठा शिल्लक असून, चालू खरीप हंगामासाठी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी शासनाकडून मागणी प्रमाणे खतांचा साठा मिळेल. खतांची उपलब्धता नियंत्रणात असून शेतकऱ्यांनी घाबरू नये.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

खरीप हंगामाच्या सुरुवातीला खते वेळेत मिळत नाही. या हंगामात युरिया व डीएपी खतांचा पुरवठा सुरळीत नाही. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत खतांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, शेतमालाला त्याप्रमाणात बाजारभाव मिळत नसल्याने खते विकत घेणे कठीण बनले आहे.
- स्वप्नील निंबाळकर, शेतकरी, जळगाव सुपे, (ता. बारामती)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com