सभापती उद्या ठरणार

सभापती उद्या ठरणार

Published on

पुणे, ता. ७ : जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी सोमवारी (ता. ९) होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने नवनिर्वाचित सदस्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांकडून तालुकास्तरीय बैठका घेतल्या जात असून स्थानिक समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. काही ठिकाणी स्पष्ट बहुमत नसल्याने राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. विशेषतः मुळशी, जुन्नर आणि भोर तालुक्यांत सभापतिपदासाठी चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात झालेल्या पक्ष बैठकीत नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले. पंचायत समित्यांमध्ये पक्षाच्या विचारांचा सभापती जास्तीत जास्त ठिकाणी निवडून यावा, यासाठी सक्रिय राहण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय आघाडीचे पर्याय, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि समन्वयाचे फॉर्म्युला यांचा आढावा घेणाऱ्या बैठका झाल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांनी तालुकानिहाय बैठका सुरू घेतल्या आहेत. तालुकाध्यक्षांकडून नवनिर्वाचित सदस्यांसह काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन याचबरोबर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठीही संभाव्य राजकीय कल तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, सभापती व उपसभापती निवडीच्या प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील सभापती पदांसाठी आरक्षणानुसार एक जागा अनुसूचित जमाती, एक अनुसूचित जमाती (महिला), दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग, दोन नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), तीन सर्वसाधारण, तर चार जागा महिला राखीव असणार आहेत.


स्पष्ट बहुमत नसलेल्या ठिकाणी अधिक चुरस
जुन्नर पंचायत समितीत भाजपचा एक, राष्ट्रवादी काँग्रेसचा सहा, शिवसेनेचे आठ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक असे एकूण १६ सदस्य आहेत. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने येथे आघाडीच्या पर्यायांचा शोध सुरू आहे. भोर पंचायत समितीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभापती निवडीवेळी एका मतालाही मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. मुळशी पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य विजयी झाले आहेत. भोरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील समन्वय आणि संभाव्य आघाडीचा फॉर्म्युला सभापती निवडीवेळी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंचायत समितीची स्थिती (कंसात निवडून आलेले सदस्य संख्या)
राष्ट्रवादी काँग्रेस - आठ पंचायत समिती
मावळ (१०), बारामती (१०), इंदापूर (१६), राजगड (३), आंबेगाव (८), शिरूर (८), पुरंदर (४), हवेली (६)
भाजप - एक पंचायत समिती
दौंड - (८)
शिवसेना (ठाकरे) - एक पंचायत समिती
खेड - (९)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com