युद्धस्थितीमुळे गॅस भाववाढीची ‘धग’

युद्धस्थितीमुळे गॅस भाववाढीची ‘धग’

Published on

पिंपरी, ता. ९ : अमेरिका-इस्राईल व इराण यांच्यातील युद्धाचे चटके शहरातील सर्वसामान्य नागरिकांना बसू लागले आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने नुकतीच वाढ केली. याचा परिणाम थेट स्वयंपाकघराचे ‘बजेट’ तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या व्यवसायांवरही होत आहे. तर, ‘‘इंधनसाठा पुरेसा असून पुरवठा आणि वितरण व्यवस्था सुरळीत आहे,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत; प्रत्यक्षात स्थिती मार्ग वेगळी आहे. नोंदणीनंतर दोन दिवसांत मिळणारा सिलिंडर आता पाच-सहा दिवसांनी मिळत आहे. त्यामुळे महागाईची धग सहन करण्यासह सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

शहरात प्रामुख्याने इंडियन ऑइल कंपनीचे ‘इंडेन’, भारत पेट्रोलियमचे ‘बीपीसीएल’, हिंदूस्तान पेट्रोलियमचा ‘एचपी’ गॅस या कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे वितरण केले जाते. दरम्यान, सात मार्च २०२६ पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरात ६० रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती ग्राहकांना दोन सिलिंडर वापरण्याची परवानगी असते. त्यासाठी पहिला सिलिंडर घेतल्यानंतर १५ दिवसांनी नवी नोंदणी करता येत होती. आता हा कालावधी २५ दिवसांपर्यंत अचानकपणे वाढवण्यात आला आहे. ‘‘आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असेल, तर तसे जाहीर करावे. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. सत्यस्थिती समजल्यास पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यास वेळ मिळेल,’’ अशा भावना त्रस्त ग्राहक व्यक्त करत आहे.

‘बुकिंग वाढल्याने पुरवठा साखळीवर परिणाम
काही दिवसांपासून वाढलेल्या ‘बुकिंग’मुळे सिलिंडरच्या पुरवठा साखळीवर ताण वाढला आहे. ‘‘इतर वेळी एका एजन्सीकडे दिवसाला ७०० ते ८०० गॅस सिलिंडरचे बुकिंग व्हायचे. आता गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे ही नोंदणी १,५०० पर्यंत गेली आहे,’’ असे वितरकांनी सांगितले.

नोंदणीसाठी आता २५ दिवसांचा कालावधी
युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या दुसऱ्या सिलिंडरसाठी १५ दिवसांचा कालावधी बदलून तो २५ दिवसांचा करण्यात आला आहे. याआधी ग्राहक कधीही सिलिंडर बुक करू शकत होते आणि तीन-चार दिवसांत तो घरपोच मिळत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता २५ दिवसांनंतरच नव्या सिलिंडरसाठी नोंदणी करावी लागणार आहे. तसेच केंद्र सरकारने महिन्यातून एकदाच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर देण्याबाबत सूचना गॅस वितरक कंपन्यांना दिल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयांनी नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यावसायिकांचा पुरवठा बंद
घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा शुक्रवारपासून (ता.६) बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल, कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांचा गॅसपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होण्याची भीती आहे. यावर प्रशासनाने तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कंपनी आणि गॅस पुरवठा केंद्र
१. हिंदुस्थान पेट्रोलियम - चाकण
२. भारत पेट्रोलियम - शिक्रापूर
३. इंडियन ऑइल - शिक्रापूर


सिलिंडर साठा राखीव
‘‘ऑइल कंपन्यांच्या केंद्रांतून पिंपरी चिंचवड शहराला गॅस पुरवठा केला जातो. येथे सध्या उपलब्ध असलेला सिलिंडरचा साठा घरगुती ग्राहकांसाठी राखीव ठेवला आहे,’’ असे वितरकांनी सांगितले.

आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडर वितरकांची तपासणी सुरू केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वितरक कंपन्यांवरील दररोजची आवक, बुकिंग, वितरण यांची तपासणी करण्यात येत आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार होऊ नये, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
-प्रशांत खताळ, सहायक अन्नधान्‍य वितरण अधिकारी, पुरवठा विभाग

आधी घरगुती ग्राहकांना महिन्यातून दोन गॅस सिलिंडर देता यायचे. आता मात्र युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महिन्यातून एकच गॅस सिलिंडर देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारकडून गॅस वितरकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सिलिंडरचे वितरण होणार आहे.
- मानव कांबळे, गॅस सिलिंडर वितरक, ‘एचपी’

महागाईमुळे सामान्य कुटुंबांचा आर्थिक डोलारा आधीच कोसळत आहे. त्यात आता सिलिंडरची भाववाढ झाली आहे. पूर्वी गॅस सिलिंडर लगेच मिळत होता. आता सिलिंडरसाठी आठ दिवसांनी बोलवले आहे. भाव वाढण्यासह वेटिंगदेखील वाढवले आहे.
- दीपा मुडूमल, घरगुती गॅस ग्राहक, चिखली

तांदूळ, सर्व डाळी, तेल आणि भाज्यांचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात आता गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागल्याने महिन्याचे गणित कसे जुळवायचे, हा मोठा प्रश्‍न आहे.
- सुनिता पारेख, गृहिणी, पिंपरीगाव

युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. व्यावसायिक वापराच्या गॅसबरोबर आता घरगुती सिलिंडरच्या नवीन दराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आधी बुकिंग केलेल्या ग्राहकांनाही नवीन दरानेच पैसे मोजावे लागले आहेत.
- दीपा परबत, खानावळ चालक

घरगुती वापराचा गॅस सिलिंडर
जुने दर : ८५६ रुपये
नवीन दर : ९१६ रुपये

व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर
जुने दर : १,७८१ रुपये
नवीन दर : १,८९६ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com