पिंपरी मोठ्या प्रभागात दमछाक
मोठ्या प्रभागांत उमेदवारांची दमछाक
विस्तारामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत; वाहनांचा प्रभावी वापर
पिंपरी, ता. ७ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरही उमेदवारांनी भर दिला आहे. मात्र, आकाराने मोठ्या प्रभागांत सर्वांचीच दमछाक होत आहे.
महापालिकेच्या ३२ प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. त्याच्या प्रचाराची एकेक फेरी बहुतांश उमेदवारांनी पूर्ण केली आहे. काहींनी पदयात्रा काढून तर काहींनी वाहन फेरी काढून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. काही उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांच्या सभाही दोन-तीन प्रभाग मिळून होत आहेत. मात्र, काही प्रभाग आकाराने खूपच मोठे असल्याने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांची दमछाक होताना दिसत आहे. मोठ्या प्रभागांमध्ये दोन, तीन, १६ आणि २५ यांचा समावेश होतो. या चारही प्रभागांचा समावेश असलेली चिखली (काही भाग), कुदळवाडी, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी गावठाण, डुडुळगाव, चऱ्होली, रावेत, किवळे, मामुर्डी, वाकड, ताथवडे, पुनावळे या समाविष्ट गावांचा समावेश होतो.
प्रचारात त्या-त्या भागांतील कार्यकर्ते
प्रभाग आकाराने व विस्ताराने मोठे असल्याने कार्यकर्त्यांना जा-ये करण्यासाठी अधिक वाहनांची व्यवस्था करावी लागते. त्यावर उपाय म्हणून त्या-त्या भागांतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच उमेदवारांनी प्रचारावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांची जाण्या-येण्याची, चहा-नाश्ता-जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे.
असे आहेत मोठे प्रभाग
प्रभाग दोन ः कुदळवाडी-जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी
महापालिका प्रभाग दोनमध्ये चिखली गावठाणाचा काही भाग, कुदळवाडी, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आणि पुणे-नाशिक महामार्गाच्या पश्चिमेकडील मोशी गावाचा समावेश होतो. श्री नागेश्वर महाराज उपबाजार समोरील रस्ता ते जिजाऊ चौक, स्पाइन रस्त्याच्या काही भाग ते इंद्रायणीनदीपर्यंतचा परिसर या प्रभागात येतो. देहू-आळंदी रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रभागाचा विस्तार आहे. या भागात नवीन गृहनिर्माण सोसायट्यांचाही समावेश आहे. एकेक सोसायटी पाचशे ते हजार-बाराशे सदनिकांची आहे. त्यामुळे तेथील लोकसंख्या पर्यायाने मतदार अधिक आहेत.
प्रभाग तीन ः मोशी-डुडुळगाव-चऱ्होली
पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडील मोशी गावठाणाचा भाग, शिवकॉलनी, बनकरवस्ती, बोराटे वस्ती, आल्हाट वस्ती, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर; डुडुळगाव, तळेकर वस्ती, पवार वस्ती, दत्तनगर, वहिलेनगर, गिलबिलेनगर, गावठाण; चऱ्होली गावठाणासह चऱ्होली फाटा, दाभाडेवस्ती, आझादनगर, वडमुखवाडी, चोविसावाडी, कोतवाल वस्ती, बुर्डेवस्ती, पठारे मळा, ताजणे मळा, काळजेवाडी, साई मंदिर व मॅग्झीन कॉर्नर परिसर, वाळकेमळा आदी भागांचा समावेश प्रभागात होतो. शहरातील सर्वात मोठा प्रभाग आहे. वाड्यावस्त्यांसह नवीन गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदार अधिक आहे.
प्रभाग १६ ः रावेत-किवळे-मामुर्डी
रावेत, किवळे, मामुर्डी या गावठाणांसह वाल्हेकरवाडीचा काही भाग, गुरुद्वारा परिसर, शिंदे वस्ती, डीवाय पाटील शैक्षणिक संकुल परिसर, प्राधिकरण सेक्टर २९, विकासनगर यांसह नॅनोहोम सोसायटी, रॉयल कासा सोसायटी, नंदगिरी सोसायटी, क्रिस्टल सिटी, के.व्हिले सोसायटी, के टाऊन सोसायटी, सिल्व्हर ग्रेसिया सोसायटी, भालचंद्र विहार सोसायटी, सेलेस्टीयल सिटी आदी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेशही या प्रभागात होतो. वाल्हेकरवाडीपासून मामुर्डीतील साईनगरपर्यंत आणि गुरुद्वारापासून किवळेतील पवनानदीपर्यंत आणि दक्षिणेकडील पवना नदीपासून उत्तरेकडील लोहमार्गापर्यंत प्रभागाचा विस्तार आहे.
प्रभाग २५ ः वाकड-ताथवडे-पुनावळे
वाकड, ताथवडे, पुनावळे गावठाणांसह वाड्यावस्त्यांचा आणि
गगनचुंबी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश या प्रभागात होतो. उत्तरेकडील पवना नदीपासून दक्षिणेकडील मुळा नदीपर्यंत आणि पूर्वेकडील सांगवी-रावेत बीआरटी मार्गापासून पश्चिमेकडील हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे या गावांच्या हद्दीपर्यंत प्रभागाचा विस्तार आहे. मुंबई-बंगळूर महामार्गामुळे (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विभागला आहे. महामार्ग ओलांडून पश्चिमेकडे प्रचाराला जाण्यासाठी भुजबळ चौक उड्डाणपूल, त्यालगतचे दोन भुयारी मार्ग, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे येथील भुयारी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही दमछाक होत आहे.
मोठ्या प्रभागांतील मतदार संख्या
प्रभाग / पुरुष / महिला / इतर / एकूण
२ / ३७,५८७ / ३१,९२२ / ९ / ६९,५१८
३ / ३७,५८४ / ३४,५१३ / ९ / ७२,१०६
१६ / ३९,२२४ / ३५,८७५ / ६ / ७५,१०५
२५ / ३६,४२७ / ३०,२५२ / ७ / ६६,६८६
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

