रणांगण पानासाठी उमेदवारांचा प्रचारसाठी ‘मॉर्निंग’ वॉक आणि मतदारांशी टॉक
प्रचारासाठी मॉर्निंग ‘वॉक’ अन् मतदारांशी ‘टॉक’
शहरातील उद्यानांसह योग केंद्रांच्या परिसरात उमेदवारांचे नियोजन
पिंपरी, ता. ७ : महापालिका निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंतचे विशेष नियोजन केले आहे. त्यात आता शहरातील जॉगिंग ट्रॅक आणि योग वर्गांना भेटी देणे सुरू केले आहे. सकाळच्या प्रसन्न वातावरणात मतदारांशी थेट संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग ठरत आहे.
अवघ्या आठ दिवसांवर मतदानाचा दिवस येऊन ठेपल्यामुळे एकही मिनिटही वाया न घालवता उमेदवार घरोघरी फिरत आहे. अनेक उमेदवार एक पाऊल पुढे जात ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या मतदारांना गाठून आम्हाला मते देण्याचे आवाहन करत आहेत.
नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, यशवंतनगरमधील उमेदवार सकाळीच ‘जॉगिंग ट्रॅक’वर मतदारांसोबत संवाद साधण्यासह योगासने आणि व्यायाम करणाऱ्यांशीही संवाद साधत आहेत. त्यामुळे विविध उद्यानांच्या परिसरांतील योग केंद्र, मॉर्निंग वॉक ट्रॅक परिसरात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली दिसत आहेत. मोठ्या सभांमध्ये उमेदवाराला प्रत्येक मतदारांशी बोलणे शक्य नसते. मात्र, सार्वजनिक बागा, मैदाने किंवा जॉगिंग ट्रॅकवर उमेदवार लोकांशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी वैयक्तिक गप्पा मारताना उमेदवार दिसत आहेत.
थेट समस्या मांडण्यावर भर
मॉर्निंग वॉकदरम्यान लोक अधिक मोकळेपणाने बोलत आहेत. ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिला आपल्या परिसरातील पाणी, रस्ते, कचरा किंवा सुरक्षेच्या समस्या थेट उमेदवारांसमोर मांडत आहेत. दुसरीकडे शहरांमधील सोसायट्यांमध्ये राहणारे लोक सहसा राजकीय सभांना जात नाहीत. मात्र, हे लोक सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडतात. अशा ‘सायलेंट व्होटर्स’ना कॅश करण्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ प्रचार फंडा प्रभावी ठरताना दिसत आहे.
आरोग्य आणि प्रचार एकाच वेळी
निवडणुकीच्या धावपळीत उमेदवाराच्या आरोग्यावर ताण येतो. मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने उमेदवाराचा व्यायामही होतो आणि त्याच वेळी प्रचाराचे कामही साधले जात आहे. सकाळी फिरतानाचे, योगासने करतानाचे किंवा बागेत बाकावर बसून ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. हे ‘कॅज्युअल’ फोटो मतदारांना आकर्षित करत आहेत.
रात्री १० नंतर कार्यकर्त्यांच्या बैठका
शहरातील बहुतांश भागात भाजप, शिंदेसेना व ठाकरे बंधूंच्या पक्षांतील उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे. या पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार दुपारच्या उन्हात रॅली आणि चौक सभांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत आहेत. निवडणुकीचा खरा ''गेम प्लॅन'' रात्रीच्या वेळी शिजत असल्याचे चित्र आहे. रात्री दहानंतर कार्यकर्त्यांच्या बैठका, सोसायट्यांमधील प्रमुखांच्या भेटी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे वैयक्तिक आश्वासन देण्यावर उमेदवारांचा भर आहे. अनेक सोसायट्यांच्या दारात राजकीय पक्षांनी ‘कचेरी’ थाटल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी
ज्येष्ठ नागरिकांच्या मंडळांतही सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जात आहे. विशेषतः सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा ‘मॉर्निंग वॉक’ पॅटर्न प्रभावी ठरत आहे. उमेदवारांनी मतदारांच्या ‘लाइफस्टाइल’नुसार आपला प्रचाराचा पॅटर्न बदलला असून, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अवलंबवली जाणारी ही ''त्रिसूत्री'' सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. उमेदवार ‘मॉर्निंग’ वॉक’ला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत आहे. त्यानंतर अनेकांसोबत फोटोसेशनदेखील करत आहेत.
PNE26V83401
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

