एका गल्लीत दोन महापालिका; 
मतदारांचा खेळखंडोबा!

एका गल्लीत दोन महापालिका; मतदारांचा खेळखंडोबा!

Published on

पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ८ ः गल्ली एक, पण महापालिका दोन; प्रभाग वेगवेगळे, उमेदवार वेगवेगळे, मतदारही वेगवेगळे, प्रचार मात्र एकाच गल्लीत, अशी गुंतागुंत तुम्ही बघितली आहे? नसेल, तर बोपखेलमधील गणेशनगरमध्ये या आणि बघा! कारण, गणेशनगरमधील एका गल्लीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड महापालिका आणि दुसऱ्या बाजूला पुणे महापालिका क्षेत्र आहे. त्यामुळे प्रचाराचा लगबग क्षणोक्षणी बघायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवडमधील बोपखेल गावाचा समावेश महापालिका प्रभाग चारमध्ये आहे. दिघी-बोपखेल असे प्रभागाचे नाव आहे. दोन्ही गावांच्या मध्ये लष्करी आस्थापना आहेत. साधारण पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतर दोन्ही गावांमध्ये आहे. त्यामुळे बोपखेल गावाचा नकाशा एखाद्या बेटासारखा दिसतो. कारण, गावाच्या दोन बाजूंना अर्थात उत्तर व पश्चिमेला लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) परिसर आहे. दक्षिणेला मुळा नदी आहे. तर पूर्वेला व दक्षिणेच्या काही भागात पुणे महापालिका क्षेत्रातील कळस गाव आहे. दोन्ही गावांच्या मधून जाणारा रस्ता केवळ १५ ते २० फूट रुंदीचा आहे. त्यामुळे एका बाजूला गणेशनगर बोपखेल आणि दुसऱ्या बाजूला गणेशनगर कळस असे चित्र बघायला मिळते. निवासी क्षेत्रासह अनेक व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने आहेत. पुढे नाल्यावरील पुलावरून रामनगर व बोपखेल गावाकडे जाता येते. मात्र, नाल्याच्या पश्चिमेला रामनगर आणि पूर्वेला कळसगाव आहे.

गणेशनगरची रचना
बोपखेल रस्त्यावरील व्हेंटिला पार्कपासून दक्षिणेकडे दुर्गा माता मंदिर आणि दुर्गा माता मंदिरापासून पश्चिमेकडे बनाच्या ओढ्यापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस गणेशनगर आहे. साधारण एक किलोमीटर गल्लीचे अंतर आहे. तिच्या पूर्व व दक्षिणबाजूस कळस गावातील गणेशनगर आणि पश्चिम व उत्तर बाजूस बोपखेल गावातील गणेशनगर आहे. दोन्ही गावातील गणेशनगरमधील गल्ल्यांना कॉलनी संबोधले असून अनुक्रमांक दिले आहेत. गणेशनगर कॉलनी (गल्ली) क्रमांक एक, दोन, तीन अशी रचना आहे. सध्या महापालिका निवडणूक असल्यामुळे कधी पिंपरी चिंचवड तर कधी पुणे महापालिकेसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारफेरी, पदयात्रा गणेशनगरमध्ये बघायला मिळत आहेत.

असे आहेत प्रभाग
पिंपरी चिंचवड महापालिका
प्रभाग ४ ः दिघी-बोपखेल
प्रभागाची हद्द ः आळंदी-पुणे पालखी मार्गावरील टाटा बसथांब्यापासून व्हीएसएनएल कॉलनीपर्यंत. तेथून बोपखेल रस्त्यावरील व्हेंटिला पार्कपासून दुर्गा माता मंदिरापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग, दुर्गा माता मंदिरापासून बोपखेल सीमेवरील बनाच्या ओढ्यापर्यंतच्या रस्त्याचा उत्तर भाग, बनाच्या ओढ्यापासून मुळा नदी संगमापर्यंत ओढ्याच्या पश्चिमेकडील भाग
बोपखेलमधील समाविष्ट भाग ः बोपखेल गावठाण, रामनगर, व्हीएसएनएल, गणेशनगर भाग (व्हेंटिला पार्क ते बोपखेल रस्त्याच्या पश्चिम व उत्तरेकडील भाग)
एकूण लोकसंख्या ः ५५,५३९
निवडणूक लढविणारे उमेदवार ः १५

पुणे महापालिका
प्रभाग एक ः कळस-धानोरी
प्रभागाची हद्द ः आळंदी-पुणे पालखी मार्गावरील टाटा बसथांब्यापासून व्हीएसएनएल कॉलनीपर्यंत. तेथून बोपखेल रस्त्यावरील व्हेंटिला पार्कपासून दुर्गा माता मंदिरापर्यंत रस्त्याचा पूर्वेकडील भाग, दुर्गा माता मंदिरापासून बोपखेल सीमेवरील बनाच्या ओढ्यापर्यंतचा दक्षिण भाग, बनाच्या ओढ्यापासून मुळा नदी संगमापर्यंत ओढ्याचा पूर्व भाग.
कळसमधील समाविष्ट भाग ः कळसगाव, प्रेमलोक प्लाझा, मधुबन सोसायटी, जाधववस्ती, गणेशनगर भाग (व्हेंटिला पार्क ते बोपखेल रस्त्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भाग)

एकूण लोकसंख्या ः ९२,६४४
निवडणूक लढविणारे उमेदवार ः ३३

PNE26V83431 PNE26V83432

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com